अंतर्गत मूल्यमापनाची गरज

लॉकडाऊनच्या काळानंतर जेव्हा परीक्षा झाल्या नाही, तेव्हा अंतर्गत मूल्यमापन ही कल्पना चर्चेत आली; पण तशी ती नवी नाही. हे मूल्यमापन नेहमीच पूर्वापार होत आलेले आहे. वर्षभरातील शालेय परीक्षांतील गुण, स्वाध्याय, गृहपाठ, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी तंत्रसाधनांद्वारा विद्यार्थ्यांच्या योग्यतेचे आणि प्रगतीचे केलेले मापन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन असे म्हणतात. पण ती एक काळाची गरज आहे. लॉकडाऊन असोवा नसो अंतर्गत मूल्यमापन हे आवश्यक आहे.

अध्यापनाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार विद्यार्थ्यांना अध्ययन-अनुभव योजनाबद्ध रीतीने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ते परिवर्तन घडून आले की नाही, म्हणजे विद्यार्थ्यांचा पूर्वीपेक्षा विकास झाला अथवा नाही, हे तपासणे; विकास जर झाला असेल, तर तो कितपत झाला आहे, हे पडताळून पाहणे म्हणजे मूल्यमापन. याची खरोखरच आवश्यकता आहे. लेखी परीक्षेत मुले पास झाली, गुण मिळवले; पण खरे ज्ञान आले आहे का हे पाहणे गरजेचे आहे.

यासाठी विविध मूल्यमापनसाधनांची आवश्यकता असते. शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या सर्वांगीण विकासाची पडताळणी करण्यासाठी सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन उपयोगी ठरते. सर्वांगीण विकासाच्या मूल्यमापनालाच सर्वकष मूल्यमापन म्हणतात. अशा प्रकारचे मूल्यमापन करताना केवळ लेखी परीक्षा पुरेशी होणार नाही. त्यासाठी निरीक्षण, आत्मनिरीक्षण, अविष्कार, नामनिर्देशन इत्यादी तंत्रांचा वापर करावा लागेल. जे मूल्यमापन सतत चालते, ते सातत्यपूर्ण मूल्यमापन असते.

विद्यार्थ्यांचे स्वाध्याय, वादविवाद स्पर्धेतील सहभाग, खेळ, चर्चासत्र, खेळांच्या स्पर्धांमधील कौशल्ये, नियमित उपस्थिती यास शाळेत फार महत्त्व आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना दिल्यास ते वरील उपक्रमांत भाग घेण्यास वर्षभर सतर्क राहतील, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापकही अध्यापन व शालेय उपक्रमांत लक्ष घालतील. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात बाह्य परीक्षेचे दडपण राहणार नाही.

अंतर्गत मूल्यमापनातून विद्यार्थ्यांचे अध्ययन किती झाले, ते अभ्यासात कोणत्या पातळीपर्यंत आहे, विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे कोणते, त्यावर कोणते उपाय करायला पाहिजेत इत्यादी बाबी शिक्षकांस सहज समजून येतात. हे मूल्यमापन लहान-लहान चाचण्यांद्वारे होत असल्यामुळे घटकांची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली, ते शोधणे सोपे जाते. वर्तन बदलाची तपासणीही मूल्यमापनाद्वारे होत असते. त्यामुळे दैनंदिन अध्यापनासाठीही त्याचा उपयोग होतो. अध्ययन-अध्यापनप्रक्रियेत सुधारणा करता येते. विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्ती विकास तपासण्यासाठी घटक चाचण्या, प्रात्यक्षिके यांचा विचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे व्यक्ती विकास पाहण्याकरिता अवलोकनात्मक तंत्रांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगांनी मूल्यमापन होऊ शकते. म्हणूनच अध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वागणुकीची नोंद ठेवून घटक चाचण्याच्या माध्यमातून त्याच्या उद्दिष्टात्मक प्रगतीचा आढावा घेऊन त्याद्वारे मूल्यमापन करणे यास अंतर्गत मूल्यमापन असे म्हणतात. हे होणे प्रत्येकाच्या फायद्याचे आहे. आपण कुठे आहोत हे नेमके समजणे यासाठी हे आवश्यक आहे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …