अग्रलेख : युगपुरुष

वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, महिलांचा अवमान, न्यायास होणारा विलंब, भ्रष्टाचार, प्रशासकीय अधिकाºयांचा गहाळ आणि गलथानपणा पाहिला, तर पुन:पुन्हा वाटते की, ही विस्कटलेली घडी बसवण्यासाठी राजे पुन्हा तुम्हाला जन्माला यावे लागेल. आज शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशाने त्यांच्यापासून प्रेरणा घेतली, तर महिलांबद्दल वाकडे बोलण्याची, त्यांच्याकडे वाईट दृष्टीने बघण्याची कोणाची हिमत होणार नाही. मुली, आया-बहिणी उजळ माथ्याने फिरू शकतील, असे राज्य फक्त छत्रपतींचा विचार, छत्रपतींची धोरणेच करू शकतात. आज त्यांची या देशाला गरज आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर ज्याच्या अंगावर रोमांच आले नाहीत, असा माणूसच शोधून सापडणार नाही. नुसती नावाची गर्जना केली, तरी एक प्रकारची ऊर्जा येते. त्या प्रत्यक्ष महाराजांचा इतिहास वाचला, तर किती तरी आनंद, ऊर्जा आणि अभिमान मिळाल्याशिवाय राहत नाही. आज जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रूपांतर होऊन हिंदूपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले. भारतातील सर्वात शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते.
छत्रपती शिवरायांचा महत्त्वाचा गुण म्हणजे कमालीचा साधेपणा होय. सैन्याबरोबर राहून त्यांनी सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगांना आनंदाने तोंड दिले. आज आपण जेव्हा अडचणींना, समस्यांना सामोरे जातो आणि आता काय करावे, हे सुचत नाही तेव्हा छत्रपतींचे स्मरण केले, तरी बरेच काही सुचू शकते. इतकी ताकद त्या व्यक्तिमत्वात आहे. संपूर्ण जगातील सेना नायकांच्या क्रमांकात शिवाजी महाराजांचे स्थान पहिल्या क्रमांकावरच आहे. १६४५-१६८० या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत सामर्थ्यशाली मोगलांचा किंवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किंवा मुस्लीम सेनानायक नव्हता की, ज्याचा महाराजांनी पराभव केला नाही. शहाजादे, इराणी व पठाण सरदार, तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायांपुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजल खानाशी केलेले युद्ध, शाहिस्ते खानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही, तर औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व गोष्टी त्यांच्यातील गुणांची प्रचीती देतात. कोणत्या वेळी नेमका काय निर्णय घेतला पाहिजे हे त्यांच्या रणनीती, युद्धनीती आणि राजकारणावरून समजून येते.

सामान्य माणसांसाठी जगणारा राजा अशी त्यांची ख्याती होती, म्हणून प्रत्येकाच्या मनात कैक शतकांनीही त्यांच्या मनात घर केलेले आहे. छत्रपती शिवरायांनी समानतेचे तत्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जाती-धर्मांच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य महाराजांनी निर्माण केले. शेकडो सेना धुरंधरांना शिवरायांनी प्रशिक्षित केल्यामुळे राजांच्यानंतरही निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मराठ्यांचे स्वातंत्र्य या लोकांनी जगाच्या पाठीवरील सर्व बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून सुरक्षित ठेवले.
शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असत. शहाजी राजांची सुटका, मोºयांचे उच्चाटन, अफजल खानाचा पराभव, स्वत:ची पन्हाळ्याहून सुटका, विशालगडावरचा चकवा, सुरतेची लूट, आग्य्राहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते.

केवळ पराकोटीचे मनोबल, धाडस आणि शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या या पराक्रमांतून दिसून येते. कुठेही आततायीपणा नाही, तर शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची त्यांची हातोटी ही त्यांच्या यशाचे रहस्य होते. अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय-धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते.
महाराजांच्या या कार्यांमुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रूपात पाहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाºया अधिकाºयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता, तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाºया व आचरणाºया महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.

समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारा राज्यकर्ता निर्माण करण्यासाठी छत्रपतींचा अभ्यास करणे हाच त्यावरचा उपाय आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपतींचा इतिहास समजावून घेतला पाहिजे. त्यांचा विचार रक्तात रुजला, तरच कायद्याचे, सामाजिक न्यायाचे, समतेचे राज्य निर्माण होईल. त्यालाच आपण शिवशाही म्हणू शकू.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …