ठळक बातम्या

आता अध्यक्ष पदाचा हट्ट सोडावा


सध्या यूपीएच्या अध्यक्ष पदावरून चर्चा सुरू आहे, म्हणजे ममता बॅनर्जींच्या मुंबई दौºयानंतर ती अधिक जोरात सुरू झालेली आहे, पण याबाबत विचार करण्याची वेळ काँग्रेसवर आलेली आहे. विरोधकांमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने हे अध्यक्ष पद काँग्रेसकडेच असावे, असा काँग्रेसजनांचा विचार आहे, पण यूपीएत जे प्रादेशिक पक्ष आहेत, ते काँग्रेसला स्थानिक पातळीवर लहान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मोठा म्हणजे जुना पक्ष असला, तरी हे पद त्यांना अन्य कोणाला तरी काही दिवसांसाठी देणे आवश्यक असेल.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी यात तोच फरक आहे. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जेव्हा रालोआ तयार झाली, तेव्हा त्याचे प्रमुख निमंत्रक पद भाजपने जॉर्ज फर्नांडीस यांच्याकडे सोपवले होते. हे अध्यक्ष पदाच्या तोडीचे पद होते आणि फर्नांडीस यांच्या पक्षाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच खासदार होते. त्यामुळे आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने थोडी तडजोड केली, तर काही फरक पडत नाही. तडजोड न केल्याने सत्ता गमवावी लागते, हे भाजपकडून त्यांनी शिकले पाहिजे, कारण काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचाच आधार आहे, हे लक्षात घेण्याची आता गरज आहे. स्वबळाची भाषा वापरणे सोपे असते, पण स्वबळ असले पाहिजे याची जाणीव असावी इतकेच.
खरंतर काँग्रेसला पूर्वी आघाडीचा फॉर्म्युला मान्यच नव्हता. त्यासाठी राजीव गांधी यांच्या काळात १९८९ला सिंगल लार्जेस्ट पार्टी असतानाही कोणाचा पाठिंबा आणि आघाडी नको, यासाठी विरोधात बसण्याचे काँग्रेसने पसंत केले होते, पण एकहाती सत्ता मिळवण्याच्या मानसिकतेतून काँग्रेस आता आघाडीच्या मानसिकतेत परावर्तित झालेली आहे. अशा परिस्थितीत यूपीएच्या अध्यक्ष पदासाठीही काँग्रेसने मित्र पक्षांना संधी देण्याची गरज आहे. फक्त काँग्रेस असेल, तेव्हा त्यांनी परिवारवादात असायला हरकत नाही, पण आघाडीत त्यांनी मित्र पक्षांना कमी लेखून चालणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. राष्टÑीय पातळीवरील पक्ष अशी प्रतिमा असलेल्या पक्षाची ताकद आज एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या एवढीच असल्यामुळे अस्तित्वासाठी आता काँग्रेसला ही तडजोड करावी लागेल. प्रादेशिक पक्षांची शिडी लावून काँग्रेस आता सत्तेची स्वप्न साकार करत आहे. आज शिवसेना नसती, शिवसेनेने भाजपला धक्का दिला नसता, तर राज्यात काँग्रेसला सत्तेत वाटा मिळाला नसता. काही का होईना शिवसेनेच्या कृपेने आज एक राज्य काँग्रेसकडे आहे, असे सांगता तरी येते. हे आघाडीत मिळालेल्या स्थानामुळे शक्य आहे. असे असताना आता आघाडीच्या अध्यक्ष पदासाठी त्यांनी थोडा मोठेपणा दाखवण्याची गरज आहे.

काँग्रेसने २०१४च्या १६व्या लोकसभा निवडणुकीतील न भुतो न भविष्यती अशा अपयशानंतर २०१९ ला परिस्थिती सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. २०१४ पेक्षा जास्त जागा आल्या, पण शंभर जागा मिळवता आलेल्या नाहीत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे भाजप विरोधी मतांची एकजूट करणे. याचे कारण सत्तेपासून दूर गेल्यामुळे काँग्रेसचे फार मोठे नुकसान झालेले आहे. निवडणुका आणि राजकारण हाच धंदा असलेले काँग्रेस कार्यकर्ते, नेते, विचारवंत, वक्ते, प्रवक्ते अक्षरश: बेरोजगार झालेले होते. एखादा कारखाना बंद पडावा आणि हजारो कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळावी त्याप्रमाणे काँग्रेसवर बेकारीची पाळीच २०१४ नंतर आली होती. त्यांच्यासाठी आता काँग्रेसला आपला लोकशाही नामक भांडवली व्यवसाय पुन्हा सुरू करावाच लागेल. त्यामुळे अवसायनात निघालेल्या कंपनीप्रमाणे आता तडजोडीचे राजकारण करणे हेच काँग्रेसच्या हातात आहे. त्यासाठी त्यांनी यूपीए अध्यक्ष पदाचा हट्ट सोडला पाहिजे.
मागच्या पाच वर्षांत काँग्रेसने विविध ११ राज्यांमध्ये २१ प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसकडून स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभेच्या सर्वात कमी जागा लढवल्या गेल्या होत्या. मित्र पक्षांशी जागावाटपात तडजोड करून २०१४ ची ४४ जागा ही दयनीय अवस्था संपवून पुन्हा तीन अंकी आकडा गाठण्यासाठी आणि आघाडीतील मोठा पक्ष म्हणून नेतृत्व करण्याचे काँग्रेसचे स्वप्न होते, पण ते ५० पर्यंत पोहोचले. अजून तडजोड केली, तर कदाचित अजून जागा वाढल्या असत्या.

एखादी वेल वाढवायची असेल, तर मोठ्या झाडाचा आसरा घ्यावा लागतो, मोठी भिंत असेल तरी चालते. भाजपने गेल्या ३० वर्षांत तसेच केले. वेलीवरच्या रातराणीचा सुगंध दूरवर पसरतो आणि नावही रातराणीचे होते आधाराच्या झाडाकडे, भिंतीकडे कोणी लक्ष देत नाही. हाच फॉर्म्युला वापरून आपले इप्सित साध्य करण्याचे काम काँग्रेसला जमले नाही. भाजपने राज्यात शिवसेनेला लांब केले, शिवसेनेमुळे वाढलेला पक्ष असताना तडजोड केली नाही. त्यामुळे हे शहाणपण काँग्रेसने घेतले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा याने काँग्रेसने यूपीए अध्यक्ष पदासाठी अन्य कोणाचा आधार घेतला, तर काँग्रेस मोठी होईल. पण राज्यात आघाडी असतानाही भाई जगताप मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भाषा करतात. हे पक्षाला घातक ठरू शकते, पण काँग्रेसने तडजोडीचा आणि मजबूत आघाडीचा मार्ग स्वीकारला, तर त्यांचा फायदा होईल पण नेतृत्वाचा हट्ट सोडला पाहिजे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …