अग्रलेख:चिखलफेक थांबवली पाहिजे

 

एसटीच्या संपाला शंभर दिवस पूर्ण झाले. राज्यातील महत्त्वाच्या मार्गांवरील आणि फायद्याचे मार्ग असलेली एसटी बंद आहे. सर्वसामान्यांचे सुरुवातीला नुकसान झाले, पण लोकांनी संकटावर मात करण्यासाठी पर्याय निवडले. खासगी वाहनांचा सुळसुळाट झाला आणि आता या संपाचा सर्वांना विसरही पडला. ज्याप्रमाणे गिरणी कामागारांचा संप घडवून त्यांना देशोधडीला लावले, तसेच अगदी एसटीच्या बाबतीत झाले. एक महामंडळ कोलमडून पडताना दिसत आहे. मुठभर लोकांचा त्यात फायदा होत आहे. पण राजकीय पक्ष किंवा सरकार आता त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांनी सुरुवातीला बाजू लावून धरली, पण आता त्या बातमीतला इंटरेस्ट संपल्यावर आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. हे अत्यंत वेदनादायी आहे.

राज्यातील अत्यंत महत्त्वाचे, जिव्हाळ्याचे, सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न बाजूला सोडून सर्व पक्षांचे नेते एकमेकांवर आरोपांची राळ उडविण्यात इतके मग्न झाले आहेत की, सामान्य माणसांची होत असलेली होरपळ त्यांच्या खिजगणतीतही नाही. त्यातलाच प्रकार म्हणजे एसटी संपाचा पडलेला विसर. एसटी कामगारांनी शंभर दिवस संप केला असला, तरी त्यावर तोडगा किंवा निर्णय होताना दिसत नाही. दुसरीकडे कोरोनामुळे सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना प्रत्येकाला नव्या रोजगाराच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे. महागाईवर बोलले पाहिजे. सर्वांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पण याकडे सगळ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. एकमेकांवर फक्त चिखलफेक करायची. याने त्याच्यावर त्याने याच्यावर. सकाळी उठले की, कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा नेता पत्रकार परिषद घेतो आणि कुणावर तरी आरोप करतो. तो जातो न जातो तोच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याचा विरोधक माध्यमांपुढे येतो. सामान्य माणूस याला कंटाळला आहे. जनतेने तुम्हाला तोडगा काढण्यासाठी निवडून दिले आहे. उपाययोजना करण्यासाठी निवडून दिलेले आहे. या साºयाचा विसर पडलेला दिसतो आहे.
जनतेपुढे येऊन, माध्यमांपुढे येऊन एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप कसले करता? भ्रष्टाचार शोधून काढणाºया तपास यंत्रणा आपल्याकडे आहेत ना? त्यांना द्या पुरावे. ते करतील तपास पूर्ण. फक्त जनतेला भडकवण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी चालवलेले हे धंदे सगळ्याच पक्षांनी थांबवले पाहिजेत. जनतेला हे अभिप्रेत नाही. जनतेच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार असेल, तर ते जनतेला पाहिजे आहे. एसटीच्या संपावर तोडगा निघाला पाहिजे. तो संप मिटवला पाहिजे. सामान्यांसाठी एसटी सुरू झाली पाहिजे. एसटीचे हे वैभव कोण रसातळाला नेत आहे त्याला समोर आणले पाहिजे. हे राहिले बाजूला आणि एकमेकांवर चिखलफेकीचे जे राजकारण चालवले आहे त्याने सामान्य माणूस जाम वैतागला आहे. केवळ प्रसारमाध्यमांना दिवसभर चालवण्यासाठी बातमी मिळते म्हणून काहीही बोलायचे आणि स्टंटबाजी करायची. हे प्रकार असह्य होताना दिसत आहेत. सामान्य माणसांच्या नजरेतून हे नेते आणि पक्ष उतरत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता सावरले पाहिजे. चिखलफेक थांबवली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्यात हे जे घाणेरडे राजकारण चालले आहे ते तातडीने थांबले नाही, तर जनता नवा पर्याय शोधेल आणि या सर्वांना बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनामधून आपण कुठेतरी सध्या बाहेर पडत आहोत. छोटा व्यावसायिक पुन्हा उभा राहण्यासाठी आधार शोधत आहे. खेड्यापाड्यांतील विद्यार्थी कोरोनामध्ये झालेले नुकसान कसे भरून येणार याच्या काळजीत आहे. पण कोणत्याच राजकीय पक्षांनी त्याची फिकीर करायची नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सर्वसामान्य जनतेचे काय व्हायचे ते होवो; पण आम्ही एकमेकांचे तथाकथित हिशेब करणारच, अशा चढाओढीतून हे सर्व एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत तुटून पडत आहेत. हाच आपला महाराष्ट्र आहे का? आता म्हणा कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. तुमच्याकडे आहेत पुरावे, कागदपत्रे तर संबंधित विभागांकडे तक्रार करा आणि तपास करायला लावा. जनतेला का त्याचा त्रास देत आहात? हे दररोज पाहायचा प्रेक्षकांना कंटाळा आलेला आहे. याला राजकारण म्हणता येणार नाही किंवा अशी चिखलफेक करून दुसºयाला बदनाम करून आपला सत्तेचा मार्ग सोपा होईल असे कोणी समजू नये. सत्तेचा मार्ग हा विकासकामातूनच जातो. जनता हिशोब केल्याशिवाय राहणार नाही याचा विचार करून राजकीय पक्षांनी जनहितांच्या प्रश्नांवर बोलले पाहिजे. तातडीने ही चिखलफेक थांबवली पाहिजे.
जनहिताचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही काही निवडणूक नाही किंवा प्रचाराची वेळ नाही. जनतेसमोर येऊन एकमेकांचे बुरखे फाडायला या काही प्रचारसभा नाहीत. आरोप, प्रत्यारोप करायला आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. येत्या काही दिवसांत राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या मुदती संपलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष हे उद्योग करत आहेत का? अर्थात निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप समजून घेण्यासारखे असतात. ते आरोपदेखील एकमेकांच्या पक्षाच्या धोरणांबाबत व चुकीच्या अंमलबजावणीबाबत असावेत, असे महाराष्ट्रातील आधीच्या पिढीतील नेत्यांनी सांगून ठेवले होते. पूर्वीच्या दोन पिढ्यांनी ते सांभाळत केलेले राजकारण त्यांनी बघितले होते. आता मात्र चोवीस तास निवडणूक असल्याचेच वातावरण तयार झाले आहे. महापालिकांच्या निवडणुका वेळेवर होणार की नाही, याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्याची तयारी म्हणून, एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगण्याचे धोरण अवलंबले जात असेल, तर जनता या प्रकारच्या प्रचाराला बळी पडणार नाही. सर्व पक्षांनी चिखलफेक थांबवून जनतेच्या हिताकडे पाहिले पाहिजे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …