अग्रलेख – प्रश्न चेहºयाचा


सध्या देशभर भाजप विरोधात पर्याय देण्याची चर्चा विरोधकांकडून होते आहे. सातत्याने विरोधक एकत्र आले पाहिजेत म्हणून विविध नेते बोलत आहेत, पण या विरोधकांच्या आघाडीला चेहरा कुठला असणार हा खरा प्रश्न आहे. नेमकी हीच गोष्ट निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे साहजिकच २०२४ लाही भाजपला पर्याय मिळणार नाही हेच त्यांनी बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.

२०१४मध्ये भाजपसाठी इलेक्शन कॅम्पेनिंगचे नियोजन करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपविरोधातल्या विरोधी पक्षांच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात त्यांनी हे अगदी स्पष्टपणे सांगून भाजपची ताकद आणि बलस्थान नेमके काय आहे हे पण दाखवून दिले आहे. सध्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपविरोधी विरोधी पक्षांच्या आघाडीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत, मात्र यासंदर्भात प्रशांत किशोर यांची भूमिका वेगळी आहे. ती वास्तव आहे. शरद पवार कितीही चाणक्य असले, ममता बॅनर्जी वाघीण असल्या, तरी सर्व पक्षीय एकजुटीचा चेहरा म्हणून या दोघांना मान्यता मिळणार नाही. त्यामुळे जोपर्यंत चेहरा नाही, तोपर्यंत कोणतीही आघाडी ही व्यर्थच आहे.
प्रशांत किशोर यांच्या मते ममता बॅनर्जी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल म्हणतात की, हे एवढेच पुरेसे ठरणार नाही. फक्त विरोधकांनी एकत्र येणे भाजपला हरवण्यासाठी पुरेसे ठरणार नाही. तर विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र आले, तर एक मजबूत संघटन उभे राहाताना दिसू शकेल, पण त्या आघाडीने भाजपविरोधात निवडणूक जिंकणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. आपण याआधी देखील पाहिले आहे की, भाजपने अशा आघाड्यांना पराभूत केले आहे. दोन दिवसांपूर्वी मी काँग्रेसमध्ये जाणार होतो, पण असे म्हणून काँग्रेसकडे नेमका चेहरा नसल्याचे प्रशांत किशोर यांनी दाखवून दिले होते. राहुल गांधी हा काँग्रेसचा चेहरा होऊ शकत नाहीत, सोनिया गांधी थकलेल्या आहेत, घराणेशाही बंद करून तिथे लोकशाही मार्गाने अध्यक्षपद दिले, तर काँग्रेस पर्याय होऊ शकेल हे दाखवून दिले. त्यामुळे एकत्र उठाव करायचा असेल, तर मोठा आणि सर्वमान्य चेहरा लागेल हे नक्की. हा चेहरा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत भाजपला कोणी धक्का लावू शकणार नाही हे मात्र ठामपणे प्रशांत किशोर बिंबवत चालले आहेत. साहजिकच असा प्रश्न पडतो की, ते भाजपमधून लांब गेले असले, तरी भाजपसाठी काम करत आहेत का? ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवून देताना भाजपची तिथे ताकद वाढत आहे हे दाखवून बंगालमध्ये त्यांना बांधून ठेवले आहे का? जी खेळी भाजपने केजरीवाल यांच्याबाबतीत केली तीच खेळी ममतांबाबत झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विरोधकांना असलेला चेहºयाचा प्रश्न त्यांनी पुन्हा दाखवून दिला आहे.

प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचे उदाहरण दिले आहे ते फार महत्त्वाचे आहे. आपण उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये हे पाहिले आहे. समाजवादी, बसपा आणि इतर पक्ष मिळून भाजपविरोधात उभे राहिले. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आसाममध्ये देखील महागठबंधनला भाजपविरोधात पराभूत व्हावे लागले. हे जे काही घडले, त्यातून धडा घ्यायला हवा. फक्त भाजपविरोधात इतर विरोधी पक्षांनी एकत्र येणे हाच विजयाचा मूलमंत्र होऊ शकत नाही, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. विरोधी पक्ष अत्यंत छोटेछोटे आहेत. त्यांची ताकद त्यांच्या राज्यापुरती आहे. त्यांना देशाचे नेतृत्व करेल असा चेहरा मिळेपर्यंत भाजप सुरक्षित आहे. म्हणूनच भाजपला पराभूत करण्यासाठी असे म्हणत प्रशांत किशोर यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. भाजपच्या विरोधात फक्त विरोधी पक्षांच्या एकत्र येण्यामुळे लोक त्यांना मतदान करणार नाहीत. त्यासाठी विरोधकांकडे एक चेहरा असायला हवा. एक नरेटिव्ह असायला हवे. त्यानंतर इतर गोष्टी येतात, असे प्रशांत किशोर म्हणाले.
आज विरोधकांकडे राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, मायावती असे चेहरे आहेत. हे आघाडीपुरते सोयीसाठी एकत्र येतील, पण एकमेकांचे पाय ओढत राहतील. त्यातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसकडे नेतृत्व देण्याशिवाय पर्याय नसेल. पण काँग्रेसच चेहरा हरवून बसली आहे. त्यामुळे आघाडी करून काहीही होणार नाही हे त्यांनी बिंबवले आहे. म्हणूनच ते काँग्रेसकडे जाणे टाळत आहेत. चेहरा नसेल तर त्यांचे सारथ्य, रणनीती ठरवण्यात वेळ का घालवायचा असा विचार त्यांनी केलेला दिसतो.

एनडीएमधून बाहेर पडलेले शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे दोन्ही पक्ष अजूनही यूपीएचे घटक झालेले नाहीत. ममता बॅनर्जीही यूपीएचे अस्तित्व मानत नाहीत. शिवसेनेचे संजय राऊत घटकेत राहुल गांधींची बाजू मांडतात तर घटकेत शरद पवारांच्या नेतृत्वाचा विषय मांडतात. ही दोन्ही नेतृत्व बाकीच्या राज्यातील नेते मान्य करत नाहीत. त्यामुळे अजून दोन-अडीच वर्ष गेली तरी त्यांना चेहरा सापडेल अशी परिस्थिती दिसत नाही. याउलट भाजपकडे नवनवे चेहरे निर्माण होण्याची शक्यता आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …