आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी खास भावना असते. ज्या दिवसापासून बाळ पोटात वाढू लागते, त्या दिवसापासून आईला प्रत्येक क्षणी ते जाणवत राहते. तथापि, अल्जेरियामध्ये, एका महिलेला तिच्या अर्ध्या वयापर्यंत माहीत नव्हते की, तिच्या पोटात मूल आहे. हे तिला ३५ वर्षांनी कळले, जेव्हा त्याच्या पोटात भयंकर दुखत होते.
अल्जेरियामध्ये, एका ७३ वर्षीय महिलेला अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. असह्य वेदनेने किंचाळणाºया महिलेने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी पोटदुखीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते चक्रावून गेले. एका वृद्ध महिलेच्या पोटात अनेक दशकांपासून ७ महिन्यांचा गर्भ होता. विचित्र गोष्ट म्हणजे या महिलेला स्वत:ला याची कल्पना नव्हती.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ज्या महिलेसोबत ही विचित्र घटना घडली, तिला आधीही पोटात दुखत होते, पण त्यामागील कारण डॉक्टरांना कळाले नव्हते. मात्र, यावेळी महिलेच्या पोटात दुखणे अधिक वाढल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता, महिलेच्या पोटात सुमारे ३५ वर्षांपासून सात महिन्यांचा गर्भ असल्याचे आढळून आले. वर्षानुवर्षे झाल्यामुळे गर्भ दगडासारखा झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला ‘बेबी स्टोन’ असे नाव दिले आहे. त्याचे वजन ४.५ पौंड म्हणजेच २ किलोंपर्यंत होते.
डॉक्टरांनीही अशी घटना अत्यंत दुर्मीळ असल्याचे सांगितले. त्यांनी त्याला लिथोपेडियन नावाची स्थिती म्हटले. याबाबत डॉक्टरांनी म्हटले, असे घडते जेव्हा गर्भाचा विकास गर्भाशयाऐवजी पोटात होतो. मुलामध्ये सतत रक्ताची कमतरता असल्यामुळे गर्भाचा विकास होत नाही. पोटातून बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे, गर्भ दगडात बदलू लागतो. महिलेच्या अंगात सापडलेला बेबी स्टोनही याच कारणामुळे तयार झाला होता.