हेल्मेट, स्टेथोस्कोप, बांगड्यांमध्ये लपवून आणलेले १३ कोटींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त

मुंबई – मुंबईत एनसीबीने ८ ठिकाणी सर्च ऑपरेशन करून १३ कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. हार्ड ड्राइव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून या ड्रग्जची तस्करी करण्यात आली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वीत्झर्लंड, न्यूझीलंडला हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते. याप्रकरणी एनसीबीकडून एकूण सहा गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून ही टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती. विविध कुरिअर कंपनीद्वारे हे ड्रग्ज वेगवगळ्या युक्त्या लढवून हार्ड ड्राइव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून पाठविण्यात येणार होते. या कारवाईनंतर कुरिअर कंपन्या रडारवर आल्या आहेत. एक परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

एनसीबी मुंबईच्या पथकाने १० डिसेंबर रोजी अंधेरी पश्चिमेकडील स्टेथोस्कोपमध्ये लपवून ठेवलेले ४९० ग्रॅम ॲम्फेटामाइन जप्त केले. ही खेप मुंबईतील डोंगरी येथून निघाली आणि ऑस्ट्रेलियाला गेली होती. एनसीबी मुंबईने याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एका इव्होरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. नंतर एनसीबीने १३ डिसेंबर रोजी अंधेरी पश्चिम येथे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवलेले ३.९०६ किलो अफू जप्त केले. ही खेप अंधेरी मुंबई येथून माले, मालदीव येथे पोहोचणार होती. १३ डिसेंबरला अंधेरी पूर्व येथे अन्नपदार्थ आणि किराणा मालामध्ये लपवून ठेवलेला २.५२५ किलो झोलपीडेम टॅब जप्त केल्या. ही खेप अंधेरी मुंबई येथून अमेरिकेतील टेक्सास येथे पोहोचवली जाणार होती, तसेच अंधेरी पूर्व येथे सायकलिंग हेल्मेट आणि बांगड्यांमध्ये लपवून ठेवलेले एकूण ९४१ ग्रॅम (४९५+४४६) ॲम्फेटामाइन जप्त केले. ही खेप अंधेरी मुंबई येथून ऑस्ट्रेलियाला जाणार होती. १३ आणि १४ डिसेंबरदरम्यान डोंगरी, मुंबई येथे एकूण ८४८ ग्रॅम (४५८+३९०) ॲम्फेटामाइन जप्त केले, जे नळीच्या पाईप आणि टाय बॉक्समध्ये लपवले होते. ही खेप मुंबईतील डोंगरी येथून दुबई, यूएई आणि न्यूझीलंड येथे पोहोचवली जाणार होती. १४ डिसेंबरला अंधेरी, मुंबई येथे १ टीबी हार्ड डिस्कमध्ये लपवून ठेवलेले १७ ग्रॅम ॲम्फेटामाइन जप्त केले. ही खेप मुंबईतील अंधेरी येथून स्वित्झर्लंडला जाणार होती. असे एकूण १३ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …