- भाजप नेत्याचे जनतेला आश्वासन
अमरावती – निवडणुकांच्या वेळी अनेकदा राजकीय नेत्यांचा तोल हा जातच असतो. एकापेक्षा अनेक विविध विचित्र असे आश्वासन देत ते वादही आपल्यावर ओढावून घेत असतात. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातील एका भाजप नेत्याने केला आहे. साहेबांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी केल्यास चक्क ७० रुपयांत लिटरभर दारू देणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, त्यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही पाहण्यास मिळाले. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांचे ते वक्तव्य ट्विट केले आहे. ‘दे दारू भाई दे दारू’ असे ट्विट करत त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
एका सभेत उपस्थितांना संबोधताना स्थानिक भाजप नेते सोमू वीरराजू म्हणाले की, राज्यात एक कोटी नागरिक दारू पितात. त्या सर्वांनी एक कोटी मते भाजपला द्यावी, तुम्हाला ७० रुपयांमध्ये लिटरभर दारू देतो. जर चांगला महसूल मिळाला, तर ५० रुपयांमध्येच दारू देतो असे जाहीर वक्तव्य वीरराजू यांनी केले. सोमू वीरराजू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावरही टीका केली, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलुगू देसम पार्टीवरही त्यांनी टीका केली. आंध्र प्रदेशला मोठा समुद्रकिनारा आणि विकासाची साधने असतानाही राज्यकर्त्यांनी कोणताही विकास केला नसल्याचे वीरराजू म्हणाले. त्यामुळे भाजपला निवडून द्या, असे ते म्हणाले. दारूच्या मुद्यावरून आंध्र प्रदेशात मे महिन्यापासून चांगलेच राजकारण तापले आहे. मे महिन्यात जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने नवीन दारू धोरण लागू केले. त्याअंतर्गत राज्यात दारूची दुकाने कमी करून ती खरेदी करणाऱ्यांसाठी तीन बाटल्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये रेड्डी यांच्या सरकारने दारूसाठी दिलेला परवाना देखील क्षणार्धात रद्द केला होता. जगनमोहन यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आंध्र प्रदेशमध्ये दारूच्या किमती ७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये सोमू वीरराजू यांची आंध्र प्रदेश युनिटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले सोमू वीरराजू यांनी भाजप युवा मोर्चासाठीही काम केले आहे.