अनुकंपा तत्वावरील भरती

गेल्या महिन्याभरापासून अत्यंत चर्चेत असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसघांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. अर्थात त्या विजयी होणारच होत्या, कारण ज्यावेळी अनुकंपा तत्वावर, निधन झालेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील वारसदार, पत्नी, मुलगा, मुलगी यांना उमेदवारी दिली जाते, तेव्हा तो विजय निश्चित असतो. मतदारही अशा निवडणुकीत फारसे स्वारस्य दाखवत नाहीत. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तरीही तीन पक्ष विरुद्ध भाजप यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती, याचे आश्चर्य वाटते.

कोल्हापूर उत्तर या जागेसाठी १२ एप्रिल रोजी मतदान झाले होते. एकूण ६१.१९ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची उत्सुकता होती; पण वाढलेल्या मतदानाचा काँग्रेसला फायदा झाल्याचे दिसून आले. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजीत उर्फ नाना कदम यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने जागा राखली आणि भाजपची ती नव्हतीच, त्यामुळे भाजपचा पराभव म्हणता येणार नाही आणि काही गमावले, असेही म्हणता येणार नाही. पण, महाविकास आघाडीला ताकद दाखवून ही निवडणूक लढवावी लागली.

कोल्हापुरात सतेज उर्फ बंटी पाटील विरुद्ध महाडिक, असा पारंपरिक संघर्ष असतो. आजवर हा सामना कोल्हापूर दक्षिणमध्ये बघायला मिळायचा. पण, मागील काही निवडणुकांमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हा सामना पाहायला मिळाला, मग यात गोकुळ दूध संघाची निवडणूक असेल वा कोल्हापूर उत्तरची विधानसभा पोटनिवडणूक. सत्यजीत कदम यांचे आमदार सतेज पाटील यांच्याशी राजकीय वैर आहे. कदम हे महाडिक गटाचे कट्टर समजले जातात. त्यामुळे या विजयात सतेज पाटील यांचा वाटा मोलाचा होता.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले; पण राजकीय नेत्यांच्या बिनविरोधच्या हालचालींना सुरुंग लागला. काँग्रेसचे चंद्रकांत जाधव निवडून येण्याआधी उत्तरची ही जागा शिवसेनेकडे होती. अर्थात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे आमदार होते. त्यामुळे शिवसेनेने या जागेवर दावा केला. तसाच काँग्रेसनेही केला; पण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे महाविकास आघाडींतर्गतच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न सुरू होते. परिणामी, महाविकास आघाडीचे त्रांगड निर्माण झाले होते. जाधव या काँग्रेसकडून रिंगणात उतरणार की, महाविकास आघाडीकडून लढणार, हे स्पष्ट नव्हते. अखेर आघाडी धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तरची जागा काँग्रेसला सोडली. त्यामुळे हा विजय निश्चित झाला होता. विशेष म्हणजे जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. ‘अजूनही २४ तास बाकी आहेत. जयश्रीतार्इंना भाजपकडून लढण्यास सांगा. आता माझ्या सहीने ए बी फॉर्म देतो. नानाला अर्ज मागे घ्यायला सांगतो,’ असे जाहीर आवाहनच चंद्रकांत पाटील यांनी केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लागण्यापूर्वीही जयश्री जाधव यांना भाजपकडून तिकिटाची आॅफर दिली होती. मात्र, जयश्री जाधव यांनी विनम्रपणे ती नाकारत काँग्रेसकडूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सरतेशेवटी भाजपने उमेदवार दिला आणि पोटनिवडणूक लागली. भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. सत्यजीत कदम हे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत. उमेदवारी जाहीर होते न होते तोच त्यांनी प्रचारही सुरू केला होता. काँग्रेसकडून आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित होती. तसाच त्यांचा विजयही निश्चित होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात अत्यंत टोकाचे राजकारण सुरू असल्याचे सर्वांनीच पाहिले होते आणि त्याचीच प्रचिती कोल्हापुरातही आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात सतेज पाटील यांचा वरचष्मा राहिलेला दिसला. या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा, तर सुरू होत्याच; पण त्याबरोबरच स्थानिक मुद्यापासून ते राज्यातील मुद्यांवर फोकस करण्यात आला होता. चित्रा वाघ यांच्या प्रचारसभेत दगडफेक झाल्यावरूनही आरोप-प्रत्यारोप गाजले. ईडीचा मुद्दा थेट मतदारांवरील कारवाईपर्यंत आला; पण कोल्हापूरची रखडलेली थेट पाइपलाइन योजना, महापूर उपाययोजना, शाहू मिलच्या जागेवर गारमेंट पार्क, शहरातील रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, वाढलेली महागाई, बेरोजगारी याचे उत्तर दोन्ही बाजूंनी काही मिळालेच नाही आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले; पण मतदारांनी या प्रचाराला गांभीर्याने न घेता अनुकंपा तत्वावरील भरतीला प्राधान्य दिले, हे त्यामागचे सत्य आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने अनुकंपा तत्वावरील भरती रोखत विजय खेचून आणल्याने त्यांना इथेही अपेक्षा वाटत होत्या; पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. तरीही त्यांचे फारसे काही नुकसान झालेले नाही.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …