तामिळनाडूः भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. वेलिंगटन आर्मी सेंटर या ठिकाणची ही घटना आहे. ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. घटनेत ३ गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह जवळपास १४ जण असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, आणि रावत यांची पत्नी मधुरीका रावतही या हेलिकॉप्टर मध्ये होते. हे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या तळावरून कुन्नूरकडे जात होतं.
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हवाई दलाचे हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते. सीडीएस जनरल बिपीन रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.
दोन मृतदेह ८० टक्के जळालेल्या स्थितीत आढळून आले आहेत. आणखी काही मृतदेह जंगलात दुर्घटनाग्रस्त भागात आढळल्याचं बोललं जातंय. इतर मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच त्यांची ओळख करण्यात येत आहे.
नवी दिल्लीत कॅबिनेटची बैठक सुरू आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
कोण प्रवास करत होते?
सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिखा रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. अपघातग्रस्त विमानात सीडीएस जनरल बिपिन रावत असल्याच्या माहितीला भारतीय हवाई दलाने दुजोरा दिला आहे.