आम्हाला आधी मराठी व्हावं लागेल

२७ फेब्रुवारी. आज मराठी राजभाषा दिन. यानिमित्ताने कुसुमाग्रजांचा उल्लेख करायचा. त्यांच्या जन्मदिवसाचा उल्लेख करायचा. त्यानंतर कवीवर्य सुरेश भटांच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या चार ओळी म्हणायच्या. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी आणि आमच्या पाश्चिमात्य शैलीच्या जीवनाला सुरुवात करायची. अशानं आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवता येणार नाही. तर त्यासाठी आमचा आचार विचार आणि पोषाख, वागणे सगळे काही मराठी असलेपाहिजे. त्यासाठी आम्हाला अगोदर मराठी व्हावे लागेल, तरच आमच्या मुखी शोभतील ओळी की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.

सकाळी उठल्यावर किमान एक दिवस तरी कोणाला गुड मॉर्निंग म्हणू नका. नमस्कार म्हणा, राम राम म्हणा किंवा शुभसकाळ म्हणा. उठल्या-उठल्या कोणाकडे पाहून स्माइल करू नका एक छानसं स्मीतहास्य करूया. या सवयी आम्ही लावून घेतल्या, तर आमच्या वागण्यातील अन्य भाषा पण जाईल आणि राहील अस्सल मराठीपण दिसून येईल. आधी आमच्या मराठीचा आस्वाद घ्यायला शिकलं पाहिजं. ते साहित्य, कथा, कविता, शेरोशायरी आणि गौरव खूप लांब राहिला. आपण अगोदर आपले मराठीपण आम्हाला वागण्यात, बोलण्यात, आचरणात आणता येते का आणि ते फक्त २४ तासांसाठी साजरे करता येते का, याचा विचार करूया.
आज नाही आम्ही ब्रेकफास्ट करणार, असा निर्धार करा आणि मग नाष्टा करा किंवा न्याहरी करा. अगदी संघाच्या भाषेत छोटी हजेरी नाही म्हटलात तरी चालेल. धुमधडाकामधील जयराम कुलकर्णीप्रमाणे अतिमराठी बोलला नाहीत, तरी चालेल. ज्या वस्तू अन्य देशांतून आलेल्या आहेत त्यांना त्यांच्याच भाषेतील शब्द वापरले तरी चालतील; पण आमच्या भाषेतील वस्तूंचे शब्द आमचे असले पाहिजेत याचा प्रयत्न करा.

शक्यतो एक दिवस कोणी आॅफिसला जाऊच नका, कारण आपल्याला मराठी होण्यासाठी आपण कार्यालयात जाऊया. मुलांनीही स्कूलमध्ये नाही तर शाळेत जायचा निर्धार करा. फक्त डोळे मिटून प्रत्येकाने पाच मिनिटे चिंतन करा आणि आम्ही किती शब्द आपल्या मराठीत असताना अन्य भाषेतील शब्द वापरतो?, बाजारात फळं विकणारा मराठी मग त्याला आपण सफरचंद विचारण्याऐवजी अ‍ॅपल कशी दिली?, असं का विचारतो?, यामुळेच आम्ही एखादी वस्तू मिळाली का, या ऐवजी भेटली का विचारतो. अन्य भाषांकडून झालेला शाब्दिक बलात्कार सहन करत मराठी भाषेचा वापर होतो, म्हणून फक्त चिंतन करा की किती शब्द आम्ही आमच्याकडे असूनही वापरत नाही, म्हणूनच अगोदर आम्हाला मराठी व्हावे लागेल, म्हणजे साध्या-साध्या गोष्टी असतात. शाळेतल्या दोन मुली एकमेकीत चर्चा करताना एक मुलगी म्हणाली माझी आई साडी घालते, ड्रेस घालत नाही. पण साडी घालतात का?, साडी नेसतात. हे नेमकेपण आम्ही मराठी बोललो तर येणार आहे. मग त्यासाठी साडीला आपल्याकडे काय शब्द आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. साडी हा इंग्रजी शब्द आहे; पण आपण त्याला लुगडं म्हणतो. पातळ म्हणतो. ते पातळ कुठले आहे, यावरून त्याची पैठणी, इचलकरंजी, धारवाडी अशा प्रकारात विभागणी होते. आपल्याकडे गाणी, गीतांमध्ये, लावण्यांमध्येही साडी असा उल्लेख नसतो. तर त्या लुगड्याचा प्रकार काय आहे, त्यावर वर्णन केले जाते. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा. यातून आमच्याकडच्या पैठणी, जरीच्या शालू यांचा गौरव आहे. हे मराठमोळेपण आहे. अगदी गवळणीत जायचे म्हटले तरी नेसले गं बाई. चंद्रकला ठिपक्याची. यात चंद्रकला हा पातळ किंवा लुगड्यातील प्रकार आहे. तो मराठमोळा आहे. ब्लाऊजला आपल्याकडे पोलकं म्हणतात, झंपर म्हणतात किंवा चोळी म्हणतात; पण हे शब्द वापरात नाहीत; पण गाण्यात हे उल्लेख आढळतात ना? चंदनाची चोळी माझं अंग अंग जाळी, चोळी अंगात तंग तुझ्या कशी बसली?, चोळी दाटली अंगाला पण कापड का फाटलं गं?, अशी किती तरी उदाहरणे सांगता येतील; पण हे फक्त आम्ही गाण्यात बंद केलेले शब्द झालेले आहेत. झंपर किंवा पोलकं हे शब्द आजकाल कोणी वापरतच नाही. त्यामुळेच पाश्चिमात्य संस्कृतीत विविध प्रकारचे डे साजरे केले जातात त्याप्रमाणे आम्हाला मराठी भाषेचा डे साजरा करावा लागतो आहे. आम्ही आमच्या भाषेचे दिवस घालत आहोत आणि दुसरीकडे ती भाषा अभिजात आहे, असा दावा करत केंद्राकडे मागणी करत आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण देणार आहोत. ती भाषा अभिजात असल्याचे आपण दाखवून देणार आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या ही मागणी करण्यासाठी अमराठी राष्ट्रपतींना हिंदी भाषेत पत्र लिहून काय उपयोग आहे?, आम्ही मराठी जगणार असा निर्धार केला, तर ते शक्य होईल. त्यासाठी आज कोणीही आपल्या बेडरूममध्ये झोपणार नाही, तर प्रत्येकाने शयनकक्षात झोपावे. आपल्या अंथरुणात बेड नसेल, तर पलंग आहे का पाहा. खाट आहे का पाहा. त्या खाटेवर गादी झाकण्यासाठी आम्हाला बेडशीट नको, तर पलंगपोहोच मागून घ्या. पिलो आणि पिलोकव्हर मागू नका तर उशी आणि आभ्रा मागा. रोजच्या वापरातले साधेसुधे शब्द आम्ही मराठीत वापरत नाही, ते हद्दपार करतो. एकदिवस आपल्या मम्मीला आई म्हणून पाहा. आपली आई किचनमध्ये नाही तर स्वयंपाकघरात आहे. बाबा हॉलमध्ये नाहीत, तर दिवाणखान्यात, बैठकीच्या खोलीत बसलेले पाहा. एकदिवस फॅन बंद करा आणि पंख्याचे वारे घ्या. खूप सोपे आहे. फक्त आपण तयारी केली, तर सगळं शक्य आहे. आपण अगोदर मराठी बनूया.
एखाददिवशी गिरणीत दळण टाकायला जा. पण या गिरणीच्या पट्ट्याबरोबर आमच्या पूर्वीच्या जात्यावरच्या ओव्या आठवतात का पाहा. आपल्या बाळाला लोरी म्हणू नका, तर अंगाई गीत म्हणा. मुलांना प्ले ग्रुप, माँटेसरीत पाठवले म्हणू नका, तर बालवाडीत, बालकमंदिरात गेलेले म्हणा. तिन्ही सांजेला गार्डनमध्ये नको तर बाग, बगीचा, उद्यान किती शब्द आहेत याचा विचार करा. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये नको तर उपहारगृहात जाऊन काही तरी सेवन करा, प्राशन करा. आपल्या सगळ्या सवयी जर मराठी लावून घेण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही अभिजात होऊ. आमच्यात मराठीचे तेज संचारले, तर त्या अभिजातपणाला दर्जा मिळेल. ही मराठी माणसाची संस्कृती आहे. त्यांची भाषा मराठी आहे, म्हणून आम्ही गाऊ शकू, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. इतकेच नाही तर वागतो, जगतो मराठी असे म्हणता येईल. जरा करून तर पाहा.

प्रफुल्ल फडके/ मराठी भाषा दिन विशेष
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …