गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून अटक केली. हा फार मोठा आसामी दणका मेवाणींना बसला आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, म्हणजे काहीही बोलले तरी चालते हा भ्रम आसाम पोलिसांनी खोटा ठरवला आहे. अर्थात हे आसामच्या पोलिसांनी केले हे योग्य झाले. तीच कृती गुजरात पोलिसांनी केली असती, तर लगेच विरोधकांना बोलायला हत्यार मिळाले असते. सत्तेचा गैरवापर केला वगैरे बोलायला मोकळे झाले असते; पण मेवाणींना गुजरात पोलिसांनी नाही, तर गुजरातमध्ये घुसून आसामी पोलिसांनी अटक केली हे विशेष.
मेवाणींना अटक केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पालनपूर येथून अहमदाबादला नेण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी आसामला नेण्याची तयारी केली. त्यामुळे काँग्रेस आदी विरोधकांनी गळा काढला. आसाम पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता मेवाणी यांना अटक केली आहे, तसेच कायदेशीर कारवाईबाबत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची प्रत देखील देण्यात आली नसल्याचा दावा काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी ट्विटमधून केला आहे; पण ही देशात फूट पाडणारी, द्वेषाची भावना पसरवणारी प्रवृत्ती ठेचून काढणेच आवश्यक आहे. आज सगळीकडे द्वेषाचे वातावरण पसरवले जात आहे. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केले जात आहे. अशा प्रवृत्तीत हे मेवाणी, कन्हैया कुमार असे लोक आघाडीवर आहेत. त्यांना प्रोत्साहन देणाºया प्रवृत्ती विरोधकांमध्ये आहेत. त्यामुळे चांगल्याला चांगले म्हणण्याची प्रवृत्ती आता संपुष्टात आलेली आहे. मोदींनी कोणतीही चांगली कामगिरी केली, तरी त्याचे कौतुक करायचे मोठे मन विरोधकांकडे राहिलेले नाही. सतत टीकाच करत राहायचे. अर्थात मोदी अशा विरोधकांना काडीचीही किंमत देत नाहीत. मोदींवर सतत टीका करण्यामुळेच तर काँग्रेसची वाताहात झाली. गेली तीन वर्षे ज्या काँग्रेसला अध्यक्ष मिळू शकत नाही, उभे करायला उमेदवार मिळत नाहीत, त्यांची ही अवस्था मोदींवरील टीकेमुळे झालेली आहे. कारण जनता, मतदार जागृत आहेत. आता काँग्रेसने काहीही सांगावे आणि मतदारांनी त्याला होला हो म्हणावे हे दिवस संपले आहेत. सोनिया गांधींनी गुजरातच्या २००२, २००७ आणि २०१२च्या निवडणुकीत सातत्याने घाणेरडी टीका मोदींवर केली होती. मौत का सौदागर म्हटले होते, त्यामुळेच मोदी मोठे झाले. मोदींनी त्याला उत्तर दिले नव्हते. आजही मेवाणींच्या गलिच्छ टीकेला मोदींनी उत्तर दिले नाही; पण आसामी पोलिसांनी मात्र आपला दणका दाखवून या देशात काहीही खपवून घेतले जाणार नाही याची झलक दाखवली.
वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्याविरोधात आसाममध्ये काही गुन्हे दाखल झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक करण्यात आली आहे. आसाममधील कोक्राझर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. जिग्नेश मेवाणी यांना अशाप्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तसेच एखाद्या लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे अपरात्री अटक केल्याने संबंधित कारवाईवर राजकीय नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पण कायद्यापुढे सगळे समान असतात. लोकप्रतिनिधी आहे, म्हणजे त्याला वाटेल ते बोलायचा, न्यायालयावर टीका करायचा, कोणाचाही अवमान करायचा अधिकार दिलेला नाही, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कोक्राझरचे पोलीस अधीक्षक थुबे प्रतीक विजय कुमार यांनी दिली आहे. मेवाणी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, गोडसेला देव मानणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षाविरोधात शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करावे. याच ट्विटवरून जिग्नेश मेवाणीविरोधात कोक्राझर पोलीस ठाण्यात दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे, शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमानास्पद वक्तव्य करणे आणि आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदींना गोडसे भक्त हे केवळ द्वेषाच्या भावनेतून म्हटले आहे. मोदींनी कधीही आपल्या भाषणात कुठेही गोडसेचा उल्लेख कधीच केलेला नाही. गोडसेचे समर्थन केलेले नाही. उलट अशाप्रकारे काही साध्वी खासदारांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. असे असताना मेवाणींनी असे ट्विट करून द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. या द्वेषाच्या राजकारणाला आता चाप बसवला पाहिजे. त्यामुळे आसाम पोलिसांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल.
या द्वेषाच्या भावनेतूनच अनेक चांगल्या कामांना विरोध होताना दिसतो. अडाणी लोकांना वेठीला धरून शेतकºयांच्या फायद्याचे कायदे राजकीय स्वार्थापोटी आणि दलालांचे भले करण्याच्या हेतूने मागे घेण्याची वेळ आली. बहुमत असलेल्या लोकसभेने केलेले कायदे गुंडगिरीच्या दबावाने मोडून काढण्याची प्रथा पाडली आणि या देशात लोकशाहीचा खून केला गेला. हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळेच व्यक्ती द्वेषातून कोणाबद्दलही काहीही बोलण्याचे घाणेरडे राजकारण चालू केले गेले आहे; पण आसाम पोलिसांनी कोणाचीही तमा न बाळगता जिग्नेश मेवाणींना ताब्यात घेतले आणि कायदा अजून मेलेला नाही हे दाखवून दिले, ही चांगली बाब म्हणावी लागेल.