अन्नू कपूर

आडनाव आले की, तो चित्रपटाचा हिरो असणार हे स्पष्ट असतं; पण काही कपूर असेही आहेत की जे नायक बनले नाहीत; पण त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यापैकी एक अभिनेता, निवेदक, संगीताचा अभ्यासक कलाकार म्हणजे अन्नू कपूर. आज त्याचा जन्मदिवस आहे. अन्नू कपूर हा गायक किंवा संगीत क्षेत्राची प्रचंड माहिती असलेला एक कलाकार आहे, याची माहिती संपूर्ण देशाला झी टीव्हीमुळे झाली. १९९३ ते २००६ या काळातील झी टीव्ही वाहिनीवरील अंताक्षरी या कार्यक्रमामुळे त्याला ख्याती प्राप्त झाली. तोपर्यंत तो छोट्या-छोट्या भूमिका करणारा एक विनोदी अभिनेता म्हणूनच ओळखला जात होता.

अन्नू कपूरची खरी ओळख प्रेक्षकांना झाली, ती दूरदर्शनवर आलेल्या कबीर या मालिकेमुळे. यातील कबीरांचा रोल त्यांनी चांगल्याप्रकारे केला होता. त्यामुळे एक चांगला कलाकार म्हणून त्यांची ओळख झाली; पण अंताक्षरीने त्याला ओळख दिली. त्यानंतर काही म्युझिक चॅनेलवर विविध प्रकारचे माहिती देणारे कार्यक्रम सादर करून त्यांनी या क्षेत्रातील आपली मास्टरी दाखवून दिली. काही दिवसांपूर्वी झी मराठीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स-२च्या अंतिम फेरीला ते आले होते. त्यावेळी बराच थकलेले असे ते दिसले; पण त्यांचा उत्साह मात्र अजून कायम आहे.
अन्नू कपूर यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळमधील इटवारा येथे २० फेब्रुवारी, १९५६ रोजी झाला. त्यांची आई कमल बंगाली आहे आणि वडील मदनलाल हे पंजाबी आहेत. त्यांच्या वडिलांची शहर आणि गावात काम करणारी एक पारशी नाट्य कंपनी होती. त्यांची आई कवी आणि प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होती. त्यांचे आजोबा डॉ. कृपा राम कपूर ब्रिटिश सैन्यात डॉक्टर होते आणि त्यांचे पंजोबा लला गंगा राम कपूर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक होते.

कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शिक्षणानंतर त्यांना शाळा सोडावी लागली. ४० रुपये पगारासह त्यांची आई एक शिक्षक म्हणून काम करीत होती. वडिलांच्या आग्रहाने ते आपल्या थिएटर कंपनीत रुजू झाले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे आधीचे विद्यार्थी असलेले त्यांच्या भावाने (रणजित कपूर) यांनी आग्रह धरल्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये प्रवेश घेतला. १९८१ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील पदवीनंतर त्यांनी मुंबईमधील ‘एक रुका हुआ फैसला’ या नाटकात ७० वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना कौतुकाचे पत्र पाठवले आणि १९८३च्या मंडी या चित्रपटासाठी त्यांना साइन केले.
त्यानंतर १९८६ मध्ये बासु चटर्जी यांनी एक रुका हुआ फैसला चित्रपटाचे दिग्दर्शन केले व अन्नू कपूर त्याचा भाग झाले. १९८४च्या उत्सव या चित्रपटासाठी त्यांना विनोदी भूमिका श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. १९९३ मध्ये त्यांनी सरदार चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका केली होती. हा हिंदी चित्रपट सरदार पटेल यांच्या चरित्रावर आधारित असून, मुख्य भूमिका परेश रावल यांनी केली होती. १९९६ मध्ये त्यांनी कालापानी या मल्याळम भाषेतील चित्रपटात विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारली.

तेजाब चित्रपटामध्ये त्यांनी केलेली भूमिकाही लक्षात राहणारी होती. त्याशिवाय मिस्टर इंडियातील त्यांची पोलीस हवालदाराची भूमिका लक्षवेधी होती. यातील केळी खाण्याचा प्रसंग त्यांनी लाजवाब केला होता; पण चित्रपट क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली असली, तरी जुन्या काळातील चित्रपटाचा इतिहास आणि जुन्या गाण्यांवर भाष्य करत कार्यक्रम करण्याची शैली त्यांनी निर्माण केली आणि वाढत्या वाहिन्यांच्या काळात म्युझिक चॅनेलचा ते हिरो बनले. नावात कपूर असेल, तर तो कोणत्याही मार्गाने हिरो बनतो, हे त्यांनी वाहिन्यांच्या जमान्यात करून दाखवले. त्यामुळे जुन्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते अधिक प्रिय आहेत. याचे कारण म्युझिक चॅनेलवर एखादे गाणे, चित्रपट, कलाकार यांची माहिती सांगताना ते ज्या प्रकारे जुन्या जमान्यात घेऊन जायचे, ते पाहता सगळे म्हातारे अगदी आपल्या तरुणपणात येतात. त्यामुळे त्यांचा हा आवडता कार्यक्रम होतो.
अन्नू कपूर निवेदन करताना ज्याप्रकारे भावूक होतात, तेही अनेकांना आवडते. अगदी अंताक्षरीच्या कित्येक कार्यक्रमांत एखादे गाणे गाताना, निवेदन करताना डोळ्यातून पाणी काढण्याचे कसब त्यांनी केले होते. अनेकांच्या जन्मदिवसाला विविध वाहिन्यांवर त्यांनी कार्यक्रम केले आहेत, म्हणूनच या अभिनेत्याचा वाढदिवसही प्रेक्षकांनी लक्षात ठेवला पाहिजे. सत्तरीकडे झुकलेला हा कलाकार सुरुवातीपासूनच पोक्त भूमिका करत राहिला. त्यांचा चेहरा आणि ठेवणच अशी आहे की, ते तरुण म्हणून कोणी त्यांना स्वीकारले नाही; पण लहान वयातच मोठ्या वयाच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्याने हा पोक्तपणा त्यांची ओळख बनत गेली असावी; पण एक गुणी अभिनेता म्हणूनच त्यांचा कायम उल्लेख करावा लागेल.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …