ठळक बातम्या

अग्रलेख : त्यांचे समर्पण आणि पुनर्वसन करा

गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० कमांडोंबरोबर झालेल्या चकमकीत कोटगुल-ग्यारापत्तीच्या जंगलात २६ नक्षलवादी ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. शनिवारी ही चकमक दिवसभर चालू होती आणि पोलिसांनी एकेकाला टिपून ठार केले. आपल्याकडे नक्षलवादी आणि पोलीस यांच्यातील चकमकी सातत्याने पाहायला मिळतात. अशाप्रकारे अधून-मधून मोठी कारवाई होऊन मोठा हिंसाचार घडण्याच्या घटनाही नियमित होत असतात. काय आहे हा नक्षलवाद नेमका, हे लक्षात घेतले पाहिजे. ते का अशाप्रकारे पोलीस, प्रशासनाच्या विरोधात जातात?

भारतात माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये १९६०च्या दशकात झाली होती. माओवाद्यांना नक्षलवादी असंही म्हणतात. पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात या भागात चारू मुजुमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे नक्षलवाद, असं संबोधलं जाऊ लागलं. ७०च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केलं. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली. त्यामुळे त्याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. आर्थिक विषमता दूर होत नाही, हे आदिवासी, नक्षलवादी मुख्य प्रवाहात येत नाहीत, तोपर्यंत या घटना घडत राहणार; पण यामुळे अक्षरश: काही जमातीच्या जमाती नष्ट होण्याची भीती आहे. त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. बºयाचवेळा मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पणही करतात, अशा बातम्या येतात. त्यांचे समर्पणानंतर पुढे काय होते याची माहिती समोर येणे गरजेचे आहे. त्यांचे पुनर्वसन झाल्याचे समोर आले, तर सगळे आत्मसमर्पण करतील; पण असे होताना दिसत नाही.
ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न झाला. गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले. मध्य भारतातील अनेक भागांत त्यांनी आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं आहे. या भागाला रेड कॉरिडॉर असं म्हणतात. झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेश या भागांत या चळवळीचा मोठा प्रभाव आहे. देशातील ११ राज्यांतील ९० जिल्ह्यांत ही चळवळ पसरली आहे. नक्षलवादी आणि प्रशासन यांच्या संघर्षात आतापर्यंत ६ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या चळवळीतील बंडखोरांच्या मते, ते स्थानिक आदिवासींच्या हक्कासाठी आणि ज्या लोकांकडे सरकारने लक्ष दिलं नाही, अशा लोकांच्या हक्कासाठी हे लोक लढत आहेत. अनेकवेळा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, राजकीय नेतेही मारले गेले आहेत; पण एकमेकांना मारून कोणताही प्रश्न सुटणार नाहीये. आमने-सामने बसून ही चळवळ थांबवली पाहिजे. त्यांचे पुनर्वसन आणि मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांचे शिक्षण, नोकºया, रोजगार, पारंपरिक व्यवसाय यासाठी प्रयत्न केले, तर ही चळवळ थांबेल. नक्षलवादी आणि प्रशासन, सरकार यांच्यातील दरी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

गेल्या काही वर्षांत म्हणजे अलीकडच्या काळातील काही हल्ल्यांचा विचार केला, तर हे प्रकार सातत्याने होणे, हिंसाचार होणे चांगले नाही. २४ एप्रिल, २०१७ला सुकमा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात २५ जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल झालेल्या हल्ल्यात १० ते १२ माओवादी ठार झाले होते. हे असेच सतत सुरू राहणे चांगले नाही. ११ मार्च, २०१७ ला झालेल्या हल्ल्यात छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यातील १२ जवानांचा मृत्यू झाला होता. त्याअगोदर २ फेब्रुवारी, २०१७ ला झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात ओडिशा पोलिसांतील ७ जवानांचा मृत्यू झाला होता. ही घटना कोरापूट भागात घडली होती. त्याचप्रमाणे १९ जानेवारी २०१६ मध्ये बिहारमधील औरंगाबाद भागात झालेल्या स्फोटात सीआरपीएफचे १० कमांडो मारले गेले. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत ४ नक्षलवाद्यांचाही मृत्यू झाला होता. २०१६मध्ये एका भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफच्या ७ जवानांचा मृत्यू झाला होता. २०१५मध्ये सुकमा विशेष कृती दलाच्या ७ सदस्यांचा मृत्यू झाला आणि १० लोक जखमी झाले होते. २०१४च्या फेब्रुवारी महिन्यात, दंतेवाडात ५ पोलिसांचा मृत्यू झाला होता. २०१४मध्येच गडचिरोलीत झालेल्या हल्ल्यात ७ पोलिसांचा मृत्यू झाला आणि २ पोलीस जखमी झाले होते. गेल्यावर्षी सी-६० पथकाने केलेल्या हल्ल्यात ३७ माओवाद्यांचा मृत्यू झाला होता.
गेली ५ दशके ही चळवळ चालू आहे; पण ती थांबवण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना आपण भारतीय आहोत, आपलेही जीवन सामान्यांसारखे असेल, असा विश्वास दिला पाहिजे. नेहमी निवडणुका आल्या की, त्या होऊ न देण्याचा इशारा हे लोक देत असतात. त्यांना निवडणुकीच्या प्रवाहात उतरता आले पाहिजे. त्यासाठी चर्चा करणे गरजेचे आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन कसे झाले आहे याची माहिती दिली, तर ते हातातील बंदुका खाली टाकून कामासाठी पुढे येतील.

नक्षलवादी पकडले, मारले, संपवले यातून काय होणार आहे? ते नव्याने तयार होत राहतील. त्यांच्या मागण्या काय आहेत, हे समजून घेतले पाहिजे. नक्षलवादी किंवा माओवादी म्हणजे काही दहशतवादी नव्हेत. ते आपले भारतीय मूळवासी आहेत. नक्षलवादी कधीही सामान्य माणसांवर हल्ले करताना दिसत नाहीत. त्यांचे हल्ले हे पोलीस आणि प्रशासनावर असतात. याचाच अर्थ त्यांचा व्यवस्थेविरोधात हा हल्ला आहे. त्यामुळे व्यवस्थेने त्यांना विश्वास देण्याची गरज आहे.

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …