अहंकार या विषयावर जितकं बोलू, तितकं कमीच आहे. कारण, ‘तो’ माणसाचा आणि संपूर्ण मनुष्य जातीचा मोठा शत्रू आहे. शत्रूला सर्व बाजूंनी पूर्णपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे. अहंकार आजवर कधीच उत्पन्न किंवा निर्माण झालेला नाही आणि तसंच तो भविष्यातही कधी उत्पन्न किंवा निर्माण होऊ शकणार नाही. त्याचं प्रत्यक्ष अस्तित्व कधीच नव्हतं आणि नसणार आहे. तो सत्यात कुठेही नाही आणि नसणार आहे, तरीही अहंकार हा मानव जातीचा मोठा शत्रू आहे.
ज्याप्रमाणे अंधारात जमिनीवर पडलेला दोर (रस्सी) दूरच्या अंधुक प्रकाशामध्ये ‘साप’ वाटतो,(असत नाही) किंवा एखादा वित – दोन वित लाकडाचा तुकडा, त्याचा काही भाग पाण्यात बुडवल्या वर एकदम तिरपा किंवा वाकडा दिसतो, (असत नाही) तद्वतच अहंकार हा एक निव्वळ ‘भ्रम’ आहे, त्याचं अस्तित्व मुळातच कोठेही नाही.
अहंकाराबाबत अगदी असंच आहे, तो आहे, असं वाटतं पण नसतो, कारण अस्तित्वात तो कधी निर्माणच होत नाही. असतो, तो केवळ ‘एक भ्रम’ आणि नेहमी भ्रम माणसाला ‘भ्रमिष्ट’ करत असतो. भ्रमिष्ट माणूस कसा वागतो, बोलतो, चालतो हे निराळं सांगण्याची आवश्यकता नाही. अल्मोस्ट सगळीकडे जगात ते आपण पाहतो.
आता हा भ्रम कसा पैदा होतो, हे पाहण्याचा प्रयत्न करू. मूल जन्माला येतं, ते अनाम असतं, त्याला आपण एक नाव देतो. (बाळू, पिंट्या किंवा काही तरी ‘क्ष’, ‘य’ वगैरे) या आपण दिलेल्या नावाचा समाजात वावरताना उपयोग असतो; पण ते नाव सत्य नसतं, म्हणजे बाळूच्या ऐवजी पिंट्या असं ठेवलं, तरी त्या अनाम जन्मलेल्या बाळात काहीच फरक पडत नाही. तसंच हे आपण दिलेलं नाव, (ते अनाम बालक सोडून) इतर लोकांच्या उपयोगी पडत असतं. त्या बाळासाठी तर मी हे दुसरं नाव निवडावं लागतं, म्हणजे असं की, समजा त्या बाळाला ज्याचं नाव आपण बाळू ठेवलं आहे, भूक लागली आहे, तर ते बाळ पुढे मोठं झाल्यावर स्वत:च बाळूला भूक लागली आहे, असं नाही ना म्हणू शकत! कारण, तसं बोलणं आपल्याला गोंधळात टाकत असतं, म्हणून फक्त स्वत:च्या वापरासाठी त्या बाळाला एक दुसरं नाव धारण करावे लागते आणि ते नाव आहे ‘मी’. जसं जसं ते बाळ मोठं होत जातं, तसं तसं हा ‘मी’सुद्धा मोठा होत जातो. या ‘मी’ची प्लेसमेंट जर योग्य ठिकाणी (अंतरातील ज्योतिर्मय मी वर) झाली, तर अहंकाराचा भ्रम निर्माण होत नाही; पण जर या मीची प्लेसमेंट शरीरावर झाली, तर अहंकाराचा भ्रम निर्माण होतो.
– चंद्रशेखर खेर/ ९१३७४६४२९३.\\