अखंड भारताचा विचार

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हरिद्वारमधील एका कार्यक्रमात येत्या वीस-पंचवीस वर्षांत अखंड भारताची निर्मिती होईल आणि आपण सर्वांनी प्रयत्न केले, तर येत्या पंधरा वर्षांतच अखंड भारत निर्माण होऊ शकेल, अशी भविष्यवाणी केल्याने देशात तो चर्चेचा विषय ठरला आहे. सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अनेकांनी उहापोह करून सोयीचा अर्थ काढला; पण त्यामागचा विचार समजून घेण्याची गरज आहे. आज भारताच्या सर्व छोट्या-मोठ्या शेजारी देशांना चीनने आपल्या विळख्यात अडकवले आहे. चिनी ड्रॅगन त्यांना गिळंकृत करताना दिसत आहे. पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ या देशांबाबत ते लक्षात आले नाही, तरी श्रीलंकेची परिस्थिती आज ज्याप्रकारे झाली आहे, त्यानंतर या सर्व देशांना कोणत्या तरी आधाराची गरज आहे. या संकटातून मुक्त व्हायचे आहे. अशा परिस्थितीत भारत हा या देशांचा आधार असणार आहे. अशा अर्थाने अखंड भारत हा सर्व शेजारी देशांना तारक ठरेल आणि चिनी विळख्यातून सोडवले हा अभिप्रेत अर्थ आहे.

अर्थात अखंड भारताचे स्वप्न संघ सुरुवातीपासूनच पाहत आला आहे. संघशाखेवर जी भारतमातेची प्रतिमा पूजली जाते, ती प्राचीन अखंड भारताचीच असते. त्यामुळे त्यांनी तसे वक्तव्य केले, तर ते काही विसंगत नाही; पण भागवत यांच्या विधानाचा शब्दश: अर्थ न लावता भारतीय विचार, भारतीय धोरण या अर्थाने भारताची बलाढ्यता याचा विचार करण्याची गरज आहे. १९९१च्या जागतिकीकरणानंतर असाही देशांच्या भूभाग आणि सीमा यांना काही अर्थ राहिलेला नाही. एखादा देश काबीज करणे म्हणजे प्रत्यक्ष सीमेत प्रवेश करणाची गरज नाही. आज आपण आपल्या देवधर्मापासून ते खाद्यसंस्कृतीपर्यंत प्रत्येक ठिकाणी चिनी आक्रमण झालेले पाहतो. आपल्या वापरायच्या वस्तू, धर्म, संस्कृती, खाद्य संस्कृती सगळ्यावर चीनने आक्रमण केले आहे. असे असताना आपण शिल्लक राहतोच कुठे? अशा परिस्थितीत चीनला लांब ठेवून आत्मनिर्भर होऊन या शेजारी देशांपर्यंत भारताच विचार पोहोचवणे महत्त्वाचे आहे.

पण सरसंघचालकांच्या तोंडी हे विधान आल्याने आणि सध्या केंद्रामध्ये संघाच्या प्रभावाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि नरेंद्र मोदींचे नेतृत्व असल्याने या विधानाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. अखंड भारत निर्मिती म्हणजे एक भौगोलिक प्रदेश, एक संविधान, एक राष्ट्रचालक अशा प्रकारचा विशाल भारतीय उपखंड बनेल, असा भागवंतांच्या म्हणण्याचा शब्दश: अर्थ काढायची गरज नाही. एकेकाळी भारताच्या भौगोलिक सीमा अशा व्यापक होत्या. आजचा अफगाणिस्तान तेव्हाचा कंधार देश होता. अठराव्या शतकापर्यंत तो भारताचाच भूभाग मानला जायचा. ड्युरंड रेषेने तो प्रदेश भारतापासून अधिकृतपणे वेगळा केला, तो ब्रिटिशांनी आणि तोही अगदी अलीकडे १८९३ साली. पाकिस्तानची निर्मिती १९४७ साली झाली, तर बांगलादेशची १९७१ च्या युद्धाअंती. आजच्या नेपाळवरही कधीकाळी किराताचे शासन होते. श्रीलंका एकेकाळी सिंहलद्वीप होती आणि रामायणाचा तो भाग, तर सर्वज्ञात आहेच. आजचा म्यानमार पूर्वी ब्रह्मदेश म्हणून ओळखला जायचा आणि १९३७ साली ब्रिटिशांनी तो भारतापासून वेगळा पाडला. भूतान मौर्यकाळामध्ये भारताचा भाग होता. आसामच्या कामरूप राज्याचाही तो कधीकाळी भाग होता. भारताचे सांस्कृतिक धागेदोरे असे शोधायला गेले, तर थेट इंडोनेशियापर्यंत जाऊन भिडतील; पण आज रशिया ज्याप्रमाणे युक्रेनला जोडायला निघाला आहे, त्याप्रमाणे आपल्याला जोडून घेईल, असा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. येत्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये भारताची स्थिती एवढी बळकट होईल की, आजूबाजूचे हे जे सगळे देश आहेत, जे कधीकाळी याच भारतभूमीचा भाग होते, ते भारताच्या प्रभावाखाली येणे पसंत करतील. आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली, तर भारताकडे हे शेजारी देश आशेने पाहात असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. श्रीलंका दिवाळखोरीत निघालेला आहे. चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेली आहे. पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरतेचे पर्व आले आहे. सत्तेवरून दूर जाताना इम्रान खानलाही भारताचे गुणगान करावेसे वाटले. पाकिस्तानमधील बलुचिस्तानसारख्या भागातील नागरिक भारताच्या प्रगतीकडे डोळे विस्फारून पाहत असतात. भारताने येत्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये स्वत:चा उत्कर्ष साधला, तर निश्‍िचतच आजूबाजूच्या या देशांना भारताचे सख्य हवेहवेसे वाटेल. आजवर त्यांना चीनचे वाटत आले होते. चीनने भारताभोवतीच्या देशांभोवती आपले जाळे विणायला अनेक वर्षांपूर्वीपासून सुरुवात केलेली आहे. ती जागा भारताला घ्यावी लागेल. चीनच्या या वर्चस्ववादी भूमिकेचा फुगा श्रीलंकेतील सद्यपरिस्थितीने फोडलेला आहे; पण भारताची चौफेर प्रगती जर येत्या काळात होऊ शकली, तर चीनच्या पंखांखालून हे देश निश्‍िचत बाहेर पडू शकतील आणि सर्वत्र अखंड भारताचा विचार दिसेल, असा तो अर्थ आहे.

प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नसते. कधी देश म्हणून नाही राष्ट्र म्हणून विचार करावा लागतो. देश म्हणजे सीमेच्या आत येतो. तर राष्ट्र म्हणजे विचार असतो. भारत हा देश आहे, तर हिंदू राष्ट्र हा विचार असतो. भारताचा वा विचार अखंड हिंदुस्थानात पोहोचवणे हे त्यामागचे वास्तव आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …