आजचा तरुण हा खºया अर्थाने विचारी आहे. मुंबई चौफेरने किल्ले स्पर्धा घेतली. त्यावेळी या स्पर्धेत विजेत्या अनेक तरुणांशी संवाद साधल्यावर या तरुणांना काहीतरी करून दाखवायचे आहे हे दिसून आले. ज्याप्रकारे या वयातील तरुण काही विचाराने राजकारणाचा, सध्याच्या परिस्थितीचा विचार करतात हे पाहिले तर त्यांच्यावर कोणत्याही अपप्रचाराचा परिणाम होणार नाही हे दिसून येते. आजवरच्या निवडणुका या अफवा, अपप्रचार आणि गोबेल्स नीतीवर खेळवल्या गेल्या, पण आता जो नवमतदार या लोकशाहीत प्रविष्ठ होतो आहे ते पाहता त्यांची काही ठाम मते आहेत हे दिसून येते.
खरंतर लोकशाहीचे सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे. याची जाणिव तरुण पिढीत होते आहे हे विशेष. भारताचा प्रत्येक नागरिक अनेक नागरी आणि राजकीय प्रश्नांशी सातत्याने जोडलेला असतो. पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, गुणवत्तापूर्ण शिक्षण, चांगली आणि परवडणारी घरे, गर्दीमुक्त प्रवास, प्रसन्न बागा, सुसज्ज आणि प्रसन्न रुग्णालये, पात्रतेनुसार रोजगार अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकांना विनासायास मिळणे, हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. आपण प्रत्येक नागरिक हा लोकशाहीचा एक भाग आहे, याची जाणिव तरुणांमध्ये होते आहे हे महत्त्वाचे आहे. काय करायचे आहे मतदान करून, माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, अशी मते पूर्वीचा तरुण बिनधास्तपणे व्यक्त करत होता, पण आताचा तरुण तसा नाही, ही कौतुकाची बाब आहे. आम्ही मतदान करणार, आमच्या मताचा नेता निवडून देणार हा विचार तरुणांमध्ये रुजतो आहे हे चांगले आहे.
आपल्याला न्याय्य कायदे आणि नियम हवे असतील, तर आपण संसद व विधान मंडळात योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मताधिकार बजावला पाहिजे. तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता, आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल आणि खºया अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. विशेषत: बहुमत असूनही सरकारला झुकावे लागले हा तरुणांमध्ये गेलेला संदेश फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण काळजीपूर्वक मतदान केले पाहिजे आणि योग्य त्या सरकारला सत्तेत आणले पाहिजे, याचा विचार आजचा तरुण करतो आहे, नवमतदार करतो आहे हे विशेष. त्यामुळे हा नव्याने येत असलेला मतदार हा निर्णायक असा आहे.
लोकशाही सक्षमीकरणाच्या या प्रक्रियेत तरुणांनी सजग होऊन मोठ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सुचवल्याप्रमाणे शालेय विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यासंबंधीची परिपत्रकेही काढली आहेत. लोकशाही व्यवस्थेत सहभागाची सुरुवात म्हणून आपापल्या शाळा-महाविद्यालयांतील निवडणूक साक्षरता मंडळामध्ये सक्रिय सहभाग घेता येईल. एखाद्या शाळा-महाविद्यालयामध्ये तसे मंडळ स्थापन झालेले नसेल, तर शिक्षकांशी चर्चा करून ते स्थापन करण्यात पुढाकार घेता येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आपल्या देशाच्या लोकशाही सक्षमीकरणात तरुण पिढी पुढाकार घेणार नाही, तोवर अशी मंडळे खºया अर्थाने सक्रिय होणार नाहीत. दुसरीकडे, अशी मंडळे सक्रिय होणार नाहीत, तोवर आपली शाळा-महाविद्यालयांत शिकणारी उद्याची पिढी लोकशाही साक्षर होणार नाही. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने केलेली ही जागृती फार महत्त्वाची आहे.
लोकशाही म्हणजे केवळ मतदान, निवडणुका, शासन व्यवहार, न्यायालय नव्हे. हे लोकशाहीचे केवळ राजकीय रूप आहे. लोकशाही हा जीवनमार्ग व्हायचा असेल, तर ती समाजाच्या विभिन्न क्षेत्रांत पोहोचली पाहिजे, अगदी आपल्या कुटुंबातदेखील! आज भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत. त्यांचा बीमोड करायचा, तर नागरिकांनी लोकशाही मूल्ये म्हणजेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांतता, विकास, मानवतावाद या मूल्यांना प्राधान्य देणाºया लोकप्रतिनिधींची निवड केली पाहिजे. तसे झाले तरच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर होऊ शकेल. बाबासाहेबांनी नेहमीच तरुणांना साद घातलेली आहे. नव्या भारताची सूत्र तुमच्या एका मतावर दिली जाणार आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये होत असलेली ही प्रगल्भता फार महत्त्वाची आहे. निर्णायक अशी ही मते असतील.
भारतीय लोकशाही आता तरुण होत चाललेली आहे. सध्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण मतदारांची संख्या वाढते आहे. त्यामुळे आगामी काळात हा नवमतदार बदल घडवून आणणारा आहे. कोरोनाच्या काळानंतर अनेक तरुणांचा आपल्या कुटुंबाशी जवळून संबंध आला. घरात माणसे बसून राहिल्याने हरवलेला संवाद साधला गेला. वर्क फ्रॉम होम, आॅनलाइन शिक्षण, आॅनलाइन कामे यांमुळे देशाचे भवितव्य काय असणार आहे आणि आपल्याला नेमके काय केले पाहिजे याच्या दिशा अनेकांनी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे लोकशाही मार्गाचा वापर करण्यासाठी आपली भूमिका काय असली पाहिजे, याची जागृती तरुणांमध्ये झालेली आहे. म्हणूनच हे नवे वळण भारतीय लोकशाहीला स्वीकारावे लागणार आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुका या वेगळ्या असतील.