ठळक बातम्या

४० टक्केचा निर्णय (अग्रलेख)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मंगळवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. येत्या चार महिन्यांत येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसची स्ट्रॅटिजी काय असेल हे प्रियंका गांधींनी स्पष्ट केले. त्यादृष्टीने उत्तर प्रदेशमधील महिलांना राजकारणात येण्यासाठी प्रियंका गांधींनी आवाहन केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली. यावेळी ही पत्रकार परिषद देश आणि उत्तर प्रदेशच्या महिलांना समर्पित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘लड़की हूँ लड़ सकती हूँ’, हा नारा यावेळी त्यांनी दिला. एकूणच उत्तर प्रदेशात आपली उखडलेली पालेमुळे पुन्हा रोवल्याशिवाय काँग्रेसला पुन्हा संजीवनी मिळणार नाही, हे ओळखलेले दिसते. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त महिलांना संधी देऊन सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. अर्थात काँग्रेसला एवढे उमेदवार उत्तर प्रदेशात मिळतात की नाही, हा प्रश्न आहेच; पण ४० टक्के महिलांना तिकिटे देणार ही घोषणा स्वागतार्ह आहे, हे नक्कीच.
उत्तर प्रदेशात साधारणपणे महिला या फारशा पुढे येणाºया नाहीत. ज्या येतात त्या फारच पुढे येतात. मायावतींसारख्या धाडसी महिला तिथे यापूर्वी राजकारणात आहेतही; पण मतदारांमध्ये आणि एकूणच तिथली संस्कृती, मागासलेपणा पाहता, साक्षरतेचे प्रमाण पाहता महिला बाहेर पडणाºया नाहीत. त्यामुळे महिलांवर लक्षकेंद्रीत करून महिलांना घराबाहेर काढून राजकारण करायला लावण्याचे हे फार मोठे आव्हान काँग्रेस उचलत आहे, ही जमेची बाजू आहे. या भूमिकेमुळे कदाचित थोडेफार यश काँग्रेसच्या पदरी पडेलही.

खरं तर उत्तर प्रदेशात महिलांना पुढे आणण्याची तयारी काँग्रेस मागच्या निवडणुकीपासूनच करत आहे. दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसच्या राजकारणातून दुर्लक्षित होत असलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनाही २०१७ मध्ये उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्याची तयारी काँग्रेसने केली होती; पण त्यांना त्यात यश आले नाही. शीला दीक्षित यांचे नाव पुढे आल्यावर राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले होते आणि उत्तर प्रदेशची सगळी सूत्रं त्यांनी आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे महिलांना संधी देण्याची ती संधी २०१७ मध्येच काँग्रेसने गमावली होती. त्याची भरपाई करण्यासाठी आता प्रियंका गांधी पुढे येताना दिसत आहेत.
त्यामुळे प्रियंका गांधींनी केलेले वक्तव्य फार महत्त्वाचे आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, महिलांना तिकीट जातीच्या आधारावर नाही, तर पात्रतेच्या आधारावर दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. जर तुम्ही यावेळी मजबूत नसलात, तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. २०२४ मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. माझ्या हातात असते, तर ५० टक्के तिकीट महिलांना दिले असते. यामागे मुख्य कारण म्हणजे ज्या महिला एकत्रितपणे एक शक्ती बनून लढत नाहीत. त्या महिलांना जाती धर्मात विभागले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पत्रकार, शिक्षिका, विविध क्षेत्रांतील महिलांनी यावे, असे आवाहनही केले. थोडक्यात काय, तर उमेदवार गोळा करण्याची वेळ काँग्रेसवर आहे, हे लक्षात घेतलेच पाहिजे; पण जास्तीत जास्त महिलांना खरोखरीच त्यांनी तिकिटे दिली, तर एक वेगळा फॉर्म्युला तयार होऊ शकतो. अर्थात हे महिला कार्डबाहेर काढण्याशिवाय आज काँग्रेसला काहीही पर्याय उरलेला नाही. याचे कारण राहुल गांधींचे नाणे कुठेच चालत नाही हे वारंवार दिसून आले आहे. सोनिया गांधींची तब्येत आता साथ देणे अवघड आहे. त्यामुळे त्यांना मर्यादित जबाबदारी घ्यावी लागेल. मग गांधी घराण्याशिवाय पोरकी असणारी काँग्रेस प्रियंका गांधींशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंकांवर सोपवली गेली आहे. त्यासाठी त्यांनी महिला कार्ड बाहेर काढले.

प्रियंका म्हणाल्या, हा निर्णय सर्व महिलांसाठी आहे. उत्तर प्रदेशमध्ये बदलाचे स्वप्न पूर्ण होईल. देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचं आहे. सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. महिलांनी स्वत:चे रक्षण करावे. माझा निर्णय उत्तर प्रदेशच्या प्रत्येक महिलेसाठी आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी त्या लोकांसाठी लढत आहे जे आवाज उठवू शकत नाहीत. आवाज उठवणाºयांना चिरडले जात आहे. माझे राजकारण परिस्थिती बदलणे आहे. आज उत्तर प्रदेशात हत्या आणि चिरडण्याचे राजकारण होत आहे. उत्तर प्रदेशात चौथ्या क्रमांकावर असलो, तरी आम्ही जमिनीवर आहोत. आम्ही लढत आहोत. काँग्रेस लढत असल्यामुळेच पर्याय देऊ शकतो. महिलांनी केवळ काँग्रेसमध्येच नाही, तर भाजपमध्येही पुढे आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त महिलांना संधी द्यावी, अशी अपेक्षा प्रियंका गांधींनी व्यक्त केली आहे.
अर्थात उत्तर प्रदेशात निवडणुका लढवणे काँग्रेससाठी तेवढे सोपे उरलेले नाही. एकेकाळी सब कुछ काँग्रेस असलेल्या उत्तर प्रदेशात आज काँग्रेस नसल्यात जमा आहे. मागच्या निवडणुकीत अखिलेश यादव पुन्हा सरकार स्थापन करतील, अशी परिस्थिती होती; पण त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली आणि जागा वाटप केले. त्यात दोघेही डुबले. त्यामुळे काँग्रेसबरोबर जाण्यास कोणी तयार नाही. साहजीकच नवा फंडा वापरून या निवडणुका लढवणे काँग्रेसला आवश्यक होते. जो मुद्दा भावनिक पातळीवर टिकेल, मतदारांना आकर्षित करेल आणि चर्चेत राहील, असा विषय काँग्रेसला हवा होता. त्याप्रमाणे त्यांनी ४० टक्के महिला उमेदवारीचा विषय घेतला आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *