अग्रलेख : आता आपली जबाबदारी


कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाच्या छातीत धडकी भरवली आहे. आपल्याकडे त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून सारे जग नव्या दमाने कामाला लागले आहे, पण तरीही भारतात शिरकाव झालाच. आजमितीला पाच ते सात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा वाढणार आहेच. कर्नाटकातून सुरुवात झाली. गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीतही रुग्ण सापडले. त्यामुळे हा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का याची भीती निर्माण झालेली आहे. ओमिक्रॉनबरोबरच तिसरी लाट सुरू झाल्याचा तज्ज्ञांचा इशारा आहे. त्यामुळे प्रत्येकांने धास्ती घेतलेली आहे, पण यासाठी प्रत्येकाने काही ना काही जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या सर्व निकटवर्तीयांनी लस घेतली आहे याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली, तर पुन्हा लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. लॉकडाऊन हा काही उपाय नाही. कारण अशी संकटे आता सातत्याने येत राहणार. त्यापासून पळून जाऊन चालणार नाही.

आपला देश आणि राज्य पातळीवरील आरोग्य यंत्रणाही सतर्कझाली आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्याने घ्यायला हवा. लॉकडाऊनसारखा पर्याय अवलंबून बाजारपेठेला वेठीस धरणे आत्मघातकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी दिल्लीत पोहोचल्यावर बाधित आढळणे, भिवंडीच्या वृद्धाश्रमातील ८० जण एकाच वेळी बाधित आढळणे, शेजारच्या कर्नाटकातील धारवाडच्या वैद्यकीय महाविद्यालयात ६६ विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होणे या साºया घटना सावध करणाºया आहेत. दक्षिण आफ्रिकेला या नव्या व्हेरिएंटचा शोध लागला. पाहता पाहता तो ४० देशांत पसरला. मुंबईतही धारावीत तो शिरल्याची शक्यता काल व्यक्त करण्यात आलेली आहे. कोरोनाप्रमाणे या व्हेरिएंटचा तातडीने अहवाल येत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या कालावधीत तो रुग्ण जेवढ्या लोकांना भेटतो त्यांनाही याची भीती आहे. त्यामुळे असे प्रकार होत गेले, तर पुन्हा लॉकडाऊन होणार काय याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे.
आता याबाबत योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. लॉकडाऊनला पर्याय शोधणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांनी वर्कफ्रॉम होम करणे आवश्यक आहे. बाहेर होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी ती तातडीने घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांना ज्या देशात जावयाचे असेल, मायदेशी परतायचे असेल, तर त्यांना तशी मुभा द्यायला हवी. अधिक निर्बंध न लावता आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे सरकार आणि प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या सल्ल्यानुसार, ज्या ठिकाणी अधिक रुग्ण आढळतात तेथे सिक्वेन्सिंगवर भर द्यायला हवा. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्या लसीकरणावर भर द्यावा लागेल. जग नव्या संकटाच्या छायेत असताना राज्य शासनाने निर्धारपूर्वक शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊन जनतेच्या मनातील भीती संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु शाळा-महाविद्यालय स्तरावरील प्रशासनाला कोरोना संसर्गाचा धोका टाळण्याच्या उपाययोजनांकडे काटेकोर लक्ष द्यावे लागेल. लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यांना शाळेत जावे लागते आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादच्या शाळा सुरू झाल्या नसल्या तरी उर्वरित महाराष्ट्रातील शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण स्तरावरील मुलांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.

शासनकर्त्यांच्या हाकेला, आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर नव्या व्हेरिएंटला आपण हरवूच; शिवाय त्याच्या परिणामांचा प्रभावही कमी करू शकू. भीतीपोटी पुन्हा लॉकडाऊन आणि आणखी कडक निर्बंध लावण्यापेक्षा सक्षम यंत्रणा व सजग नागरिकांच्या सकारात्मक प्रयत्नातूनच हे संकट परतवता येईल. नुकत्याच आलेल्या एका अहवालात फक्त दोन टक्के नागरिकांनी नोव्हेंबरमध्ये मास्क वापरला असे आढळले होते. आॅक्टोबरमध्ये २७ टक्के लोक मास्क वापरत होते. हा निष्काळजीपणा सोडला पाहिजे आणि आपली सुरक्षितता आपणच सांभाळली पाहिजे. सगळ्या गोष्टी सरकारने करण्याऐवजी आपण काही खबरदारी घेणार आहोत की नाही? आपण आपली जबाबदारी म्हणून मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. त्यामुळे जर या रोगाचा प्रसार होणार असेल, तर सरकारकडे लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही. पुन्हा पुन्हा त्याच त्या संकटात अडकण्याची गरज नाही. म्हणूनच लॉकडाऊनला पर्याय म्हणजे आपण जबाबदारीने वागणे हे आहे. याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे.
देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबई या दोन्ही ठिकाणी नवा व्हेरिएंट पोहोचला आहे. त्यामुळे सरकारला काही ना काही निर्णय हा घ्यावा लागणारच. दक्षिण आफ्रिकेतून आलेले अनेक नागरिक बेपत्ताही आहेत. अनेकजणांच्या ते संपर्कातही आलेले आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार झाला तर चिंतेची बाब असेल. आरोग्य विभागाने हा संसर्ग वेगाने होत असल्याने चिंतेचे कारण नाही, असे म्हटले आहे. जो व्हायरस धोकादायक असतो त्याचा प्रसार इतक्या वेगाने होत नाही, असाही युक्तिवाद तज्ज्ञांचा आहे, पण कोणत्याही साथीच्या रोगाचे मूल्यमापन मृत्यूदरावरून ठरवले जाऊ नये. मृत्यूदर कमी म्हणजे रोग भयानक नाही, असे समजण्यापेक्षा त्यामुळे निर्माण होणाºया बाधांचा विचार केला पाहिजे. थांबणाºया अर्थचक्राचा विचार केला पाहिजे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …