इरेला पेटलेले युद्ध

रशिया-युक्रेन हे युद्ध एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेसह काही देशांनी रशियावर निर्बंध घातल्यानंतर आता रशिया अन्य देशांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण एकूणच हे युद्ध हट्टाला पेटले आहे. माघार घेण्याची आणि शस्त्रसंधीची भूमिका न घेता जिंकण्यासाठी केले जात आहे असे दिसते. रशियाचा तरी आपला विजय व्हावा हाच इरादा आहे. त्यामुळे या युद्धाकडे आता इरेला पेटलेले युद्ध असे म्हणावे लागेल. कारण शस्त्रसंधीच्या विषयावर कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.

खरेतर युक्रेनला आपण पाच ते दहा दिवसांत गुडघे टेकायला भाग पाडू, असा रशियाचा समज होता. पण पंधरा दिवस उलटून गेले, तरी युक्रेन मागे हटायला तयार नाही. ही रशियाची सल आहे. या युद्धाला आता वीस दिवस झाले आहेत. अजूनही क्यिव ही युक्रेनची राजधानी पडलेली नाही. युक्रेनचा हा प्रतिकार सैन्याच्या व नागरिकांच्या जिद्दीतून जसा वाढला आहे; तसेच त्यामागे पश्चिमी देशांचे छुपे असे पाठबळही आहे. यामुळेच, रशिया आणि युक्रेन चर्चा करीत असले आणि या चर्चेच्या चार फेºया झाल्या असल्या, तरी युद्धविरामाच्या दिशेने ठोस पाऊल पडलेले नाही. अर्थात तोपर्यंत पडझड होणार आहे, युक्रेनचे इतके बेसुमार नुकसान होणार आहे की, त्यातून लवकर सावरणे युक्रेनला शक्य होणार नाही. गेल्या वीस दिवसांतील जी दृष्ये आपण पाहतो ते पाहिल्यावर एवढ्या प्रचंड नुकसानीतून हा देश कसा सावरेल हाच प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर दुसरीकडे युक्रेनचा विध्वंस करण्यासाठी अनेक प्रकारची शस्त्रे रशिया वापरत आहे, क्षेपणास्त्रांचा मार करत आहे. पण युक्रेनकडे बळ आहे ते त्यांच्या नागरिकांचे. त्यांच्या नेत्याला जनतेचे समर्थन आहे. आम्ही मेलो तरी रशियाशी लडत मरू असा बाणा जनतेत तयार होतो आहे, हे विशेष.
युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच हजारो निर्वासित युक्रेन सोडून युरोपभर पसरत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अनेक देशांतील नागरिकांनी तयारी केल्याची छायाचित्रेही जगभर पाहिली गेली. त्यातही, पोलंड या पूर्वाश्रमीच्या कम्युनिस्ट आणि नंतर ‘नाटो’ गटाच्या आश्रयाला गेलेल्या देशाच्या वागण्याने रशिया आणि रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन अस्वस्थ झालेले दिसतात. युरोपीय देश; तसेच काही प्रमाणात अमेरिकाही पोलंडमार्गे युक्रेनला मोठ्या प्रमाणात मदत व रसद पुरवत आहेत. युक्रेनने आजवर तग धरण्यात या मदतीचा मोठा वाटा आहे; त्यामुळेच एकीकडे युक्रेनशी बोलणी चालू असतानाच, पुतीन यांनी आता पोलंडलाही ‘मदत थांबवा नाही तर पाहा’ असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेनेही चीनला एका मर्यादेच्या पलीकडे मॉस्कोला मदत कराल तर याद राखा, असा दम दिला आहे. यातून हे युद्ध अधिक भडकण्याचीच चिन्हे आहेत. या मोठ्या राष्ट्रांना, अमेरिकेला तर युद्ध भडकले तर एक प्रकारची पर्वणीच असते. कारण कोणतेही युद्ध झाले, तरी त्याचा फायदा अमेरिकेला होणार असतो. अमेरिकेची शस्त्रास्त्रे, सामुग्री अन्य देश खरेदी करतात. त्यामुळे हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिका प्रयत्न करणार नाही.

यातून युक्रेन व रशिया बाजूला राहून, इतर देशांमध्ये काही संघर्ष उडतो का, ही आता खरी चिंतेची बाब झाली आहे. यापूर्वीच्या युद्धांचा अगदी पहिल्या महायुद्धाचा इतिहास पाहिल्यास, संघर्षाचा तीव्र भडका उडण्यासाठी छोटेसे कारणही पुरेसे असते. हे कारण शोधण्याचे काम सध्या चालू आहे. पहिल्या महायुद्धात आॅस्ट्रियन राजपुत्राचा खून हे निमित्त पुरे ठरले. या युद्धातच पुढच्या महायुद्धाची बीजे पेरली गेली. दुसरेही महायुद्ध टाळता आले असते. आता युक्रेन आणि रशिया यांचा संघर्ष वाढून तिसरे महायुद्ध होईल अशी भीती आहे. त्यामुळे जसजसे दिवस वाढत जातील तसतशी चिंता आणि परिणाम उमटायला लागतील.
युक्रेनने प्राथमिक चर्चांमध्ये ‘यापुढे नाटो या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राष्ट्रगटात जाण्याचा आग्रह धरणार नाही,’ असे आश्वासन दिले आहे. बोलणी यशस्वी व्हायची असतील, तर आधी रशियाने बॉम्बफेक व हल्ले थांबवावेत, असा इशाराही दिला आहे. पण चर्चेपूर्वीच कसल्याही अटी लादून घेणे रशियाला मान्य नाही. पुतीन यांना युक्रेन संपूर्णपणे बळकावल्याशिवाय शस्त्रसंधी करण्यात बिलकुल स्वारस्य नाही. पण युक्रेनच्या कडव्या प्रतिकारामुळे त्यांना दोन पावले मागे यावे लागेल, असे चित्र हे युद्ध लांबल्याने निर्माण झालेले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे सरकार पडेल आणि आपल्याला तेथे लगेच कळसूत्री सरकार स्थापन करता येईल, अशीही रशियाची अपेक्षा होती. पण तीही अजून सफल झालेली नाही. झेलेन्स्की यांनी युद्ध सुरू होताच ‘युक्रेनला रशियासमोर एकाकी पाडल्याची’ कठोर टीका पाश्चात्य देशांवर केली होती. त्या टीकेची दखल घेऊन म्हणा किंवा आपले दूरगामी हितसंबंध राखण्यासाठी अमेरिका व युरोपीय देशांनी हालचाल सुरू केली. पोलंडमार्गे युक्रेनला सतत जाणारी मदत हे त्याचेच लक्षण आहे. त्यामुळे हे युद्ध एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण अशा वळणावर येऊन ठेपले आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …