अग्रलेख : दोन वर्षे पूर्ण

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकार महिनाभरात कोसळेल, सहा महिन्यांत कोसळेल, लवकरच कोसळेल, अशा सातत्याने वल्गना करणाºया विरोधकांची तोंडं बंद करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे हे सरकार आता उर्वरित कालावधी पूर्ण करेल, यात शंका नाही, तरीही शुक्रवारी नारायण राणे यांनी राजस्थान, जयपुरात पत्रकारांशी बोलताना राज्यात मार्चमध्ये भाजपचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केली. वास्तविक अनेक मंत्र्यांची लफडी, भानगडी चव्हाट्यावर आली, राजीनामे देण्याची वेळ आली, तरीही या सरकारला कसलाही धक्का बसला नाही, हे विशेष आहे.

खरंतर दोन वर्षांची ही अडथळ्यांची शर्यत पार करणे सोपे नव्हते; पण शिवसेनेच्या बाण्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले. त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा म्हणतात, तसे या सरकारने कार्यकाळ पूर्ण केला, तर आता आश्चर्य वाटायला नको. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात आणि सरकारची दोन वर्षे साजरी करतात, ही निश्चितच स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी त्याची ओळख ही ठाकरे सरकार म्हणून आहे. त्याबाबत कोणाचेही दुमत नाही हे विशेष.
दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यापूर्वी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना कसलाही अनुभव नाही, ते कधी सभागृहात गेलेले नाहीत, इथपासून ते हे सरकार बाकीचे लोकच म्हणजे शरद पवार, अजित पवारच चालवणार इथपर्यंत टीका होत होती; पण सरकार चालवण्यासाठी केवळ अनुभवाची नाही, तर इच्छाशक्तीची, कल्पकतेची गरज असते, यावर कोणाचा विश्वास नव्हता. कोविडच्या काळात त्यांनी फेसबुक लाइव्ह करून मंत्री आणि जनतेशी सतत संपर्क साधला होता. घराबाहेर न पडताही काम करता येते, हे त्यांनी दाखवून दिले होते.

मुख्यमंत्र्यांना अनुभव नाही किंवा लॉटरी लागली म्हणणारे अनेक नेते होते. त्यात भारतीय जनता पक्षाचे लोकही होते. विशेष म्हणजे ते हे विसरले होते की, ज्यावेळी २० वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले, तेव्हा त्यांच्याकडे कुठे अनुभव होता? ते त्याअगोदर आमदारही नव्हते; पण सलग तीन टर्म त्यांनी गुजरातमध्ये राज्य केले आणि यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती झाली. अगदी गुजरातच्या विकासाचा पुतळा, आयडल अशीच त्यांची प्रतिमा तयार केली गेली. त्याचेच भांडवल करून नरेंद्र मोदी जर गुजरातचा विकास करतात, तर ते देशाचा किती छान विकास करतील, हे चित्र रंगवले गेले. मग मोदींना केंद्रात देशाचे नेतृत्व करण्याचे ठरवले गेले. त्यावेळी केंद्रातील त्यांना अनुभव कुठे होता? ते २०१४ ला प्रथमच खासदार म्हणून निवडून आले आणि थेट पंतप्रधान बनले; पण त्यावेळी लोकसभेचा अनुभव आहे का? असा प्रश्न कोणी त्यांना विचारला नव्हता; पण उद्धव ठाकरे यांच्याबाबत मात्र हा प्रश्न निर्माण केला गेला; पण त्याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाने उत्तर दिले हे विशेष.
खरंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. ऐन उमेदीच्या सुरुवातीच्या वर्षाच्या काळातच कोरोनाचे संकट आले आणि त्यांना वेगाने काम करता आले नाही; पण हे कोरोनाचे आव्हान पेलणे तितके सोपे नव्हते. ती परिस्थिती त्यांनी ज्याप्रकारे हाताळली ती अत्यंत कौतुकास्पद आहे. विशेषत: गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी संवाद साधत त्यांनी गेले दीड वर्ष जो कोरोनावर नियंत्रणाचा प्रकार केला आहे, हा निश्चितच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र हे एक मोठे राज्य आहे. संपूर्ण देशासाठी ते महत्त्वाचे आहे. मुंबईत केवळ देशाच्या कानाकोपºयातूनच नाही, तर जगभरातून लोक येत असतात. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र हे फार मोठे आणि महत्त्वाचे राज्य आहे. इथे जर या रोगाचा फैलाव झाला असता, तर संपूर्ण देश संकटात सापडला असता. दिल्लीसारखे छोटे राज्य आज काय परिस्थितीला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत सरकारने जो संयम दाखवला, काही कटू निर्णय घेतले ते फार महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे कोणाचीही अडचण होणार नाही, याची काळजी घेत सरकारने नागरिकांचे हित पाहिले. लोकल बंद ठेवल्या, सिनेमागृह बंद ठेवली, गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवले, शाळा, महाविद्यालये बंद ठेवली; पण कोणाच्या पोटाला चटके बसणार नाहीत, याची खबरदारी घेतली. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या काळात विजेचा तुटवडा पडू दिला नाही, कारण वर्क फ्रॉम होममुळे आणि लोक घरातच असल्यामुळे विजेचा वापर वाढला होता; पण कोणाची अडचण होणार नाही हे फार महत्त्वाचे होते. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंपासून कोणी वंचित राहिले नाही, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या काळात लोकांची गैरसोय झाली, तरी सरकारने टप्प्याटप्प्याने त्यात शिथिलता आणत सोयीही दिल्या, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्यात आणि कोरोनाला नियंत्रणात आणण्यात हे सरकार यशस्वी ठरले. आता तर सगळंच सुरू झालेले आहे. १ डिसेंबरपासून संपूर्ण शाळा सुरू होत आहेत.

आजही कोरोनाची पुढची लाट येण्याचे बोलले जात आहे; पण त्यापूर्वीच यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने जे प्रयत्न केले आहेत, ते फार महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनांना दिलेले आदेश, सूचना आणि त्यांची अंमलबजावणी पाहता कोणत्याही दुसºया लाटेला तोंड देण्यास हे सरकार सक्षम आहे, महाराष्ट्र याबाबत सक्षम आहे, हे दाखवण्यास हे सरकार यशस्वी ठरले आहे. आज ११ कोटी लसींचा टप्पा राज्याने गाठला आहे. लसीकरणात महाराष्ट्र नंबर वन आहे. सरकारने ज्या प्रकारे दोन वर्षे काढली ती नक्कीच कौतुकास्पद अशीच आहेत. एसटी संपाबाबत घेतलेली सरकारची भूमिकाही तितकीच ताठर आहे; पण त्यावरही तोडगा काढण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. पहिल्या वर्षी कोरोनाचा ताप होता, तर दुसºया वर्षात वाझे, देशमुख, परमबीर सिंग अशा वादांना तोंड देत या सरकारने चांगली कामगिरी केली, हे नक्की.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …