अग्रलेख: मुक्त मोहन

गेल्या काही दिवसांपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. मोदींच्या धोरणाविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत, म्हणजे सत्तेत असताना जेवढे दहा वर्षांत बोलले नव्हते तेवढे धाडस त्यांनी सध्या दाखवले आहे, ही कौतुकाची बाब आहे. कदाचित काँग्रेसमधून गेल्या सात वर्षांत सरकारविरोधात बोलणाºयांवर कोणी विश्वास ठेवत नसल्याने आता मनमोहन सिंग यांना मौन सोडण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश असावेत. आता त्यांनी एखादी पत्रकार परिषद घेतली, तरी त्यात मध्येच घुसून त्यांची कागदपत्रे फाडण्याची चूक राहुल गांधी करणार नाहीत, कारण आता त्यांना मोदींविरोधात अधिकारवाणीने बोलणारे कोणी तरी हवे आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या तोंडावरची पट्टी काढलेली दिसत आहे. जे माजी पंतप्रधान मौन मोहन म्हणून ओळखले जात होते, त्यांना मुक्त मोहन करण्याचे केलेले काम ही काँग्रेसची यशस्वी खेळी आहे, असे म्हणावे लागेल.

सध्या पाच राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. प्रचारादरम्यान काँग्रेसवर टीका करणे एकवेळ समजू शकते; पण संसदेच्या व्यासपीठाचा वापरही मोदींनी काँग्रेसला आपले टीकेचे लक्ष्य करण्यासाठी केला. त्यामुळेच त्यांच्या टीकेला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. पंजाबमधील ११७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. त्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांची पंजाबी भाषेत ९ मिनिटांची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेसच्या दृष्टीने पंजाब महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि पंजाब शत्रू नाहीत, हे दाखवण्यासाठी काँग्रेसला शीख नेत्यांकडून समर्थन दिसलेपाहिजे. यासाठी काँग्रेसने मनमोहन सिंग यांची मुखपट्टी काढली. खरंतर प्रकृतीच्या कारणामुळे मनमोहन सिंग जाहीर कार्यक्रमात फारसे सहभागी होत नाहीत; मात्र एरवीचे आपले मौन सोडून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सत्तारूढ भाजपवर सडकून टीका केली आहे. किंबहुना हे मनमोहनास्त्र काँग्रेसने सोडले आहे. मोदी हे मनमोहन सिंग यांना मौन मोहन अशा शब्दांत खिजवायचे, त्यांचा उल्लेख करून काँग्रेसच्या काळात झालेली कामेच जनतेला आठवतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. मौन मोहन, कमकुवत पंतप्रधान, भ्रष्टाचारी सरकार अशी यथेच्छ टीका करून मोदी सत्तेवर आले; पण या सरकारचे आर्थिक आणि परराष्ट्र धोरण सपशेल फसले आहे, याची स्पष्ट शब्दांत जाणीव त्यांनी करून दिली आहे. मोदी सरकार सत्तेवर येऊन सात वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे; पण स्वत:च्या चुकीच्या धोरणाचे खापर ते काँग्रेस आणि पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्यावर फोडत आहेत. तसे करताना पंतप्रधान पदाची जी प्रतिष्ठा सांभाळायला हवी ती जाणीव मोदींना नाही, असाही टोला मनमोहन सिंग यांनी लगावला आहे. मोदी सरकारचा राष्ट्रवाद बनावट आणि पोकळ आहे, फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या धोरणाप्रमाणे मोदी सरकार वागत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ही टीका मनमोहन सिंग यांनी केल्यामुळे त्याला वजन प्राप्त होईल, ही काँग्रेसची रणनीती आहे; पण या टीकेचा नेमका फायदा काँग्रेसला काय मिळतो ते येत्या काही दिवसांत म्हणजे निकालानंतर समजेल; पण सिद्धूंची झालेली डोकेदुखी आणि पंजाबातील अंतर्गत संघर्षाचा फायदा विरोधकांना मिळू नये, यासाठी काँग्रेसने हे केलेले धाडस चांगले म्हणावे लागेल. किमान आता तरी त्यांना बोलू देणे महत्त्वाचे आहे, याची जाणिव त्यांना झालेली आहे. जेव्हा बोलायचे होते तेव्हा बोलले नाहीत; पण आता बोलून विरोधकांची बोलती बंद करण्याचे धोरण आखले गेले आहे हे नक्की.
भाजपला पंजाबमध्ये संधी नाही हे नक्की; पण भाजप विरोधातील मतांची विभागणी होणे हे पण काँग्रेसला परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी केलेली व्यूहरचना म्हणजे हे मनमोहनास्त्र आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष अस्ताला चालला आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे काँग्रेसलाच टीकेचे लक्ष्य करायचे, याचा अर्थ काँग्रेसचाच खरा धोका भाजपला आहे, याचीच एक प्रकारे कबुली काँग्रेसवर सतत टीका करून मोदी देत असतात, हे बिंबवण्यात काँग्रेस यशस्वी झालेली आहे.

खरंतर देशासमोर अनेक प्रश्न आहेत. विषमता वाढत आहे, रोजगार निर्मिती होत नाही, आरोग्य क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग वाढवणे, आर्थिक विषमता कमी करणे, रोजगार निर्मितीला चालना देणे आणि आर्थिक विकासाचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने सरकारकडे कोणतेही स्पष्ट कार्यक्रम दिसत नाहीत. हे बिंबवण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग यांनी केला. त्याचप्रमाणे शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाºया शेतकºयांच्या आंदोलनाची दखलही मोदी सरकारला घ्यावीशी वाटली नाही. हे त्यांनी ठासून सांगितले. वास्तविक हेच मुद्दे राहुल गांधी पण गेले अनेक दिवस सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नव्हते; पण मनमोहन सिंग यांच्या तोंडून ही टीका आल्यावर त्याचा चांगला परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी एकाचवेळी काँग्रेसला आणि भाजपला आपली ताकद दाखवून दिलेली आहे. पंतप्रधान असताना बोलू दिले नाही, त्यामुळे मौन मोहन हा शिक्का पडला, पत्रकार परिषदेतही घुसखोरी केली तरी आता पंजाब हातातून जाऊ नये म्हणून तारणहाराची भूमिका त्यांना करायला मिळाली हे फार महत्त्वाचे आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …