अग्रलेख : साहित्य संमेलन हे वाचकाभिमुख व्हावे

शुक्रवारपासून नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. वैज्ञानिक साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले हे अत्यंत महत्त्वाचे साहित्य संमेलन आहे, पण गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन हे असाहित्यिकांची मांदियाळी आहे का?, असा प्रश्न निर्माण होतो आहे. किंबहुना साहित्य संमेलन हे विचारांचे व्यासपीठ न राहता ते वादांचे व्यासपीठ होताना दिसत आहे. त्यामुळे साहित्य संमेलन हे वाचकाभिमुख व्हावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने करावीशी वाटते.

साहित्य संमेलन हे नेमके कोणासाठी आयोजित केले जाते, हा एक फार मोठा प्रश्न आहे. कारण या संमेलनाला प्रेक्षक किंवा श्रोते म्हणून जे उपस्थित राहतात ते खºया अर्थाने साहित्यप्रेमी असतात. कोणा लेखकामुळे, कुठल्याशा पुस्तकामुळे प्रभावित होऊन आपली वाचनाची आवड जोपासणाºया आणि पुस्तकांच्या प्रेमात अव्याहतपणे राहणाºया वाचकांसाठी साहित्य संमेलन ही पर्वणी असते, पण आजकाल ही पर्वणी मिळते आहे का?, असा प्रश्न निर्माण होतो. यामागचे कारण म्हणजे वाचक ज्या पुस्तकांच्या, लेखकांच्या प्रेमात पडतो ते लेखक अशा संमेलनात असावेत. त्यांना पाहायला, ऐकायला मिळावे, अशी अपेक्षा त्या संमेलनाकडून व्यक्त होते, पण ज्यांच्या लेखनाने अनेक जण भारावून जातात, ज्यांचे लेखन सातत्याने सुरू राहिले पाहिजे, अशा लेखकांची अशा संमेलनात अनुपस्थिती असते. कोणीतरी एक पुस्तकी लेखक किंवा सुमार दर्जाच्या कवितांच्या कवींचे दरबार अशा कार्यक्रमावर वाचकांना समाधान मानावे लागते. त्यामुळे साहित्य संमेलन हे वाचकाभिमुख करणे आवश्यक आहे.
आजकाल गावोगावी आणि वेगवेगळ्या नावाने साहित्य संमेलने होताना दिसतात. तालुका पातळीवरील, जातीय गटांची, धार्मिक, स्त्रीवादी, बालसाहित्यवादी, प्रादेशिक, विभागीय अशाप्रकारे संमेलने घेऊन अनेकजण आपली हौस भागवून घेत असतात, पण अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हटल्यावर त्याचा दर्जाही तेवढाच असला पाहिजे. हा दर्जा भव्य-दिव्यतेपेक्षा समृद्ध असला पाहिजे. तिथे विविधता असली पाहिजे. पंढरीच्या वारीत ज्याप्रमाणे अनेक संतांच्या दिंड्या येऊन त्या मुख्य वारीत समाविष्ट होतात, त्याप्रमाणे ही छोटी-छोटी संमेलने त्या मुख्य प्रवाहात लीन होतील, असे वातावरण तयार केले पाहिजे. तेव्हाच ते वाचकाभिमुख होईल. आपल्याकडे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडीचा मार्ग गेल्या दोन वर्षांपासून बदलला आहे हे चांगले झाले, पण साहित्य संमेलनात ठरवले जाणारे कार्यक्रम, त्यातील वक्ते, आमंत्रित यांना बोलावण्याबाबतही सर्वसंमती आणि बहुमताचा विचार करण्याची गरज आहे. ही संमती त्या साहित्यिकाचे लेखन, पुस्तक, वाचकांच्या पडणाºया उड्या याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी प्रकाशक, वितरक यांच्याकडे असणारी आकडेवारी. सर्वाधिक वाचल्या जाणाºया पुस्तकाची माहिती विविध ग्रंथालये, पुस्तक विक्रेते यांच्याकडून घेण्यात यावी. त्यावरून लोकप्रियतेचा निकष लावून या लेखकांना या कार्यक्रमात बोलावले जाईल याबाबत आग्रह धरला पाहिजे. ज्यांची पुस्तके वाचली जातात असे लेखक आता या व्यासपीठावरून दिसेनासेच झालेले आहेत. त्यामुळे खºया अर्थाने जे साहित्यिक आहेत ते अशा प्रवाहातून बाहेर फेकले जात आहेत.

साहित्य संमेलन हे वाचक आणि लेखक, कवी यांच्याशी संवाद साधणारे असले पाहिजे. वाचकांमध्ये साहित्यिकांबद्दल असणारा आदर आणि प्रेम वाढीस लावणारे संमेलन असले पाहिजे. त्यामध्ये वाचकांचाही समावेश असला पाहिजे. साहित्य संमेलनाच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असणारे, त्या मंडळांच्या विविध शाखांवर निवडून जाणारे जे सदस्य आहेत, त्यामध्ये अनेकजण हे साहित्यिक नाहीत. त्यांनी कसलेही लिखाण केलेले नाही, पण केवळ आपल्याकडे कसले तरी पद असले पाहिजे या अट्टाहासापोटी राजकीय, आर्थिक वजन वापरून हे लोक अशा मंडळांवर जाताना दिसतात. लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार असला, तरी ज्यांचा साहित्याशी दुरान्वयानेही संबंध नाही, त्या लोकांचे तिथे काय काम असू शकते?, साहित्य संमेलन हा वाचक आणि लेखक यांच्यातील संवाद साधणारा उत्सव असला पाहिजे. वाचनाच्या या साहित्य प्रवाहात लेखक, प्रकाशक, वितरक आणि वाचक हे फार महत्त्वाचे घटक आहेत. ग्रंथालये अशा साहित्याला प्रेरणा देणारे फार मोठे प्रवाह आहेत. अशा ग्रंथालयांतील ग्रंथपालांना, ग्रंथप्रेमींना या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळाले पाहिजे. साहित्य संमेलनात दरवर्षी लाखो रुपयांची पुस्तकांची उलाढाल होत असते. पुस्तके प्रकाशित करणारे असंख्य प्रकाशक याठिकाणी आपले स्टॉल लावतात. त्यासाठी फार मोठा डिस्काऊंटही मिळत असतो. अशावेळी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करणारे पुस्तक विक्रेते यांना सन्मानाने वागवण्याची गरज आहे. गेल्या काही संमेलनांत प्रकाशक आणि आयोजक यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे अनेकांनी आपले स्टॉल उभे केले नव्हते. हा पुस्तक, लेखक आणि प्रकाशक तिघांचाही अपमान आहे. साहित्य संमेलनात असले प्रकार घडता कामा नये. खरेतर साहित्य संमेलनात पुस्तकांचा स्टॉल लावण्यासाठी ज्याप्रकारे स्टॉलचे भाडे घेतले जाते ते संपूर्णपणे चुकीचे आहे. साहित्यसेवेसाठी आलेल्या या पुस्तक विक्रेत्यांना हे स्टॉल संमेलनाने मोफत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सरकार जर लाखो रुपये मदत जाहीर करते, तर त्यातील काही भाग पुस्तक विक्रेत्यांना मोफत स्टॉल देण्यासाठी खर्च झाला, तर काय हरकत आहे? त्या विक्रेत्यांमुळे तुमची पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचतात म्हणून तुम्हाला प्रसिद्धी मिळते. ज्यांना प्रसिद्धी मिळते ते मानधन घेऊन तिथे आलेले असतात. मग प्रकाशकांना मानधन नाही निदान मोफत स्टॉल देण्यास काय हरकत आहे?, संमेलने वाचकाभिमुख होण्यासाठी पुस्तक विक्रेत्यांना चांगले प्रोत्साहन देण्याची गरज आहे. वाचकप्रिय साहित्य संमेलन होण्यासाठी अशा छोट्या सुधारणांची गरज आहे. संमेलनासाठी वाचक उत्साहाने येत असतो. त्याचाही कुठेतरी विचार होण्याची गरज आहे. वाचकाला बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळेल अशा काही कार्यक्रमांचा सहभाग करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने विविध स्पर्धा घेऊन वाचकांना पर्यायाने प्रेक्षकांना प्रवृत्त करून संमेलन वाचकप्रिय करावे, हीच अपेक्षा आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …