कांदा हे व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणाºया राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर व सातारा हे जिल्हे हेक्टरी कांदा पिकविण्याबाबत प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे, तर संबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिद्ध आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील ३७ टक्के, तर भारतातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते आॅक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.
मागणी आणि पुरवठा यांच्यातील असमतोलामुळे कृषी असो वा औद्योगिक या कुठल्याही वस्तूचे दर हे कमी-जास्त होत असतात. या अर्थशास्त्रीय नियमाचा मार्केटवर मोठा परिणाम होत असतो. कांद्याच्या बाबतीत तर हा नियम तंतोतंत लागू पडतो. कधी कांदा शेतकºयाला तर कधी ग्राहकांना रडवत असतो. कांद्याला कुणी विचारनासे झाले की, कांदा कवडीमोल दराने विकावा लागतो. पाच ते दहा रुपये किलो दराने शहरी ग्राहकाला मिळाल्यास तो समाधानी होतो, पण उत्पादक मात्र रडतो. यामुळे कधीकधी कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ त्याच्यावर येते.
मध्यंतरी अतिवृष्टीमुळे कांद्यासह सर्वच कृषीमालाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर ४० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. अशावेळी ग्राहकांना जास्तीचे पैसे खर्च करून कांदा खरेदी करावा लागला. एकंदरीत परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढणार हे गृहीत धरून बाजारातील आयातदार व्यापाºयांनी इराणमधून कांदा मागवला आहे. एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतलेला आहे, तर कांद्याचे भाव कमी करण्यासाठी आयातीचे धोरण अवलंबल्याने बाजारातील भाव तीन ते चार दिवसांत वीस रुपयांनी कोसळले.
याचा परिणाम सर्वसामान्य शेतकºयांवर झाला आहे. बोगस बियाणे, प्रतिकुल हवामान, अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी सदृश्य पावसाने खरिपाच्या लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. कांदा विक्रीतून पैसा मिळण्याची वेळ आली असतानाच बाहेरच्या देशातील कांदा आयात करण्यास सुरुवात झाली. यामुळे स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव पडले आहेत. शेतकºयांचा कांदा ५० रुपये प्रति किलोऐवजी सरासरी २२-२५ रुपये बाजार भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.
ज्या व्यापाºयांनी बाहेरून कांदा आयात केला आहे, त्यांना यापुढे शेतकरी कांदा देणार नसल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. राज्य व केंद्र शासनाने आयात व निर्यातीचे योग्य धोरण स्वीकारले, तरच ग्राहक व शेतकरी या दोघांच्याही हिताचा विचार होईल. कांदा लागवडीसाठी झालेल्या खर्चाची तोंडमिळवणी न झाल्याने बळीराजा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे, हे मात्र तितकेच खरे.
े बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\