अग्रलेख – केल्याने होत आहे रे

आज दासनवमी. समर्थ रामदास स्वामी यांची पुण्यतिथी म्हणजे दासनवमी ही अतिशय श्रद्धेचा दिवस असतो. रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणा‍ºया समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.

हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा समर्थांचा बाणा होता. लग्नमंडपातून पलायन केल्यानंतर आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते १२ वर्षे राहिले. यावेळी ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली. तीच करुणाष्टके म्हणून ओळखली जाते. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते.
समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले, तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापना करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले.

भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांची व समर्थांची भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले- आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता? तेव्हा गुरू हरगोविंद म्हणाले- एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले- आणि हा सारा फौजफाटा? त्यावर हरगोविंद म्हणाले- धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे की, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्र सज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे. त्यानंतर समर्थ गुरू हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले. बाहेरून दिसायला कुबडी. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते. भारत प्रवास करीत असताना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत. गुरू हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. यानंतर समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली. हनुमान ही शक्तीची देवता. हनुमान मंदिरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत.
समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती. दाट झाडीत आणि रम्य वनश्रीत त्यांचे मन रमत असे. समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत. समर्थांचे एक वैशिष्ट्य होते. समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ती संपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.

आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत, परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणा‍ºया परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. जगातील सर्व देशांत आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षांपूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले की, केल्याने होत आहे रे ेआधी केलेचि पाहिजे॥ ही समर्थांची शिकवण जगाला आजही प्रेरणादायी अशीच आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …