ठळक बातम्या

५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण : पंतप्रधान मोदी घेणार राज्यांची बैठक; महाराष्ट्राचाही समावेश

नवी दिल्ली – भारताने नुकताच कोविड-१९ (कोरोना) प्रतिबंधक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार केला; मात्र देशातील जवळपास सगळीच राज्ये त्यांचा लसीकरणाचा अपेक्षित टप्पा गाठण्यात अयशस्वी ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांशी आढावा बैठक घेणार आहेत. पंतप्रधान कार्यालया (पीएमओ)ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या बुधवारी, ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी त्या राज्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोविड-१९ च्या लसीचे पहिल्या डोसचे ५० टक्क्यांपेक्षा कमी कव्हरेज असलेल्या आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. यात महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा देखील समावेश आहे.
या बैठकीत एकूण ४० हून अधिक जिल्हाधिकारी उपस्थित असतील. हे जिल्हे ज्या राज्यांमध्ये आहेत, त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ज्या राज्यांमध्ये लसीकरण कमी आहे त्यात महाराष्ट्र, मेघालय, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि इतर राज्यांचा समावेश आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-२० शिखर परिषद आणि कॉप-२६ परिषदेसाठी ब्रिटनमध्ये आहेत. ही परिषद २ नोव्हेंबरला संपणार आहे. भारतात परतल्यानंतर लगेचच, मोदी ३ नोव्हेंबर रोजी ही लसीकरण आढावा बैठक घेतील.
भारतात कोरोनाविषयक निर्बंध उठवले जात असले, तरी लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. यावर्षी जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली. देशात १०६.१४ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. एकत्रितपणे, देशातील संपूर्ण प्रौढ पात्र लोकसंख्येपैकी ७३.१६ कोटींहून अधिक नागरिकांना लसीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. प्रत्यक्षात, देशात दोन्ही डोस मिळून जवळपास ३३ कोटी नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …