ठळक बातम्या

ॲमेझॉनविरोधात व्यापारी संघटनेचा एल्गार

देशातील ५०० जिल्ह्यांमध्ये आंदोलन
नवी दिल्ली – ॲमेझॉनवर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी देशातील व्यापारी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने रस्त्यावर येत ॲमेझॉनवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन अमली पदार्थांची विक्री करणे आणि देशविघातक कारवायांसाठी वस्तूंचा पुरवठा करणे या प्रमुख कारणांसाठी ॲमेझॉनवर कारवाई करण्याची मागणी या संघटनेने केली आहे, तर कापड आणि चपला यांच्यावरील जीएसटी वाढल्याचाही या संघटनेने निषेध केला आहे. यवतमाळमध्येही कॅट संघटनेच्या वतीने ॲमेझॉनविरोधात आंदोलन करण्यात आले.
ॲमेझॉनने काही दिवसांपूर्वी मारिज्युआना म्हणजेच चरसचा ऑनलाइन पुरवठा केल्याची माहिती समोर आली होती. भारतात ड्रग्जच्या व्यापाराला बंदी असताना, ॲमेझॉनने सर्व नियम धाब्यावर बसवत गांजाचा पुरवठा केल्याचे समोर आले होते, तर त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पुलवामा हल्ल्यासाठीची रसायने ॲमेझॉनवरून डिलिव्हर करण्यात आल्याचेही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातून समोर आले होते. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला करण्यासाठी जी स्फोटके तयार केली, त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या रसायनांची मागणी दहशतवाद्यांनी ॲमेझॉनवर नोंदवली होती आणि ती पूर्ण करण्यात आली होती. या दोन्ही गंभीर प्रकरणांत ॲमेझॉनवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी या संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून, देशातील विविध राज्यांतील ५०० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिलने टेक्सटाइल आणि चपला यांवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात हे दोन्ही उद्योग डबघाईला आले असून, त्यांना पुन्हा उभारी मिळण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत या उद्योगांना प्रोत्साहन आणि सवलत देण्याऐवजी या वस्तूंवरील कर वाढवण्यात आल्याचा संघटनांकडून निषेध नोंदवण्यात आला. ॲमेझॉन अनैतिक मार्गांचा वापर करून आपला व्यवसाय वाढवण्याचा आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा छोट्या व्यापाऱ्यांना फटका बसत असून, नैतिक मूल्यांचेदेखील अध:पतन होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …