आजपर्यंतची उपेक्षा भरून काढेल का?

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीतील आद्य लेखक ज्ञानसूर्य ‘श्रीम्हाइंभट’ यांची व त्यांच्या गावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य ठरते. साडेसातशे वर्षांपूर्वी ज्यांनी मराठीला देववाणीचा दर्जा दिला, आज त्याची नोंद ना शासन दरबारी आहे, ना साहित्य वतुर्ळात, हे कटू असले तरी सत्य आहे. ३ डिसेंबरपासून गोदावरीच्या उगमाजवळ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे, हे संमेलन आजपर्यंतची उपेक्षा भरून काढेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संमेलनाच्या व्यासपीठाला, संमेलन कक्षाला किंवा एखाद्या प्रवेशद्वाराला ‘ज्ञानसूर्य श्रीम्हाइंभटां’चे नांव देऊन त्यांचा सन्मान केला जावा. आद्य ग्रंथकर्त्याचे गावी एखादा स्मृतीस्तंभ तयार व्हावा, तसा ठराव मंजूर व्हावा.
संतपंडित श्रीम्हाइंभट यांचा जन्म शके ११६० मध्ये अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या ‘सराळा’ या गावी ब्राह्मणकुळात झाला. ते जात्याच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी पाच धर्मशास्त्रांचा व इतर तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. सहावे प्रभाकर दर्शन नावाचे शास्त्र त्यांनी तेलंग देशात (आजचे आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्य) अभ्यासले. तिथून परत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व विद्वानांना शास्त्रचर्चेत निरुत्तर केले. वेदादी ग्रंथशास्त्रात नैपुण्य मिळवलेले एक षड्शास्त्रसंपन्न विद्वान असा त्यांचा लौकिक अल्पावधीतच पसरला.

गणपती आपयों हे म्हाइंभटांचे मामा आणि एका अर्थाने गुरुही होते. म्हाइंभटांच्या विद्वत्तेवर आध्यात्मिक सद्गुणांचा तेजस्वी मुलामा चढावा व त्यांच्या विद्वत्तेचे चीज व्हावे असे त्यांना मनोमन वाटत होते. याच कळकळीतून त्यांनी म्हाइंभटांना सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंतांजवळ आणले. सर्वज्ञांशी झालेल्या शास्त्रचर्चेत म्हाइंभट निरुत्तर झाले. सर्वज्ञांकडून त्यांना ज्ञानशक्तीचे दातृत्व वर्तले. सर्वज्ञ हे ईश्वरावतार व मी एक जीव अशी त्यांना दृढ प्रचिती आली. पुढे लवकरच सर्वसंग परित्याग करून ते श्रीक्षेत्र ऋदिपूर येथे श्रीगोविंदप्रभुंच्या सान्निध्यात आले. तेथे संन्यास धारण करून वीतरागी व मोक्षमार्गी पुरुषाचे जीवन कंठू लागले.
सर्वज्ञांनी उत्तरापंथे गमन करण्यापूर्वी ते सर्वज्ञांच्या सान्निध्यात राहू लागले. सर्वज्ञांनी शके ११९४ मध्ये उत्तरापंथे बीजे केले. त्यांनी श्रीनागदेवाचार्यांकडून सर्वज्ञ निरुपित ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास केला. भावी पिढीस स्मरणभक्ती साधावी, या सद्हेतूने संतपंडित म्हाइंभटांनी नागदेवाचार्यांच्या संमतीने अवघ्या एकदीड वर्षात संपूर्ण महाराष्ट्र पायी फिरून अतिशय परिश्रमपूर्वक सर्वज्ञांच्या लीळांचे संकलन केले. नागदेवाचार्यांनी त्या लीळा तपासल्या आणि शके ११९६ पर्यंत त्या पर्णारूढ होऊन ग्रंथबद्ध झाल्या. तो ग्रंथ म्हणजेच श्रीम्हाइंभट संकलित ‘लीळाचरित्र’ ही थोर साहित्यकृती होय. मराठीतील या आद्यग्रंथाचे लिखाण वाजेश्वरी-रिद्धपूर (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथे झाले. ‘ज्ञानेश्वरी’च्या काही वर्षेआधी ‘लीळाचरित्रा’चे लेखन झाले.

श्रीचक्रधर भगवंतांच्या उत्तरापंथे गमनानंतर नागदेवाचार्य हे सर्वज्ञांच्या लीळांचे स्मरण करीत असत. म्हाइंभटांनी नागदेवाचार्यांच्या आज्ञेने लिखानाची परवानगी मागितली. आठवणी लेखनबद्ध व्हाव्या, असे म्हाइंभटांना प्रथम वाटते. नागदेवाचार्यांनी आठवणी ज्यांच्या संदर्भातील आहेत, त्या व्यक्तींना विचारून आठवणींची खात्री करूनच घ्यायला सांगितले. म्हाइंभट हे लीळा शोधण्याचे काम सुरू करतात. यातील एक आठवण सांगितली जाते, गोदावरी तीरावरील ‘डखले’ नावाचे श्रीचक्रधर भगवंतांचे अनुयायी होते. त्यांच्याकडे म्हाइंभट गेले तेव्हा ते औत हाकत होते. त्यांच्या कामात व्यत्यय न आणता म्हाइंभट हे डखले यांना आठवणी विचारायचे. या आठवणी नमस्कारूनी घेत. त्यानंतर गावामध्ये जाऊन भिक्षा मागून नदी काठी जाऊन जेवण करायचे. लीळांची खात्री झाल्यावर त्यातील शब्दांची खात्री नागदेवाचार्यांकडून करून लेखन करायचे. कच्चा खर्डा तयार झाल्यानंतरही लीळांचा शोध घेतात, अनेक शिष्यांना भेटतात. लीळा अधिकृत व्हाव्यात म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करतात. लीळांची निवड, त्यांची रचना, कथनाची पद्धत, लीळांची सत्यता, सौंदर्य अशा अनेक बाबींमध्ये म्हाइंभट कमालीचे कष्ट उपसतात. कालक्रमानुसार लीळांची सुसंगत मांडणी करतात, यातून म्हाइंभटांचे कर्तृत्व दिसून येते. त्याकाळी चरित्रलेखनाचे कसलेही निकष प्रस्थापित नसताना म्हाइंभटांनी श्रेष्ठ, आदर्शवत ग्रंथाची निर्मिती केली. पंथीय निष्ठा जोपासून मराठीतून साहित्यलेखनेचा प्रारंभ केला. ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ म्हाइंभटांच्या
भक्तीसाधनायुक्त तपर्श्चयेचे एक सुमधुर फळ आहे. प्रकांडपंडित असलेल्या म्हाइंभटांच्या श्रीगुरूंच्या विरहातील स्मरणभक्तीतून हा ग्रंथ उदयास आला.

आजही मराठी भाषा, व्याकरण, वाङ्मयीन सौंदर्य, इतिहास, धर्म, संस्कृती, समाज, भूगोल अशा अनेक विषयांनी ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ अजोड ठरतो. हा ग्रंथ तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक अशा विविध पैलूंचा साक्षीदार असून मार्गदर्शक असा दीपस्तंभ आहे. म्हाइंभट हे श्रीमंत होते, ते श्रीगोविंदप्रभूंकडे येणाºया जाणाºयांची व्यवस्था पाहत. रिद्धपूरला असताना श्रीगोविंदप्रभूंच्या सेवेसाठी सोन्या-चांदीचा व्यापार करीत असत. रिद्धपूरला श्रीगोविंदप्रभूंचा राजमठ आणि त्याभोवतीची जागा म्हाइंभटांनी आपल्या पैशाने विकत घेऊन दिली होती. म्हाइंभटांच्या श्रीमंतीचा गर्व श्रीगोविंदप्रभूंनी तर विद्येचा अहंकार श्रीचक्रधर भगवंतांनी नाहीसा केला. म्हाइंभटांच्या जीवनातील हे सर्वात मोठे परिवर्तन ठरते. असा हा पहिला मराठी लेखक आहे. आज हे अविश्वसनीय वाटत असले तरी हे एक सत्य आहे. म्हाइंभटा विषयीची माहिती लीळाचरित्र, श्रीगोविंदप्रभुचरित्र आणि स्मृतीस्थळ या ग्रंथांमध्ये दिसून येते.
मराठीतील आद्य लेखक आणि संशोधक असलेल्या ज्ञानसूर्य श्रीम्हाइंभटांच्या ‘सराळा’ गावाचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा गोदावरीला आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर गोदेकाठी ‘सराळा’ गाव आहे. गोदावरीचा उगमाजवळ होत असलेल्या साहित्य उत्सवात यावर विचार व्हायला हवा. महानुभावांनी सांप्रदायिक निष्ठेतून आद्य ग्रंथनिर्मितीचे स्थळ ‘वाजेश्वरी- रिद्धपूर’ला जतन केले आहे. महाराष्ट्र शासनाने मात्र, ग्रंथनिर्मात्याच्या जन्मगावाची उपेक्षा केली आहे, हे दुर्दैव! एक संस्कृत पंडित लोकभाषेत, मराठीत साहित्यनिर्मिती करतो या घटनेला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. आज म्हाइंभटांच्या जन्मगावाची उपेक्षा अस्वस्थ करते. ज्यांनी माय मराठीची सेवा केली. तिची जडणघडण ज्या गावी झाली, त्या गावी म्हाइंभटांविषयी आजही नाही चिरा, आठवणही नाही, ही शोकांतिका आहे. आद्यग्रंथकर्त्याचे गावी एखादा स्मृतीस्तंभ आणि म्हाइंभटांच्या नावाने एखादा फलक तरी लावण्यासाठी प्रयत्न होईल, अशी आशा मराठीप्रेमी नाशिकात बाळगुण आहेत.

ग्रंथ निर्मात्याविषयी या संमेलनात सार्वत्रिकरीत्या ऋण व्यक्त व्हायला हवेत. यासाठी संमेलनाच्या व्यासपीठाला, संमेलन कक्षाला किंवा एखाद्या प्रवेशद्वाराला तरी ‘ज्ञानसूर्य श्रीम्हाइंभटां’चे नांव देऊन त्यांचा सन्मान केला जावा. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आद्य ग्रंथकर्त्याचे गावी एखादा स्मृतीस्तंभ तयार व्हावा, तसा ठराव संमेलनात मंजूर करणे हे समयोचित ठरेल.
हरिहर पांडे/९६२३८०२०२०

ऐं्र’: ँं११८_स्रंल्लीि@१ी्िराों्र’.ूङ्मे

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …