ठळक बातम्या

अटळ सत्य

भीतीचे अनेक प्रकार-उपप्रकार, शाखा-उपशाखा आहेत, पण आज तो आपला विषय नाही. निरनिराळ्या प्रकारच्या ‘भीती’ आपल्याला दिसत असल्या, तरी त्या प्रत्येक प्रकारच्या भीतीच्या मागे, तळाशी फक्त एकच कारण दडलेले आहे आणि ते म्हणजे ‘मृत्यू’! का कुणास ठाऊक, पण माणूस ‘मरू’ इच्छित नाही.
चुकून, कळत-नकळत जर या अंतरीचे त्या अंतरी समजले-उमजले आणि ‘त्याने’ प्रार्थना ऐकली आणि ‘तथास्तु’ म्हणाला, तर जगात किती गोंधळ होईल, याची कल्पनासुद्धा करता येत नाही.

तथ्यगत वास्तव हे आहे की, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माच्या क्षणापासून मृत्यूच्या छायेत वावरत असतो आणि कणाकणाने मरतच ‘मृत्यूची यात्रा’ करत असतो. ती यात्रा कधी संपते, हा दुसरा विषय आहे, पण हे वास्तव आपण जाणूनबुजून भीती पोटी नजरे आड करत असतो आणि जणू ‘हिरा है सदा के लिये!’ अशा थाटात जगत असतो. आपण कधी विचार केला आहे का की, आपल्या अंगावर वाढलेले आपले केस हे ‘मृत’ झालेले असतात आणि म्हणूनच ते कापताना आपल्याला वेदना होत नाहीत. तिच गोष्ट आपल्या वाढलेल्या नखांची आहे. नखे कापताना सुद्धा वेदना होत नाहीत. या उलट, शवागारात ठेवलेल्या मृत शरीरा वरचे केस, ती व्यक्ती मेली तरी, वाढत असतात. इतकेच काय, पण आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे की, सात वर्षांच्या कालावधीनंतर आपले पूर्ण शरीर टोटली दुसरे म्हणजे नवे झालेले असते. म्हणजेच जर एखादी व्यक्ती सत्तर वर्ष जगली, तर त्या व्यक्तीच पूर्ण शरीर दहा वेळा बदललेल असते. साप नाही का जिवंतपणी अनेकदा ‘कात’ टाकतो.
आपल्याच देहाबाबतची ही सगळी तथ्यगत सत्य जर नीट समजून उमजून पाहिली आणि त्यावर विचार केला तर एक गोष्ट लक्षात यायला हवी की, हे क्षणा क्षणाला तीळ तीळ संपून नवे रूप घेणारे आपले शरीर म्हणजे ‘मी’ नाही. ते शरीरापेक्षा काहीतरी वेगळेच आहे, की हे शरीर नव्हते तेव्हाही होते, शरीर आहे, तेव्हाही आहे आणि हे शरीर नसेल, तेव्हासुद्धा असेल. काळाच्या मर्यादेत(समय के दायरे में) असणारी आणि सतत बदलणारी गोष्ट ही स्वप्नासारखी (संपणारी) असते. पण ‘मी’ स्वप्न नाही. मी होतो, आहे आणि पुढेही असेन. पण देह हा सतत बदलत आहे. याची जर अनुभवातून समज (प्रचिती) आली, तर मृत्यूच भय उरणार नाही. त्यासाठी आपल्या मृत्यूच सतत स्मरण असणे आवश्यक आहे. घडत असलेले आणि घडणारे जर ‘अटळ’ आहे, तर त्याचे स्मरण असणे नक्कीच हिताचे आहे. संत गोरोबा अनुभवातून सांगतात, ‘तुझ्या चरणी वाहिला मी, देहभाव सारा! उडे अंतराळी आत्मा, सोडूनी पसारा!’

चंद्रशेखर खेर.(९१३७४६४२९३.)\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …