आवाज कुणाचा?

अरे आवाज कुणाचा?, अशी घोषणा देत संपूर्ण महाराष्ट्राला जागवणाºया शिवसेनेचा आवाज बंद कसा होईल, याची सोय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेली आहे. शिवसेनेच्या नावाने राज्य, ठाकरे सरकार अशी ओळख दाखवत प्रत्यक्षात विकासकामात शिवसेनेच्या आम्ही खूप पुढे आहोत हे दाखवण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेला भाजपपासून तोडून सरकार बनवले आणि आम्हीच राज्य करायला योग्य आहोत, हे दाखवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने बाजी मारल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेला फार मोठी जागरूकता दाखवणे गरजेचे आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला, तरी निधी वाटपात मात्र शिवसेना तिसºया स्थानी आहे. ही निश्चितच आनंदाची बाब नाही. काँग्रेसही शिवसेनेला मागे टाकत दुसºया स्थानी आहे. तर अर्थ खाते असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधी वाटपात अव्वल स्थानी आहे. हा निधी विकासकामांसाठी असतो, तो पक्षनिधी नाही, त्यामुळे विकासकामे करण्यात आमचे मंत्री अधिक कार्यक्षम ठरले आहेत, आमचे कमी आमदार असूनही ते चांगली कामगिरी करत आहेत, हे बिंबवण्यात आणि त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत उठवण्यासाठी होणार हे नक्की. संख्याबळ कमी असताना, आम्ही इतके चांगले काम करतो, तर पूर्ण सत्ता आल्यावर किती काम करू, असा प्रश्न आता ते विचारू शकतात, हे शिवसेनेने लक्षात घेतले पाहिजे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये निधी वाटपातही मोठी असमानता असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात निधी वाटपात सर्वात कमी निधी हा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांना मिळाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरला असताना निधी वाटपात आणि खर्चात होत असलेल्या भेदभावामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ते साहजिकच आहे.
२०२० ते २०२१ या वर्षांतील निधी वाटपाच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक आमदार असणारा आणि मुख्यमंत्री पद असणारा शिवसेना पक्ष मात्र पिछाडीवर आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निधी वाटपात मात्र समानता दिसत नाही. सरकारमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे ५८ आमदार आहेत. त्यांनी एकूण निधी ५२२५५ कोटी मिळवला आहे, तर सर्वात कमी आमदार हे काँग्रेसचे आहेत. त्यांचे ४३ आमदार असूनही शिवसेनेच्या जवळपास दुप्पट निधी त्यांनी पदरात पाडून घेतला. काँग्रेसने एकूण निधी १,००,०२४ कोटी इतका मिळवला आहे, तर दुसºया क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार असताना, त्यांनी सर्वाधिक म्हणजे शिवसेनेच्या चौपट तर काँग्रेसच्या दुपटीपेक्षा जास्त निधी पदरात पाडून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण निधी २,२४,४११ कोटी इतका मिळवला आहे. या आकडेवारीवरून सर्वाधिक आमदार आणि मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला सर्वात कमी निधी मिळाला आहे, तर पाच आमदार कमी असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र सर्वात अव्वल आहे. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळाला आहे.

हा अनुभवाचा फरक इथे जाणवतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सातत्याने सत्ता राहिल्याने आणि शरद पवारांसारखे धूर्त नेते, अजित पवारांसारखे अनुभवी नेते असल्याने त्यांनी मुंगी होऊन साखर खाण्याचे काम केले, तर शिवसेनेला हत्ती होऊन ओंडके फोडावे लागले, असे चित्र आहे. शिवसेना भाजपवर सातत्याने टीका करत राहिली. केंद्राच्या नावाने ओरडत राहिली, त्यावेळी शिवसेनेच्या होला हो म्हणण्यासाठी राष्ट्रवादीने नवाब मलिकांसारखे नेते ढालीसारखे पुढे केले आणि बाकीचे नेते, मंत्री कामात गुंतले. आपापल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी नेऊन विकासकामांत त्यांनी लक्ष दिले. ते नेमके शिवसेनेला जमले नाही हे या आकडेवारीतून दिसून येते.
सत्तेत एकत्र असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेकवेळा स्वबळाची भाषा केलेली आहे, मात्र शिवसेनेने कधीच स्वबळाची भाषा केली नाही. कोणाला तरी धरूनच वर जाता येईल, या हेतूने आघाडीची भाषा केली. पण काँग्रेस राष्ट्रवादीची स्वबळाची भाषा ही हे सरकार चालवायला मिळाले आहे, त्याचा फायदा उठवून मिळणाºया ताकदीच्या जोरावर होती. त्यामुळे शिवसेनेने या दोघांवर टीका केली, काही केले तरी हे सरकार कोसळू देणार नाहीत की वाद घालत बसणार नाहीत. पूर्ण पाच वर्षांत भरपूर काही पदरात पाडून घेऊन शिवसेनेच्या हातात काही पडणार नाही याची खबरदारी घेत हे सरकार चालवले जाईल हे दिसते. त्यामुळे आता आपल्याला काही तरी हालचाली केल्या पाहिजेत हे शिवसेनेला लक्षात घेतले पाहिजे.

कोरोनाच्या काळात सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती राष्ट्रवादीकडे खाते असलेल्या आरोग्य खात्याला. राजेश टोपे यांनी आरोग्य खाते चांगले चालवले, राष्ट्रवादीची कामगिरी चांगली झाली हे बिंबवत, उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री आर. आर. पाटील यांनी आपली कामगिरीही चोख करून दाखवली. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, आदिती तटकरे, बाळासाहेब पाटील यांनी सार्वजनिक वितरण, गृह, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, सहकार या विविध खात्यांच्या माध्यमांतून आपल्या मतदारसंघात, आपण पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी शिवसेनेच्या मंत्री-आमदारांना ही कामगिरी करता आली नाही. हे चित्र आज जनतेसमोर दिसत असताना, शिवसेनेने विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता आवाज कुणाचा, अशी घोषणा देताना विचार करावा लागेल. सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते असतील तरी कामाच्या बाबतीत, विकास निधी मिळवायच्या बाबतीत कोणी आवाज करायचा नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवून दिले आहे.
प्रफुल्ल फडके/मुखशुद्धी

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …