अग्रलेख – जखम मांडीला, मलम शेंडीला


कोरोना काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देखील नाइट कर्फ्यू अर्थात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय अनेकदा घेतला आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केल्यामुळे कोरोना पसरणार नाही का?, अशी शंकादेखील त्यावर अनेकदा काढली गेली. मात्र, तरीदेखील सरकारकडून रुग्णसंख्या वाढू लागताच नाइट कर्फ्यूचे निर्बंध लागू केले जातात. आता डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनीच यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे, तसेच भारत सरकारला अशा परिस्थितीत काय करायला हवे? याचादेखील सल्ला दिला आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवे, असे त्यांनी सांगितले. हे एकप्रकारे बरेच झाले. म्हणजे जखम मांडीला, मलम शेंडीला असा जो प्रकार होत आहे, त्यावरच हे नेमके बोट ठेवले आहे.

गेल्या वर्षभरात निर्बंध लादताना नाइट कर्फ्यू किंवा रात्रीची संचारबंदी हे धोरण सरकार राबवत होते. यामागे कोणती तार्किक संगती होती हे समजणेच खरेतर कठीण होते. कारण कोरोनाचे विषाणू काही रात्रीत बाहेर पडतात असे नाही. रात्रीचे घरात थांबल्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याला खरोखरच कसलाही आधार नव्हता. पण तरीही आपण काहीतरी करतो आहे हे दाखवण्यासाठी राज्य सरकार सातत्याने रात्रीची संचारबंदी लादत आले. त्यामुळेच सोनारानेच कान टोचले तर बरे असते असे म्हणतात. त्याप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी हे सांगितले ते बरे झाले. नाइट कर्फ्यूला आधार नाही. विषाणूला रोखण्यासाठी विज्ञानावर आधरित, पुराव्यांवर आधारित उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रोगप्रसार होऊ नये म्हणून गर्दी टाळणे हे सुसंगत आहे. पण तशीही रात्रीची गर्दी कमीच असते. अशावेळी रात्रीची संचारबंदी लादून या रोगावर नियंत्रण मिळवले असे म्हणणे तसे हास्यास्पदच आहे. आता मुंबईसारखे शहर रात्रभर सुरू असते. रात्रीची मुंबई पाहण्यासाठी पर्यटक यावेत, यासाठी खुद्द आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता, पण कोरोना आला आणि ते वास्तवात आले नाही. नाहीतर २०२०च्या २६ जानेवारीपासून रात्रीची मुंबई सुरू राहणार होती. अशा परिस्थितीत नाइट कर्फ्यू लावून काय साध्य होणार आहे?

खरेतर सार्वजनिक ठिकाणी होणारे जाहीर कार्यक्रम हे विषाणूच्या प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात. अशा जाहीर कार्यक्रमांमुळे, मनोरंजनाच्या ठिकाणी विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे अशा ठिकाणांवर निर्बंध टाकणे हे साहजिक आहे. यासाठी राजकीय गर्दी करणारे कार्यक्रम, सभा, निवडणुका यांवर बंदी घालण्याची गरज आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात काहीच अर्थ नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व कंपन्या, कारखाने, व्यवहार पूर्णवेळ चालू राहिले नाहीत. त्यामुळे अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली आहे. तीन शिफ्टमध्ये चालणारे उद्योग या रात्रीच्या संचारबंदीमुळे ठप्प झाले. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे, परंतु कोरोना रात्रीत पसरतो असा काही शोध कुठेच लागलेला नाही. कोरोनाचा विषाणू हा निशाचर आहे असे कोणीही म्हटलेले नसताना केवळ रात्रीच्या संचारबंदी, जमावबंदीला काहीच अर्थ नाही. आपल्याकडे रात्री ९ ते सकाळी ६ अशी संचारबंदी, जमावबंदी असते. जमावबंदी म्हणजे ४ पेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत, अशी दक्षता घेतली जाते. पण रात्री ९ नंतर धावणाºया लोकलही खच्चून भरलेल्या असतात. मग या जमावबंदीचा नेमका फायदा काय? त्यामुळे योग्य उपाययोजना करणेच आवश्यक आहे.
कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ लागला आहे. तिसरी लाट पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत रुग्णवाढीचा दरही वाढला आहे, पण हे काही एका रात्रीत घडलेले नाही. त्यामुळे कारण नसताना आता निर्बंध लादणेही चुकीचे आहे. कोरोनाबरोबर आता आपल्याला तहहयात जगायचे आहे, कोरोनाबरोबर जगण्याचे तंत्र आपण स्वीकारायचे आहे हे ठरल्यावर निर्बंध लादणेच चुकीचे आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या मनाचा निर्धार असला पाहिजे. निर्बंध आणि बंदी लादण्यापेक्षा प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे काम केले पाहिजे. खबरदारी न घेणाºया बेजबाबदार लोकांवर कारवाईचा बडगा उगारूनही बरेच काही साध्य होईल. मास्क न लावणारे, कुठेही कचरा करणारे, थुंकणारे लोकांवर नियंत्रण ठेवले तर बरेच काही साध्य होईल. त्यामार्गाने सरकारला महसूली उत्पन्नही दंडात्मक कारवाईतून मिळेल. विना मास्क फिरणाºयांना मोठा दंड करा. सुरक्षित अंतर न ठेवणाºयांना समज देणे, दंड आकारणे असे प्रयोग करणे आवश्यक आहे. बंद करून काही साध्य होणार नाही. बंद केल्याने फक्त अर्थव्यवस्था खिळखिळी होणार आहे. बंदमुळे फक्त डॉक्टर, हॉस्पिटल यांचे उखळ पांढरे होईल. एक ठाम आणि ठोस निर्णय आवश्यक आहे. कोरोनाच्या बरोबर आम्ही जगणार आहोत. त्याच्याशी लढत आमचे काम करणार आहोत. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर या शस्त्रांचा आम्ही वापर करणार आहोत. सुरक्षित अंतराची ढाल वापरणार आहोत, पण बंद न करता हे सगळे आम्हाला करता येईल.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …