अग्रलेख : उष:काल होता होता…


पुन्हा सर्व सुरळीत सुरू होईल, असे वाटत असतानाच तिसºया लाटेचे संकेत येऊ लागले आहेत. ओमिक्रॉनचे वाढते रुग्ण आणि कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आता चिंतेची बाब झालेली आहे. म्हणजे कोरोनाला पराभूत करू आणि पुन्हा नव्याने जीवन सुरू करू हे स्वप्न पाहत असताना, पुन्हा अंधाराकडे जाणार का, अशी भीती निर्माण होत आहे. कोरोनाचे वादळ पुन्हा घोंगावत आहे, असे आजचे चित्र आहे. म्हणजे उष:काल होता होता काळरात्र झाली, असे म्हणायची वेळ आली आहे.

अर्थात हे स्वप्न फक्त भारतातच पाहिलं जात होतं असं नाही, तर संपूर्ण जगभरात कोरोना आता संपत आहे, अशी समजूत झालेली होती. पण, ही समजूत चूक असल्याचे अनेक देशांच्या लक्षात आले आहे. विशेषत: युरोप, कॅनडा, जपान, अमेरिका या देशांमध्ये पुन:पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ही नवी लाट आहे, असे चित्र उभे राहत आहे. ही लाट आहे की, या युद्धातला पुढचा हल्ला आहे, हे आता समजून घेतले पाहिजे.
सातत्याने काळजी घेऊन, कोरोनाला नियंत्रणात ठेवून, निर्बंध पाळून आणि आरोग्यसेवा भक्कम बनवून हा विषाणू असतानाही चालत राहायला हवे, याची जाणीव आज सर्वांना झालेली आहे. आता आपल्यालाही तेच शिकावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी अचानक भाषण केले आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात रात्री ९ ते सकाळी ६ या काळात नव्याने लागू झालेले निर्बंध यांचा तोच अर्थ आहे. त्यामुळे पुन्हा हळूहळू लॉकडाऊनच्या दिशेने आपण जाणार का, अशी भीती निर्माण झालेली आहे. सतत नवा अवतार घेऊन कोरोना येत आहे. त्याचा परिणाम कोरोना रुग्णवाढीवर होत आहे. डेल्टा असो की, ओमिक्रॉनसहित विविध अवतार धारण करून कोरोना येत आहे. हे कधी थांबणार आहे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. या चक्रातून एकदा बाहेर पडण्याची प्रत्येकाची इच्छा असताना, पुन:पुन्हा रुग्णवाढ होत आहे.
विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटननेने २०२२ हे वर्ष कोरोनाच्या थैमानाचे अखेरचे वर्ष असेल, असे म्हटले होते, पण ओमिक्रॉन ज्या वेगाने पसरतो आहे, तो वेग पाहता आरोग्य संघटनेने हा अंदाज मागे घेतला आहे, ही तितकीच चिंतेची बाब आहे. याचा अर्थ जगाचे अर्थकारण आणि लोकजीवन अजून किमान दीड ते दोन वर्षे कोरोनाच्या प्रभावाखाली राहणार आहे हे नक्की, म्हणजे एकीकडे कोरोनापूर्व स्थितीत येण्याचे स्वप्न पाहत असतानाच ते लांब लांब जाताना दिसत आहे.

पहिलं, दुसरं महायुद्ध जसं चार-चार वर्षे चाललं होतं, तसंच हे युद्ध आता २०२२मध्ये कोरोनाच्या महामारीच्या महायुद्धात पुढच्या वर्षात प्रवेश करत आहे, असे दिसते. नेमकी ही दीर्घ काळ चालणारी लढाई असल्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांच्या चार दिवसांपूर्वीच्या भाषणातून स्पष्टपणे दिसून आली. आजवर ‘बुस्टर’ या तिसºया लसमात्रेविषयी अधिकृतपणे काही बोलले जात नव्हते. आता मात्र, मोदींनी आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच साठी उलटलेल्या ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्याने तिसरा डोस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, पंतप्रधानांनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना डोस देण्याचे घोषित केले. हा वयोगट येत्या काही आठवड्यांत आणखी खाली येईल. लवकरच सुरू होणाºया नव्या वर्षात लसीकरणाचे किती प्रचंड मोठे आव्हान केंद्र तसेच राज्य सरकारांच्या पुढे उभे आहे, हे यातून लक्षात येईल. खरंतर आता लसीकरण जितक्या वेगाने पूर्ण होईल; तितका कोरोनाच्या लाटांचा तडाखा कमी होऊ शकेल. अर्थात, वारंवार आपली रचना बदलणारा विषाणू आणि त्याच्याशी चाललेले हे युद्ध किती काळ चालेल हे सांगताच येणे कठीण होऊन बसले आहे, पण यामध्ये सर्वात नुकसान हे नव्या पिढीचे, भावी पिढीचे होत आहे. कोरोनामुळे बंद राहणाºया शाळा, आॅनलाइन शिक्षण, अभ्यासक्रम वगळणे यामुळे शिक्षणाच्या हक्कापासून ही पिढी अर्धवट ज्ञान प्राप्त करत आहे. त्यामुळे घरात सतत बसल्याने त्यांचे वजन वाढणे, लिखाणाचा वेग कमी होणे, परीक्षेला अर्धातास वेळ वाढवून देणे, यामुळे नवी पिढी मंद होत आहे, तिचा प्रगतीचा वेग मंद होत आहे, हे फार वाईट आहे.
ही नवी लाट फोफावू नये, म्हणून आणि नववर्ष स्वागत, ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात लग्नसमारंभ, जाहीर कार्यक्रम, उत्सव, क्रीडा स्पर्धा यांच्यासहित बहुतेक सार्वजनिक कार्यक्रमांवर नवे निर्बंध आले आहेत. या नव्या निर्बंधांमुळे गेले काही महिने थोड्याशा सुरळीत झालेल्या समाजजीवनाला नव्याने ब्रेक लागला आहे. अर्थात अनेक जण दोन डोस घेतल्यानंतर बिनधास्त झाले आणि मास्कचा वापर टाळू लागल्याचे चित्र दिसले. प्रत्यक्षात, नियम आणि निर्बंध पाळून व्यवहार करण्याची शिस्त लावून घेण्याची आवश्यकता आहे. पण तरीही आम्ही सुधारत नसलो, तर पुन:पुन्हा लाटा येतील आणि पुन:पुन्हा निर्बंध येतील. येणारी पहाट तिथेच ठप्प राहील आणि आता उजाडायचे आम्ही थांबवून ठेवू असे चित्र आहे, म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे, बेजबाबदारपणा सोडला पाहिजे आणि स्वयंशिस्तीने हा लढा लढला पाहिजे, हे नक्की.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …