अग्रलेख : जास्त ताणू नका

२८ आॅक्टोबरपासून सुरू झालेला एसटी कर्मचाºयांचा बेमुदत संप आता मिटण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतं आणि तो लवकरात लवकर मिटला पाहिजे. जास्त ताणून धरण्यात काहीही अर्थ नाही. घसघशीत पगारवाढ अता सरकार देण्यास तयार असेल, तर विलिनीकरणाचा आग्रह न धरता हा संप मागे घेणे सर्वांच्याच हिताचे आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत बराच काळ जाणार आहे. अशा परिस्थितीत थोडी सामंजस्याची भूमिका एसटी कर्मचाºयांनी घेणे आवश्यक आहे.
यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेनंतर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कर्मचाºयांची बैठक झाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह एसटीचे कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. कोणत्याही गोष्टीत थोडीशी तडजोड करणे महत्त्वाचे असते. महामंडळाच्या विलिनीकरणाचे काम एका रात्रीत होणारे नाही. त्यामुळे शासकीय सेवेत असणाºया कर्मचाºयांना जे लाभ मिळत आहेत, ते जर सरकार देण्यास तयार असेल तर हा संप जास्त ताणून न धरता मिटवणे योग्य ठरेल.
महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाºयांना आता अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यावर सर्वांचे एकमत होणे अपेक्षित आहे. एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावे या मागणीसाठी कर्मचारी आग्रही आहेत. या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी न्यायालयाने स्थापन करण्यास सांगितलेली समिती १२ आठवड्यांत अहवाल देणार आहे. तोपर्यंत पर्यायी मागणी मान्य करू पण संप मिटवा, असं आवाहन अनिल परब यांनी केलं होतं. त्याला समजूतदारपणे एसटी कर्मचाºयांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. अहवाल येईपर्यंत काम बंद ठेवणे, संप चालू ठेवणे हे कोणाच्याही हिताचे नाही.
गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाºयांचं आंदोलन सुरू आहे. भाजपनेही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. राज्य सरकारने बोलवलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. आता पडळकर आणि खोत यांची जबाबदारी आहे की, त्यांनी संपकºयांना समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, एसटी कर्मचाºयांचा पगार इतरांच्या तुलनेत कमी आहे. शिवाय पगार वेळेत मिळण्याची शाश्वती नाही, कर्मचाºयांच्या आत्महत्या होत आहेत, असे विषय आम्ही बैठकीत सांगितले. राज्य सरकार यावर तोडगा काढण्यास तयार आहे; पण संप मिटवायचा की नाही, हे कर्मचारी ठरवतील. त्यामुळे पुन्हा चर्चा करू. हे सर्वांनाच मान्य आहे; पण संप चालू ठेवायचे हे कर्मचारीच ठरवणार आहेत, तर पडळकर आणि खोत त्यांना पाठिंबा देण्यासाठी का गेले? त्यांचा पाठिंबा कर्मचाºयांनी मागितलेला नव्हता. त्यांचे नेतृत्व कोणी मान्य केलेले नव्हते. मग ही स्टंटबाजी केल्यासारखेच होईल ना? यासाठीच आता कर्मचाºयांना काय हिताचे आहे आणि काय नाही हे सांगण्याचा या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे. किरीट सोमय्या पण या संपात सातत्याने हजेरी लावत होते. त्यांनी आता कामगारांना समजावून सांगितले पाहिजे की, तूर्तास जी हंगामी वाढ दिली जाणार आहे, ती स्वीकारावी आणि समितीचा अहवाल आल्यावर पुढची दिशा ठरवावी.
यातून साध्य काय झाले आहे, याचाही विचार करावा लागेल. एसटीच्या जवळपास ९०० कर्मचाºयांना एसटी महामंडळाने दरम्यानच्या काळात निलंबित केलं आहे. बुधवारी आठ हजार कर्मचारी हजर झाले आहेत. वेटिंग लिस्टवरच्या कर्मचाºयांना कामावर नेमून एसटी चालवण्याचे प्रकार सरकारने सुरू केले आहेत. मग यात नुकसान कोणाचे होत आहे, याचा विचार केला पाहिजे. यावर सदाभाऊ खोत म्हणाले की, निलंबित कर्मचाºयांसोबतही आम्ही चर्चा करतोय. त्यांना हा पर्याय मान्य आहे का? हे पाहिलं जाईल. संप रबरासारखा ताणला तर तुटतो, त्यामुळे सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे; पण हे प्रयत्न तातडीने करणे आवश्यक आहे. एसटीचे विलिनीकरण व्हावे की नाही, याबाबत उच्च न्यायालयाने एका कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीकडून जो निर्णय देण्यात येईन तो आम्हाला मान्य असेल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. पण हा निर्णय येईपर्यंत अंतरिम वाढीचा प्रस्ताव आम्ही एसटी कर्मचाºयांना दिला आहे. त्यावर आता एकमताने मान्यता देऊन हा संप मिटवला पाहिजे हेच उत्तम.
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाºयांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली. संप सुरू असतानाच आगारात एका एसटी कर्मचाºयाने आत्महत्या केली. त्यानंतर ४ नोव्हेंबरला एसटी कर्मचाºयांची एक संघटना पुन्हा संपावर गेली आणि आगारांमधलं कामकाज ठप्प झालं. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी प्रमुख आहे. सरकारने सांगितलं आहे की, इतर मागण्या मान्य होऊ शकतात पण विलिनीकरण हे एका दिवसात होणार नाही. याचा सारासार विचार करावा लागेल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी वारंवार सांगितलं होतं. त्याचा कुठेतरी आदर राखण्याची गरज आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …