ठळक बातम्या

आमच्या वेळची दिवाळी

खरेतर प्रत्येक पिढीनुसार संस्कार बदलतात, सणवार साजरे करण्याच्या पद्धती बदलतात; हे सगळे स्वाभाविकच आहे, पण आजची दिवाळी साजरी करण्याची संकल्पना पाहून जुन्या दिवाळीची लज्जत आठवणे स्वाभाविकच आहे.
त्याकाळी दसरा संपला की, दिवाळीचे वेध लागायचे; रस्त्यावर कल्हईवाला ओरडू लागायचा; मग गृहिणींचे फराळाचे पितळेचे डबे आपसूक बाहेर पडायचे; फराळ साठवण्यापूर्वी स्वत:चा साजश्रृंगार करून घेण्यासाठी! मग काही दिवसांनी रांगोळीवाला त्याची चारचाकी हातगाडी घेऊन गल्ली बोळातून फिरू लागे; सोबत त्याच्याकडे असत दोन गोष्टी, जमीन रंगविण्यासाठी गेरू व रांगोळीसाठी ठिपक्यांचे कागद. घराघरांमधून दिवाळीची साफसफाई होणार हे हेरून मग डबा-बाटलीवाली तिच्या पारंपरिक आरोळीसोबत दुपारची शांतता भंग करू लागायची.

क्वचितच दारावर गरीब घरांतील मुले करंजीचे पारंपरिक आकाशकंदील घेऊन येत असत; उद्देश हाच की, मोलमजुरी करणाºया आपल्या आई-बाबांना दिवाळी साजरी करण्यासाठी चार पैसे अधिक मिळावेत म्हणून.
दिवाळीची सुट्टी लागली की, आम्ही मुले दोन कामांमध्ये अडकले जात असू. एक किल्ला बांधण्यासाठी सामानाची जुळवाजुळव करण्यामध्ये व दुसरे आईसाठी गिरणीवाल्याकडे चकरा मारणे; कधी भाजणी दळून आण, तर कधी तांदळाचे पीठ. त्यामुळे गिरणीवालादेखील दिवाळीमध्ये रात्री १०.३० वाजेपर्यंत ओव्हरटाईम करत असे; क्वचित तर घरातील अतिउत्साही गृहिणी जात्यावर पीठ दळत असत. त्याकाळी दिवाळी खºया अर्थाने सर्वांसाठी पैसे कमविण्याची वेळ असायची.

दिवाळी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसे वनवासी कल्याण आश्रमाची कॅलेंडर्स विकून, विधवा आश्रमासाठी भाऊबीज गोळा करून वंचितांची दिवाळी पण गोड व्हावी, यासाठी मनापासून झटायची. मध्यमवर्गातील मुले बिझनेस शिकण्याच्या नावाखाली फटाके विकण्याचा उद्योग करत असत, थोडक्यात काय तर दिवाळी म्हणजे एक समांतर अर्थव्यवस्थाच होती त्याकाळी.
आणि एकदाचा तो दिवाळीचा पहिला दिवस उजाडायचा; चाळींमध्ये कोणाच्या घरी पहिला फटका वाजणार याची स्पर्धा असायची, त्यामुळे अगदी पहाटे ४ वाजताच अभ्यंगस्नान सुरू व्हायचे; फटाक्याची माळ दणक्यात वाजवी म्हणून मग मुद्दामहून ती जिन्यात किंवा बोळात लावली जायची, ज्यायोगे आवाज जास्त घुमावा. ध्वनी प्रदूषणाचे डोस पाजणाºयाच्या बंद दरवाजापुढे मग मुद्दामहूनच फटाके फोडले जात असत.

लक्ष्मी फटाका, आपटी बार, सुतळी बॉम्ब असे फटाके किल्ल्यात बांधलेल्या तोफेच्या तोंडी ठेवून फोडले जात असत व आपण कसे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे सिद्ध केले जाई. किल्ल्याभोवती खंदक. त्यात पाणी सोडलेले असायचे; उन्हाने ते पाणी सुकले की, परत त्यात पाणी टाकले जात असे; किल्ल्यावर हिरवळ दिसावी म्हणून पटकन रुजणारी राई पेरली जात असे.
ज्यांची चित्रकला जरा बरी असायची अशी मुले त्याकाळी स्वत:च्या हाताने दिवाळी शुभेच्छा कार्ड बनवायची व मग मित्र मंडळींना/नातेवाईकांना पोस्टाच्या माध्यमातून पाठवायची. अर्थात मग आपल्यालादेखील कोणाची भेटकार्डे येतील या आतुरतेतून पोस्टमनची वाट पाहिली जायची. दिवाळीत पोस्ट व पोस्टमन हे नाते दिवाळी व फराळा इतकेच अतूट असायचे.

दिवाळी म्हणजे आम्हा मुलांसाठी एक पर्वणी असायची, पण त्याला एक गालबोट लागलेले असायचे व ते म्हणजे दिवाळीतील गृहपाठ.
त्याकाळी दिवाळीचा फराळ हा कधी स्वत:च्या घरापुरता बंदिस्त नसायचा, तर तो अख्ख्या आळीमध्ये फिरायचा. मग कोणाच्या चकल्या यावेळी फसल्या; कोणाचे अनारसे फक्कड जमले आहेत अशा गॉसिपयुक्त खमंग गप्पा कित्येक दिवस रंगायच्या. चकल्या नीट व्हायचा म्हणून मोहन (गरम तेल) टाकताना, भाजणीचे पीठ मळताना आई कोणालाही जवळ फिरकू देत नसे; कोणाची नजर लागून चकल्या फिसकटू नये ही भाबडी अंधश्रद्धा त्यामागे असायची. माझ्या आजीच्या काळात तर खास नरम व कडक बुंदीचे लाडू करण्यासाठी बुंदी पाडायला खास हलवाई बोलाविला जात असे.

त्याकाळी दिवाळीसाठी कुटुंबाची व्याख्या बदलली जात असे; विस्तारित कुटुंबामध्ये मग कोळीणदेखील समाविष्ट होत असे; तिला व घरकाम करणाºया मावशींना माझ्या आईने फराळ दिला नाही, असे कधी झालेच नाही.
दिवाळीमध्ये पाडव्याच्या दिवशी गुजराती लोकांचे साल मुबारक असते, त्यामुळे पहाटे शगूनाचे मीठ घेण्यासाठी माझे वडील आवर्जून उठायचे; माझे पूर्वज गुजरातमध्ये स्थायिक झाले होते, त्यामुळेच ही प्रथा आमच्याकडे देखील आली असावी.

या आणि अशा अनेक आठवणी आता भूतकाळाच्या गर्भात सामावल्या गेल्या आहेत. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी दहा हजारांची माळ ज्याला कोट म्हणत असू तो फोडणे म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण असायचा; आकाशात उडणारी रॉकेट्स व पॅराशुट्स बघण्यासाठी गच्चीवर जमणे हादेखील एक सोहळाच असायचा.
दुसºया दिवशी झाडात अडकलेले एखादे पॅराशूट मिळविण्यासाठी आम्हा मुलांची जी धडपड चालायची तीदेखील न विसरण्याजोगीच असायची.

आजकाल दिवाळी पहाट या संकल्पनेचे पेव फुटले आहे, पण त्याकाळी होतकरू कलाकारांना प्रोत्सहन देण्यासाठी रांगोळी प्रदर्शने भरत असत; त्यामध्ये जमिनीवरची रांगोळी, पाण्यावरची रांगोळी (कोळशाच्या पूड वर), असे अनेक प्रकार असायचे.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे राहायला जायचे हेदेखील मस्ट असायचे.

दिवाळी ही शेजाºयापाजाºयांना लक्षात ठेवून साजरी केली जायची; दुर्दैवाने चाळीतील घरातील कोणाचे आकस्मिक निधन झाले असेल, तर त्या घरात त्यावर्षी दिवाळी साजरी केली जायची नाही; अशावेळी त्या घरातील लोकांकडे अख्ख्या चाळीतून फराळ जात असे व त्या कुटुंबाला एकटे वाटू नये म्हणून इतर कोणीदेखील रोषणाई, कंदील लावत नसत.
सुख व दु:ख दोन्ही वाटून घेणारी दिवाळी ही खºया अर्थाने एक सांस्कृतिक धरोहर होती. आता दिवाळीतील हे माणूसपण हरविले आहे. आता राहिले आहे ते कोरड्या शुभेच्छांचे आदान प्रदान, रेडिमेड फराळ आॅर्डर करून एकमेकांचे तोंड गोड गोड करण्याची औपचारिकता!

– प्रशांत दांडेकर/9821947457\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …