‘माय बाबांनो, घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा. मुला-मुलींना शिकवा. अंध, अपंग, अनाथांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करा.’ – संत गाडगेबाबा
नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडरचे एक पान उलटले असे नाही, तर आपण अजून थोडे मोठे झालेलो आहोत, अनुभव संपन्न झालेलो आहोत. म्हणून या अनुभवाचा लाभ घेणे गरजेचे असते. नव्या वर्षात आपल्याला हेच करावे लागणार आहे. २०२० आणि २१ या वर्षांनी आपली जीवनशैलीच बदलून टाकली. या जीवनशैलीचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायही नव्हता. त्यामुळे आपल्या मनात अनेक भावना निर्माण झाल्या आहेत. राग आला असेल, दु:ख झाले असेल किंवा आपण यातून वाचलो आहोत याचा आनंदही झालेला असेल, पण म्हणूनच चाणक्यांच्या नीती वचनाप्रमाणे आपण कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घेतला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी नववर्षाच्या पहिल्याच लेखातून चाणक्यांच्या वचनाची आठवण करून देत आहे.
देवासूर संग्रामात आनंदात दिलेल्या वचनामुळे दशरथाला पुत्रशोकाचे दु:ख मिळाले होते. रागात उत्तर दिल्याने दुर्योधनाला सर्वस्व गमवावे लागले होते, तर दु:खात निर्णय घेण्यामुळे कर्णाला आपले मोठेपण गमवावे लागले होते. म्हणूनच मन स्थिर ठेवण्याचे कर्तव्य या वर्षात करायचे आहे. काहीही करताना विवेकाने विचार करायचा आहे.
गेल्या दोन वर्षांत तयार झालेली जीवनशैली आता रुजते आहे. २०२१ ला निरोप देताना पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुन्हा एकदा गर्दी कमी करण्यासाठी वर्क फ्रॉम होम काहींना करावे लागण्याची शक्यता आहे. अर्थात केवळ भारतातच नाही, तर जगभरात वर्क फ्रॉम होम ज्यांना शक्य आहे, त्यांना करावे लागणार आहे. जागेवरच आपण काम करू शकत असू, तर कशाकरिता लांबचा प्रवास करायचा? ते स्वीकारले पाहिजे. शिक्षणही आॅनलाइन पद्धतीने होत आहे, तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. समोर रागवायला, शिकवायला शिक्षक दिसत नाहीत याचा अर्थ आपल्याला आता स्वयंअध्ययनाची सवय लावून घ्यायची आहे. एकलव्याप्रमाणे आपल्याला स्वयंअध्ययनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे विद्यार्थी वर्गाने शिकायचे आहे. पुस्तकी ज्ञान २०२०-२१ मध्ये मिळाले नसेल कदाचित, पण व्यवहारी ज्ञान तर खूप मिळाले आहे. म्हणूनच आपल्याला जगण्याचे शिक्षण घ्यायचे आहे, त्यासाठी संघर्ष करायचा आहे, असा विचार करून प्रत्येकाने अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपल्यातील विवेक जागवला पाहिजे. हाच आपला २०२२ चा संकल्प असेल.
आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व कळले आहे. आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व कळले आहे. मग आता कोरोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. कोरोनावर लस आली आहे. जवळपास ७० टक्के जनतेचे लसीकरण झालेले आहे. नवीन वर्षात लहान मुलांचेही लसीकरण होणार आहे. पण आपण कोरोनामुक्तही होऊ, पण एवढ्यावरच थांबणार आहे का? असे प्रकार इथून पुढे वारंवार घडणार आहेत. त्यादृष्टीने आपण तत्पर असले पाहिजे. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असले पाहिजे. कोरोना गेल्या २ वर्षांपूर्वी फक्तचीनमध्ये होता म्हणून आपण नववर्षाचे स्वागत करताना गप्प होतो, पण आता तो जगभर पसरला. त्याला पासपोर्टची, व्हिसाची गरज लागत नाही. मग हा गाफीलपणा आपण सोडला पाहिजे. भारतात सरकारने ही परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारेच हाताळली आहे. एवढ्या मोठ्या देशात या रोगाचा झालेला प्रदुर्भाव हा अत्यंत कमी होता हे सकारात्मकतेने लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण सरकारने थोडी कडक पावले उचलली म्हणून, पण आता हा कडकपणा आपण आपल्या मनाने घेतला पाहिजे. मनाची बंधने लावून घेतली पाहिजेत.
त्यात सर्वात प्रथम म्हणजे कोणत्याही रोगाला रोखण्याचे काम औषधात नसते, तर ते स्वच्छतेत असते. आरोग्यं धनसंपदा आपल्याकडे म्हटले जाते ते यासाठीच. मी एकट्याने घाण केल्याने असा काय फरक पडणार आहे, असा विचार करणारे अनेकजण असतात, पण जाता जाता घाण करणाºयांची संख्या आपल्याकडे फार मोठी आहे. सध्या आपण जेव्हा लोकलने प्रवास करतो, तेव्हा सतत एक कॅसेट वाजत असते. मध्य रेल्वेचे आहे हे थुंकू नका अभियान. प्रत्येक स्टेशनला लोकल थांबली की, सर्वात प्रथम ही कॅसेट वाजते. हे आम्हाला का सांगावे लागते? तंबाखू, पान, गुटखा आणि काही नसले तरी उगाचच थुंकणाºयांची संख्या फार मोठी आहे. यातून किती जंतूंचा प्रादुर्भाव होत असतो. किती रोगांचा प्रसार होत असतो. आपण माणसे आहोत. रस्त्यात कुठेही घाण करणारी भटकी कुत्री, कबुतरांचे थवे आणि माणसे यात काही फरक आहे हे आम्ही समजले पाहिजे. वडापाव घेतला, समोसा घेतला, काही खायला घेतले की, त्याचे कागद टाका तसेच खाली. आपण आपल्या घरात असेच वागतो का?
या गोष्टी सभ्य, सुशिक्षित माणसांना या वर्षात सांगायला लागल्या नाही पाहिजेत. भारतमाता आपण म्हणतो. हा देश म्हणजे भारतमाता आहे. ही जमीन म्हणजे आपली माता आहे, याचा अर्थ आपण आपल्या आईवर थुंकतो. हे भान समजण्याची वेळ आलेली आहे. नवीन वर्षात साथीच्या रोगांना बळी पडायचे नसेल, तर स्वच्छता हे अस्त्र आहे, लसीकरण हा पर्याय आहे.