अग्रलेख : पुन्हा दहशतीचे वातावरण

संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या विषाणूच्या दहशतीखाली आले आहे. आता हे जैविक हल्ले सततच होणार असे दिसत आहे, पण त्यामुळे पुन्हा निर्बंध लागण्याची भीती सामान्यांच्या मनात आहे. गोरगरीब आणि सामान्यांनाच नव्हे, तर उद्योग व्यवसायाला ही दहशत बसली आहे. ही दहशत संपवण्याची गरज आहे. आज दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटच्या भीतीपोटी जगभरातील देशांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने प्रवासावरील निर्बंधांचा समावेश आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबाबत दीर्घकाळ बैठक घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याबाबत विविध तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत, पण पुन्हा निर्बंध लागले, तर काय होईल याची भीती आज प्रत्येकाच्या मनात आहे. हे निर्बंध अगदी आज लागले नाहीत, तरी डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतात. ख्रिसमसच्या सणाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी हे निर्बंध नामक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता दिसू लागली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणू हा चिंतेचा विषय असल्याचे आधीच सांगितले आहे. कोरोना विषाणूचे अनेकवेळा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेले आढळून आले आहे. यानंतर जगभरातील देशांनी प्रवासाशी संबंधित काही नियम आखले आहेत. इस्रायल, पाकिस्तान आणि इंग्लंड या देशांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, तर इतर देशांनीही खबरदारी म्हणून विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे. जगभरातील देशांनी कोरोनाच्या नव्या विषाणूचा धसका घेत दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर निर्बंध आणले, मात्र इस्रायलने एक पाऊल पुढे टाकले आहे. परदेशातील नागरिकांच्या देशातील प्रवेशावर १४ दिवसांसाठी बंदी लावण्याच्या विचारात इस्रायल आहे. इस्रायलमध्ये या नव्या व्हेरिएंटचा आतापर्यंत एक रुग्ण आढळला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड आॅपरेशन सेंटर (एनसीओसी)च्या अधिसूचनेनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका पाहता, सात देशांवर प्रवासासंबंधी निर्बंध लागू केले आहेत. यानुसार दक्षिण आफ्रिका, लेसोथो, इस्वातिनी, मोझाम्बिक, बोत्सवाना आणि नामिबियामधून येणाºया आणि जाणाºया विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करणाºयांवर बंदीबरोबर देशामध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर केले आहेत. पुढील आठवड्यापासून दुकानात खरेदी करताना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना, मास्क परिधान करणे अनिवार्य असेल, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.
खरंतर जागतिक आरोग्य संघटनेला या व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाची माहिती २४ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेकडून मिळाली होती. त्याशिवाय बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर चार दिवसांत हाहाकार माजला आणि अन्य काही देशांत असे रुग्ण सापडू लागले.

महाराष्ट्रातही परिस्थिती आटोक्यात असली, तरी राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जाहीर करून खबरदारी घेतली आहे. हे चांगले असले, तरी लॉकडाऊनची भीती मात्र प्रत्येकाच्या मनात आहे. ओमिक्रॉनचा शिरकाव इकडे होता कामा नये, यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो आहे. पण सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्वांच्याच हिताचे आहे.
हा नवा विषाणू अतिवेगाने पसरतो आहे, अशी माहिती आहे. कोरोना पसरायला ज्या विषाणूला १०० दिवस लागत होते, तोच प्रसार हा विषाणू अवघ्या १५ दिवसांत करतो, अशी माहिती समोर आल्याने त्याची दहशत अधिक असणार आहे. काही वैद्यक तज्ज्ञांनी सध्याचे लसींचे डोस या नव्या विषाणूला तारू शकणार नाहीत, अशीही भीती घातल्याने प्रत्येकाच्या मनात भीती आहे, पण किती काळ घरात बसून राहायचे हा खरा प्रश्न आहे. हातावरची पोटं असणाºयांची अवस्था अशा सततच्या दहशतीमुळे वाईट होणार आहे. उपाशी मरण्यापेक्षा घराबाहेर पडून मरू, असा निर्धार आता प्रत्येकाच्या मनात आहे.

आता कुठे सुरळीत होण्याची चिन्ह दिसत होती. लसीकरणही चांगल्या प्रकारे झाले आहे. लोकल प्रवास, सार्वजनिक वाहतूक, दुकाने, हॉटेल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल सुरू होताना दिसत असतानाच पुन्हा निर्बंधाची निर्माण झालेली शक्यता ही प्रत्येकाच्या पोटात गोळा उभा करत आहे, असे दिसते. दीड वर्ष लागलेल्या निर्बंधांतून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत. आर्थिक घडी अजूनही बसलेली नाही. थांबलेले अर्थचक्र सुरू होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा हा नवा हल्ला आहे. ही आता एका जैविक युद्धाला सुरुवात झालेली आहे, अशी शक्यता आहे. कोरोनावर मात करण्याची चिन्ह दिसत असतानाच नवा विषाणू समोर येतो. असे हल्ले आता सातत्याने होणार असतील, तर कितीवेळ आपण बंदीस्त राहायचे हा पण प्रश्न आहे. हवेतून प्रसार होणारे विषाणू सोडण्याचे तंत्र महासत्तेचे स्वप्न पाहणारे देश अवलंबत असतील, तर त्याला विरोध करणेही अवघड आहे. पण आता या युद्धजन्य, विषाणूंचा वावर असलेल्या परिस्थिीतीतच आपल्याला कायम राहावे लागणार आहे, हे वास्तव स्वीकारले पाहिजे. हा ओमिक्रॉनही काही दिवसांनी जाईल, पण त्या जागी आणखी एखादा नवा विषाणू येईल. ही दहशत सतत चालू राहणार आहे. त्यामुळे या विषाणूंशी लढत लढतच आपल्याला पुढे जगायचे आहे, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …