ठळक बातम्या

हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच होणार

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात हिवाळी अधिवेशन हे परंपरेनुसार नागपूरला होतं; पण गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईतच झालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती, तसेच विधान परिषदेची निवडणूक यामुळे यावर्षी देखील हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याच्या वृत्तावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. सोमवारी (२९9 नोव्हेंबर) संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे. त्यात या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आॅनलाइन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजिओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रिमंडळास दिली. कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून, आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …