ठळक बातम्या

 हे तर माझ्या बायकोसाठी बर्थडे गिफ्ट! सूर्यकुमारने मानले बोल्टचे आभार

जयपूर – टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सीरिजची विजयाने सुरुवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय टीमने ५ गडी राखून न्यूझीलंड संघावर विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमारने ४० चेंडंूत ६२ धावा करीत मालिकावीर पुरस्कार पटकावला. क्रिकेट जगतात सूर्यकुमारच्या खेळीचे कौतुक होत असतानाच त्याचा हटके किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
के. एल. राहुलची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक लगावले. विराट कोहलीच्या अनुपस्थित सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्याने १६ व्या ओव्हरदरम्यानचा किस्सा सांगत ट्रेंट बोल्टचे आभार मानले. १६ व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवला जीवनदान मिळाले. ट्रेंट बोल्टने सूर्यकुमार यादवचा झेल सोडला आणि चेंडू सीमापार गेला. सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने बोल्टचे आभार मानले. आज माझ्या बायकोचा वाढदिवस असून हे परफेक्ट गिफ्ट असल्याचे सूर्यकुमारने म्हटले. तसेच आपल्या खेळीवर त्याने मत व्यक्त केले. तो म्हणाला, मी काहीही वेगळे केलेले नसून, गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जे करीत होतो तेच केले. मी नेटमध्येही त्याच पद्धतीने खेळतो आणि सामन्यातही. नेटमध्ये खेळताना मी स्वत:वर खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. नेटमध्ये खेळताना बाद झाल्यानंतर माझे नेमके काय चुकले? याचा विचार करतो आणि याचा फायदा मला मैदानात खेळताना होतो, असे सूर्यकुमारने सांगितले.
सूर्यकुमारने या सामन्यात ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव ५७ धावांवर असताना ट्रेंट बोल्टने त्याचा झेल सोडला आणि सूर्यकुमारला चार धावादेखील मिळाल्या. या धावा आणि झेल सोडणे न्यूझीलंडला जड गेले, कारण भारताला शेवटच्या षटकात फक्त १० धावांची गरज होती. सूर्याचा झेल सुटला नसता, तर या धावा अधिक होऊ शकल्या असत्या आणि मग भारताचा रस्ता अवघड झाला असता. नंतर ट्रेंट बोल्टनेच त्रिफळाचित केले. भारतीय डावाच्या १७ व्या षटकात सूर्याने बोल्टच्या चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या दांड्या उडाल्या. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव गंमतीने म्हणाला की, आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे, म्हणून माझ्या मुंबई इंडियन्स संघातील सहकाऱ्याने मला भेट दिली. सूर्या आणि बोल्ट दोघेही गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये टीम मुंबई इंडियन्समध्ये एकत्र खेळत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …