एसटी कर्मचाºयांच्या संपात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची हजेरी म्हणजे खरंतर आयत्या घरात घरोबा, असाच तो प्रकार होता. वेळ आल्यावर बरोबर कलटी मारत त्यांनी माघार घेतली; पण यामुळे भाजपची नाचक्की झाली हे नक्की. खरंतर बुधवारीच राज्य सरकारने भरघोस पगारवाढ जाहीर करून संप मागे घेण्याचे आवाहन केले, त्या वाटाघाटीतही हे दोघे होते; पण विलिनीकरणाशिवाय कर्मचारी ऐकणार नाहीत, हे दोघांना माहिती असल्यामुळे त्यांची गोची झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी संप मागे घेण्याचे आवाहन या दोघांनी करावे, अशी जबाबदारी टाकून या दोघांना कोंडीत पकडले आणि त्या दोघांचेही चेहरे पडल्यासारखे दिसत होते. चार दिवसांपूर्वीचा आवेश हा गळून पडला होता. सरकारचे म्हणणे एकीकडे पटत होते, तर दुसरीकडे कामगारांना समजावून सांगणे शक्य नव्हते. संप मागे घ्या सांगणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत गुरुवारी निर्णय झाहीर करू, असे सांगून वेळ मारून नेली.
पण गुरुवारी सकाळी मात्र आम्ही दोघे माघार घेत आहोत, संप सुरू ठेवायचा की नाही, हे कर्मचाºयांनी ठरवावे, असे जाहीर करून या आयत्या घरातला घरोबा त्यांनी संपवला, म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेलं एसटी कर्मचाºयांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे, अशी सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात घोषणा केली. राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे.
खरंतर हा संप नेतृत्वहीन, असा संप होता. विविध संघटनांच्या नेत्यांनी फसवलं म्हणून आम्ही संपावर आहोत, आमचे कोणी नेते नाही, आम्ही सर्व जण मिळून सहकुटुंब संपावर आहोत अशी भूमिका चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाºयांची होती. यामध्ये विलिनीकरणाचा मुख्य मुद्दा असला, तरी इतक्या कमी पगारात आम्ही जगायचं कसं, घर चालवून दाखवा असा सतत सूर होता. आता गेले दोन दिवस आमची पगारवाढीची मागणी नाहीच, असे जरी हे कर्मचारी म्हणत असले तरी सातत्याने आपल्या पगाराच्या स्लीप मीडियापुढे दाखवून हेच कर्मचारी दहा दिवसांपूर्वी चौदा हजारात घर चालवून दाखवा, असे सांगत होते. त्यामुळे तातडीचा उपाय म्हणून सरकारने घसघशीत अशी भरघोस पगारवाढ केली. विलिनीकरणाचा निर्णय तातडीने होऊ शकत नसल्याने आता पगारवाढ तरी देऊ, अशी सरकारने रास्त भूमिका घेतली. यावेळी कामगारांचे शिष्टमंडळ आणि या संपाला पाठिंबा देणाºया सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर या आमदारांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले. सन्मानाने त्यांची बाजू सरकारने ऐकून घेतली आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; पण हा संप सुरू करणे जसे या दोघांच्या हातात नव्हते, तसेच संप मिटवणेही या दोघांच्या हाताबाहेरचे काम होते. त्यामुळे ही जबाबदारी टाकून राज्य सरकारने भाजपच्या या दोन नेत्यांना चांगलेच अडचणीत आणले.
बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाºयांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचाºयांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर गुरुवारी आझाद मैदानातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली. सरकारने सांगितलं आहे की, राज्य सरकार निधी महामंडळाला वर्ग करेल. महिन्याला १० तारखेच्या आत पगार मिळेल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे; पण सरकार दोन पावलं पुढे आलं आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू, असं सदाभाऊ खोत म्हणाले. आझाद मैदान येथे सुरू केलेलं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कर्मचाºयांनी घ्यायचा आहे. त्यात आम्ही कर्मचाºयांसोबत असू, असं देखील सदाभाऊ खोत म्हणाले आहेत, म्हणजे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर याचे आंदोलन थांबले आहे, कर्मचाºयांचे आहे तसेच आहे, असे चित्र तयार झालेले आहे.
खरंतर कर्मचाºयांनी हे आंदोलन उभं केलं होतं. आम्ही आझाद मैदानात त्यांना घेऊन आलो होतो. आम्ही तात्पुरतं आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेतलं आहे. कामगारांनी हे आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे त्यांनी याबाबतचा पुढचा निर्णय घ्यायचा आहे. कामगारांना न्याय मिळावा हा आमचा हेतू होता. भविष्यात वेतनवाढीसाठी आपण आंदोलन करू शकतो. आंदोलकांनी पुढे आंदोलन सुरू ठेवलं, तर त्याला आमचा पाठिंबा असेल, असं यावेळी सदाभाऊ खोत यांनी नमूद केलं. खरंतर अनिल परब यांनी गुरुवारपासून सर्व कर्मचाºयांनी कामावर यावे, असे आवाहनही केले होते. या निर्णयात कोण जिंकले, कोण हरले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अजूनही विलिनीकरणाच्या मागणीवर कामगार ठाम आहेत; पण आगंतुकपणे आलेल्या नेतृत्व आणि पाठिंब्याचा काहीही उपयोग होत नाही, हे पण त्यातून दिसून आलेले आहे. शेवटी कामगारांचा लढा कामगारांना लढावा लागणार आहे, हे पण यातून स्पष्ट झाले आहे.