आपली आत्मचरित्र लिहायची आणि त्यातून आपल्याच पक्षावर टीका करायची, मागच्या घटनांमध्ये काय चूक झाली हे व्यक्त व्हायचं ही काँग्रेसमध्ये प्रथा पडली आहे. अगदी माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापासून अनेक काँग्रेस नेत्यांनी आपली आत्मचरित्र लिहिली आणि त्यातून पक्षाकडून झालेल्या, पक्षनेतृत्वाकडून झालेल्या चुका त्यातून दाखवण्याची चढाओढ लागल्याचे दिसते; पण हे लोक आत्मचरित्रातून व्यक्त होतात. ते त्यावेळी का बोलत नाहीत, असा प्रश्न पडतो.
सध्या काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर टीका केली आहे. आपल्या पुस्तकात मनीष तिवारी यांनी लिहिलं आहे की, २६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. कोणतीही कारवाई न करणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, असंही त्यांनी लिहिलं आहे. मोदी सरकारचा धडाकेबाजपणा पाहून ही उपरती मनीष तिवारींना झाली असावी. ज्याप्रकारे मोदी सरकारने पुलवामाचा बदला घेतला, सर्जिकल स्ट्राइक केला, एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला, त्यामुळे मोदी सरकारबाबत जनतेच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. तशी भावना काँग्रेसला करता आली नाही, ही खंत मनीष तिवारींच्या पुस्तकात दिसते. वास्तविक पाहता काँग्रेसची ही प्रवृत्ती आणि दुबळेपणा १९९६नंतर बळावलेला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याचे धारिष्ट इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये होते; पण नंतरच्या काँग्रेसमध्ये मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह, पी. चिदंबरम असे नेते असल्याने त्यांना पाकिस्तानबाबत प्रेम असते. त्यांच्या तालावर नाचणारे राहुल गांधी पाकिस्तानची भाषा वापरताना दिसतात. साहजीकच मनमोहन सिंग यांना धडा शिकवण्याची इच्छा असली तरी ते राहुल गांधी, सोनिया गांधींनी करून दिले असते का?
मनीष तिवारी हे मनमोहन सिंग सरकारची ती चूक होती असे म्हणतात; पण मनमोहन सिंग यांना काही अधिकार होता का? ते तर नाममात्र पंतप्रधान होते. सोनिया गांधी त्यांच्या मागे उभ्या राहून सरकार चालवत होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या तालावर नाचताना मनमोहन सिंगांना हातही हालवता येत नव्हते. त्यामुळे ते खिशात घालूनच ते चालायचे. कधी नव्हे ती त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घुसून राहुल गांधींनी प्रेसनोट फाडून टाकल्या होत्या. हा त्या पंतप्रधानपदाचा सर्वोच्च अपमान होता, तरीही ते मुकाटपणे गप्प बसले. अशा परिस्थीतीत पाकला धडा शिकवायची मनमोहन सिंग यांची इच्छा असून, काय उपयोग होता? सोनिया गांधी, राहुल गांधींनी तशी परवानगी दिली असती का?, भारत-पाक संबंध जेवढे तणावाचे राहतील तेवढे या लोकांना हवेच होते. त्यामुळे मनमोहन सिंगांना अशा कृतीपासून रोखलेही असेल; पण मनीष तिवारींनी तेव्हाच हे मत का व्यक्त केले नाही. आज तेरा वर्षांनी त्यावर तोंड उघडून काय फायदा आहे?, सरसकट सगळे काँग्रेस नेते आपले आत्मचरित्र लिहित आहेत आणि पक्षाच्या चुका दाखवत आहेत; पण त्यावेळी त्या चुका होऊ नयेत हे सांगण्याचे धारिष्ट नव्हते. याचा अर्थ काँग्रेसमध्ये कधी लोकशाही हा प्रकार नव्हता. इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणीपूर्वी जेव्हा काँग्रेसची खूण गाय वासरू होती, तेव्हा एक गाय आणि बाकीचे सगळे नंदी बैल आहेत, असे बोलले जात होते. आता हाताचा पंजा खूण घेतल्यावर तर थांबा कोणी बोलायचं नाही, असाच त्यांचा बाणा झाला. त्यामुळे लोकशाही नसल्याने कोणाला मत मांडण्याचा अधिकार नाही, साहजीकच ती मते कालांतराने कोंडलेली वाफ बाहेर पडावी तशी पुस्तकातून बाहेर पडताना दिसत आहे.
त्यामुळेच मनीष तिवारी आपल्या पुस्तकात म्हणतात, जेव्हा एखादा देश (पाकिस्तान) निर्दोष लोकांची कत्तल करतो आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा खेद व्यक्त करत नाही. त्यावेळी संयम दाखवणं ही ताकद नसून कमकुवतपणाचं लक्षण आहे. २६/११ च्या वेळी एक अशी संधी होती की, जेव्हा शब्दांपेक्षा प्रत्युत्तर देत कारवाई करणं गरजेचं होतं. तिवारी यांनी या मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ च्या हल्ल्याशी करत भारताने कठोर कारवाई करायला हवी होती, असं मत व्यक्त केलं होतं; पण तरीही त्यावेळी तोंड उघडता आलं नाही हे तितकेच चुकीचे आहे.
खरंतर याआधीही मनीष तिवारी यांनी पक्षावर टीका केली होती. या आधी पंजाबमधल्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करत ते म्हणाले होते की, ज्यांना पंजाबची जबाबदारी दिली होती, त्यांना त्याची अजिबात जाणीव नाही. यासोबतच तिवारी यांनी कन्हैया कुमारच्या पक्षप्रवेशावरही प्रश्न उपस्थित केला होता. कन्हैया कुमारला काँग्रेसमध्ये घेऊन राहुल गांधींनी खरोखरच खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे मनीष तिवारी यांनी केलेली टीका योग्य आहे. या पुस्तकात तिवारींनी लिहिलं आहे की, एअर चीफ मार्शल फली मेजर यांनीही सांगितलं होतं की, या हल्ल्यानंतर वायूसेनेला कारवाई करण्याची इच्छा होती; मात्र तत्कालीन सरकारने कारवाई करण्यास मनाई केली. पूनावाला यांनी असाही आरोप केला आहे की, काँग्रेस त्यावेळी या मुंबईत झालेल्या हल्ल्यासाठी हिंदूंना जबाबदार ठरवलं आणि पाकिस्तानचा बचाव करण्यात व्यस्त झाले. ही अत्यंत वाईट बाब आहे. काँग्रेसची पाकधार्जिणी प्रवृत्ती मनीष तिवारींनी दाखवून दिली आहे हे नक्की. पाकला खूश करण्यासाठीच तर ३७० कलम पुन्हा लागू करण्याची भूमिका काँग्रेस घेत आहे.