लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती क्रेझ पाहता ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या Kia ने आपल्या कॉन्सेप्ट एसयूव्ही EV9 चा एक अस्पष्ट टीझर फोटो जारी केला होता. आता Kia EV9 कॉन्सेप्ट एसयूव्हीचे 2021 लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये पदार्पण झाले आहे. कंपनीची ही शानदार इलेक्ट्रिक एसयूव्ही बॉक्सी डिझाइन आणि अँग्युलर एक्सटीरियरसह येते. ही SUV कंपनीने E-GMP प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे आणि ती एका चार्जमध्ये ४८३ किमी पर्यंतची रेंज देते.
Kia च्या या आगामी SUV चे इंटिरियर खूप प्रीमियम आहे. 3-रो केबिन, अष्टकोनी स्टीयरिंग व्हील, अॅम्बियंट लाइटिंग आणि पॅनोरामिक ग्लास रूफ देण्यात आले आहेत. एसयूव्हीच्या डॅशबोर्डमध्ये २७-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. EV9 च्या हायलाइट्समध्ये त्याच्या खास इंटिरियर्सचा समावेश आहे. SUV ची खास गोष्ट म्हणजे यामध्ये दिलेले सीट गरजेनुसार बदलले जाऊ शकतात. म्हणजे EV9 ची पहिली आणि तिसरी पंक्ती १८० अंशांपर्यंत फिरवता येते, तर दुसऱ्या रांगेची सीट दुमडून टेबल बनवता येते. या लेआउटद्वारे कारच्या केबिनचे लाउंजसारख्या जागेत रूपांतर करता येईल.
कॉन्सेप्ट EV9 चा लुक खूप चांगला आहे. कंपनी विंडशील्डच्या पायथ्याशी एक मस्क्यूलर यू शेप बोनेटसह सोलर पॅनेल देखील ऑफर करणार आहे. मोठे स्क्वेअर शेप हेडलाइट्स आणि व्हर्टिकल DRL मुळे ती खूपच नेत्रदीपक दिसते. याशिवाय, या आगामी एसयूव्हीमध्ये रीट्रॅक्टेबल (मागे घेण्यायोग्य) रुफ रेल, Y-आकाराची टेललाइट आणि हँडल-लेस दरवाजे देण्यात आले आहेत.
Kia EV9 ही Electric Global Modular Platform वर तयार केली जाईल. कंपनीचा दावा आहे की ही SUV एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ४८३ किमी पर्यंतची रेंज देते. SUV सह, कंपनी 350kW चार्जर देईल. या चार्जरद्वारे SUV ची बॅटरी ३० मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते असाही दावा कंपनीने केलाय.