अग्रलेख : स्थितप्रज्ञ दुवा

एक ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचे मागच्या आठवड्यात निधन झाले. तशी त्यांच्या निधनाची बातमी काही महिन्यांपूर्वी पण दिली गेली होती, पण ती सोशल मीडियावरून जशा फेक न्यूज येतात आणि अनेकांना मारले जाते त्याप्रमाणे आली होती. त्यामुळे यावेळीही या बातमीवर विश्वास ठेवणे अवघड होते, पण नंतर त्यांच्या कन्येनेच ट्विट करून हे वृत्त खरे असल्याचे जाहीर केले आणि अतिशय वाईट वाटले. कारण खºया अर्थाने एक संयमी पत्रकार, सुसंस्कृत पत्रकाराचे, अभ्यासू पत्रकाराच्या निधनाने पोकळी निर्माण झालेली आहे. खरे तर पोकळी वगैरे शब्द हे अत्यंत कृत्रिम वाटतात, पण सध्याच्या माध्यम जगतातील आक्रस्ताळेपणा पाहता, बातमी घडवण्यासाठी वाटेल ते करण्याचा आटापिटा पाहता सत्य वृत्तापेक्षा खळबळजनक काहीतरी देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीत विनोद दुवांसारखे पत्रकारांचे जाणे हे पोकळी निर्माण करणारे आहे, असेच म्हणावे लागेल.

खरे म्हणजे विनोद दुआ यांच्या निधनामुळे माध्यमाची सखोल जाण असलेला रोखठोक पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला. त्याची भूमिक कोणाची मुलाखत घेताना असो वा वृत्तांकनाबाबत असो रोखठोक असायची, पण ती आदळआपट करणारी नव्हती तर कायमच वास्तवाचे संयमाने दर्शन घडवणारी असायची. म्हणूनच ती चिरस्मरणात राहील अशी भूमिका होती. आज तशा पत्रकारितेची डिजिटल माध्यमांना, वृत्तवाहिन्यांना गरज आहे.
देशात छोट्या पडद्यावरील पत्रकारितेचा पाया घालणाºया मोजक्या पत्रकारांमध्ये विनोद दुवा यांचे नाव अग्रस्थानी आहे. राजकारणापासून ते खाऊगल्ल्यांपर्यंत सर्व क्षेत्रांत समरसून पत्रकारिता करणाºया दुआ यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या कुटुंबातील दुआ यांचे बालपण नवी दिल्लीतील निर्वासितांच्या शिबिरांत गेले. त्यांचा विद्यार्थीदशेपासूनच व्यासपीठांवर आत्मविश्वासपूर्ण वावर होता. ‘युवा मंच’ या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण झाल्यावर, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले.

स्थितप्रज्ञता काय असते ती विनोद दुवा यांच्याकडे पाहून समजते. पत्रकाराने निर्विकार, निरपेक्ष असले पाहिजे हे त्यांच्या चेहºयावरून समजायचे. बातमी कुठलीही असली तरी त्याचा आनंद किंवा दु:ख झाले आहे असे कसलेही भाव दिसू न देता, समोरच्याची मुलाखत घेताना दुवांच्या मनातील भाव कधीही कोणाला थांगपत्ता लागू देत नव्हते. त्यामुळे अथांग मनाचा असा हा
स्थितप्रज्ञ प्रवृत्तीचा पत्रकार होता. ही किमया साधणे खºया अर्थाने महत्त्वाचे आहे. बºयाचवेळा आजकाल जे आपण खाजगी वाहिन्यांवर वृत्तांकने पाहतो, विश्लेषणे पाहतो यात न्यूज अँकर असो वा चर्चेत सहभागी आपली मते लादण्याचा प्रयत्न करतात, पण विनोद दुवा फक्त वस्तुस्थिती सहजपणे दाखवून देत होते आणि आपली मते पटवत होते, हे विशेष.

प्रणव रॉय यांच्याबरोबर सादर केलेल्या निवडणूक विश्लेषणामुळे ते जास्त प्रकाशझोतात आले. एक्झीट पोल हा १९८०-९० च्या दशकाच्या प्रारंभी त्यांनी सादर केलेला पहिला प्रयोग होता. तो खºया अर्थाने एक्झीट पोल होता. त्यासाठी प्रणव रॉय आणि विनोद दुवा यांनी केलेले प्रयत्न हे महत्त्वपूर्ण होते. खºया अर्थाने मतपत्रिका घेऊन त्यांनी एक्झीट पोलची सँपल गोळा केली होती आणि त्याचा अहवाल निवडणूक निकालापूर्वी जाहीर केला होता. तो जवळपास अचूक निघाला होता. १९८९ साली राजीव गांधींची सत्ता जाऊन व्ही. पी. सिंग यांच्या जनता दलाला चांगल्या जागा मिळतील हे वर्तवलेले या अंदाजाचे भाकीत खरे ठरले होते. कारण राजीव गांधी
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ते सत्तेपासून दूर होतील अशी कोणाला शंकाही नव्हती, पण हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. त्याचे दूरदर्शनवरून विश्लेषणही शास्त्रोक्तपद्धतीने केले होते. त्या काळात हा प्रकार संपूर्णपणे नवीन होता. त्यामुळे या धाडसाने सर्वांनाच चक्रावून सोडले.

कालांतराने थेट प्रसारणाचे तंत्रज्ञान त्यांच्या सवयीचे बनले, तेव्हा फक्त हातातील कागद वाचणाºया निवेदकांच्या तुलनेत जगभरातील घडामोडींबाबत सजगता आणि उत्स्फूर्तपणा हे दुआ यांचे वेगळेपण सर्वांच्या मनात ठसले. त्यांनी दूरचित्रवाणीत अनेक प्रयोग केले. केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रगतिपुस्तकही सादर केले. दिग्गज मंत्र्यांना सडेतोड प्रश्न विचारणारे, अशी त्यांची ख्याती असली, तरी रोखठोकपणा आणि उर्मटपणा यांतील सीमारेषा त्यांना ठाऊक होत्या. त्यांनी कोणाचा अनादर केला नाही, मुलाखत घेताना आपल्या हातात एवढे मोठेमाध्यम आहे म्हणून कोणाला अपमानीत केले नाही.
अवघड विषय सोपा करून दाखविणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. टीव्हीवरील ‘जनवाणी’, ‘परख’, ‘चक्रव्यूह’; तसेच वेब पोर्टलवरील ‘जन गण मन की बात’ अशा कार्यक्रमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत. हिंदी-उर्दू साहित्य आणि संगीताचे जाणकार असलेले दुआ दैनंदिन कार्यक्रमात दिवसभरातील घडामोडींचा खास शैलीत आढावा घेतानाच एक गाणेही सादर करीत. अत्यंत अभ्यासूपणे ते आपली कामगिरी चोख बजावत असत.

पत्रकाराने विविध विषयांत रूची दाखवली पाहिजे. जाणकार आणि अभ्यासू असले पाहिजे. सतत एकाच पठडीत अडकून पडले नाही पाहिजे हे त्यांनी आपल्या आणखी एका कार्यक्रमातून दाखवून दिले. हा त्यांच्या पत्रकारितेतील एक अनोखा आणि अनुकरणीय असा कार्यक्रम होता. म्हणूनच खाण्याचे शौकीन असलेल्या दुआ यांचा ‘जायका इंडिया का’ हा कार्यक्रम प्रचंड गाजला. रामनाथ गोएंका पुरस्कार मिळविणारे ते दूरचित्रवाणीचे पहिले पत्रकार ठरले. त्यांना
‘पद्मश्री’ने ही गौरविण्यात आले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाबद्दल त्यांना देशद्रोहाच्या खटल्यास तोंड द्यावे लागले होते. पण त्यांनी आपला तोल कधीही सोडला नाही, ढासळू दिला नव्हता. त्यामुळेच दूरदर्शन या सरकारी वाहिनीलाही वेगळ्या प्रकारच्या वृत्त मालिकांमधून एका उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्या संयमी, स्थितप्रज्ञ दुवांना चौफेर श्रद्धांजली.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …