ठळक बातम्या

अजितदादा बदलले

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड बदलल्याचे दिसत आहे. त्यांच्यातील हा बदल स्वागतार्ह आहे. तितकाच राजकारणातील परिपक्वता आणि समंजसपणा म्हणजे नेमका कसा असला पाहिजे, याचे हे बदलते उदाहरण आहे. त्यामुळे एक तिसरा डोळा म्हणून त्यांच्याकडे बघितले, तर त्यातील सच्चेपण जाणवेल. कोणाला उगाच आशेवर ठेवायचे नाही, काय आहे ते स्पष्टपणे ऐकवायचे आणि मोकळे व्हायचे हा त्यांचा बाणा त्यांनी आता रागाच्या नाही तर समजुतीच्या जोरावर जपायला केलेली सुरुवात फार महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी शांतपणे भरलेला दमही सभागृहात महत्त्वाचा दिसतो आहे.
एसटीचे विलिनीकरण व्हावे म्हणून गेले दीड, दोन महिने संप चालू आहे. त्यावर समिती नेमली, न्याय प्रविष्ठ प्रकरण आहे. पण हे विलिनीकरण होणार अशा आशेवर सरकारने संपकºयांना थांबवले आहे, पण अजित पवारांनी विधिमंडळात स्पष्टपणे भाष्य केले हे फार बरे झाले. एसटीचे शासनात विलिनीकरण अशक्य आहे आणि पगारवाढ दिल्याने एसटी भाडेवाढ अटळ आहे. हे त्यांनी स्पष्टपणे सांगून जनतेला आणि संपकºयांना अंधारात ठेवायचे नाही असा घेतलेला पवित्रा योग्य आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी ६५ हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी विलिनीकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सूचक वक्तव्य केले. एसटीचे शासनात विलिनीकरण शक्य नाही, अशी रोखठोक भूमिका पवार यांनी मांडली. पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या मागणी संदर्भातील सरकारची भूमिका विलिनीकरण समितीचा अहवाल येण्यापूर्वीच स्पष्ट झाली आहे. म्हणजे आमची देण्याची इच्छा आहे, पण समितीच्या अहवालात तशी शिफारस नसल्याचे भासवून समितीची ढाल करण्याचे सरकारचे चाललेले प्रयत्न आणि कातडी बचाव धोरणाचे पितळ यातून अजित पवारांनी उघडे पाडले हे विशेष. अर्थात अजितदादांचा स्वभाव रांगडा, स्पष्टवक्ता आणि मनात काही न ठेवता बोलण्याचा आहे. त्यांनी कोणी अंधारात राहू नये यासाठी घेतलेली ही भूमिका महत्त्वाची अशीच आहे.
शुक्रवारी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेला विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले, एसटी कर्मचाºयांच्या मूळ वेतनात ५ हजारांची वाढ दिली आहे. त्यांचे वेतन महिन्याच्या १० तारखेच्या आत होईल. याची सरकारने हमी घेतली आहे, तरीही कर्मचारी संपावर अडून आहेत. आता कर्मचाºयांना मुंबईतल्या गिरणी कामगाराप्रमाणे अवस्था करून घ्यायची असेल, तर काही करू शकत नाही. मात्र शासनात एसटीचे विलिनीकरण शक्य नाही, असे ते म्हणाले. कामगार नेत्यांच्या हट्टापायी मुंबईतील गिरणी उद्योग संप करून कसा संपवला यावर नेमके बोट अजित पवार यांनी ठेवले हे योग्यच म्हणावे लागेल. त्यामुळे एसटी कर्मचाºयांनी आता तरी बोध घेतला पाहिजे आणि संप मिटवला पाहिजे असे वाटते.
पूर्वी भडकणारे, चिडचीड करणारे अजित पवार आता संयमी, शांत आणि समन्वय साधणारे नेते म्हणून समोर येत आहेत. हा त्यांच्यातील अपेक्षित असा पण अनपेक्षित बदल म्हणावा लागेल. २३ नोव्हेंबर २०१९ ला अजित पवार यांनी रात्रीतून भाजपबरोबर गुपचूप जात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे पहाटे सरकार स्थापन केले होते. त्याला रात्रीचा शपथविधी, पहाटेचा शपथविधी अशी माध्यमांनी प्रसिद्धी दिली होती. त्याविषयी अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत गंमतीशीर खुलासा केला. आम्ही सकाळी आठला शपथ घेतली होती, तुम्ही आपले सारखे पहाटे, पहाटे का म्हणताय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या नेमक्या वाक्याने माध्यमे आणि पहाटेचा शपथविधी म्हणणाºयांची त्यांनी शांतपणे आणि मिश्किलीत केलेली बोलती बंद हा पण चांगल्या बदलाचा परिणाम आहे.
१४ व्या विधानसभेसाठी आॅक्टोबर २०१९ मध्ये निवडणुका पार पडल्या. निवडणुकानंतर मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष वाटपावरून भाजप व शिवसेनेची युती तुटली. २३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा राजभवनावर शपथविधी पार पडला होता, मात्र अजित पवार स्वगृही परतल्याने हे सरकार दोन दिवस टिकले. यामागे खरेतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची खेळी होती. ते अजित पवारांचे बंड आहे असे भासवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांनी २० आमदारांची यादी दिली, ऐनवेळी कोणी बरोबर गेले नाही असे भासवून हा प्रयोग फसल्याचे दाखवले गेले, पण प्रत्यक्षात सरकार स्थापनेला खूप उशिर होत होता. काँग्रेसकडून काहीच निर्णय होत नव्हता. अर्थात काँग्रेसला निर्णय घेता येतच नाही. अजून अध्यक्ष पदाचा निर्णय त्यांचा झालेला नाही. त्यामुळे तुम्ही जर लवकर निर्णय घेतला नाही आणि सरकारमध्ये सामील झाला नाहीत, तर दुसरा पर्याय आहे असे दाखवण्यासाठी जाणत्या नेत्याच्या मार्गदर्शनानेच अजित पवारांनी हा गनिमी कावा केला होता. ते बंड असते तर शरद पवारांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली नसती, त्यांचे बंड मोडून काढताना शरद पवारांनी अजित पवारांना संपवले असते, राजकारणातून दूर केले असते. त्यामुळे या घटनेतील नेमका बदल काय आहे हे पण लक्षात घेतला पाहिजे. परंतु यानंतर अजित पवारांची भूमिका सतत सरकार सांभाळण्याची, सामंजस्याची आणि परिपक्व अशी राहिलेली आहे. हा बदल नक्कीच लक्षात घेण्यायोग्य आहे.
प्रफुल्ल फडके/ मुखशुद्धी\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …