मुंबई – मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी हक्कभंगाचा ठपका असलेल्या अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांना राज्य विधिमंडळाने दोनवेळा मुदतवाढ दिली होती. येत्या हिवाळी अधिवेशनात विशेषाधिकार समितीपुढे दोघांनाही हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, दोघेही हजर झाल्यास मुदतवाढीऐवजी अभय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोघांवरील ही कारवाई टाळण्यासाठी भाजपने जोर लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगना राणावत यांनी अवमानकारक उल्लेख केला होता. ८ सप्टेंबर, २०२०मध्ये झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व पक्षप्रतोद सुनील प्रभू आणि विधान परिषदेत भाई जगताप आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दोघांवर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेषाधिकार समिती नेमण्यात आली. समितीने अधिवेशन कालावधीत दोघांनाही हजर राहण्याची नोटीस बजावली. दोघेही त्यावेळी हजर राहिले नाहीत. हक्कभंगाचा ठरावाला त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या २२ डिसेंबरपासून दोन आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांना पुन्हा नोटीस पाठवली जाणार आहे. दरम्यान, दोघेही हजर राहतील का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आता मुदतवाढ न देता दोघांनाही अभय देण्यात यावा, अशी भाजपच्या गोटात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अर्णब गोस्वामी यांनी भेट घेऊन चर्चा केल्याचेही सूत्रांकडून समजते. त्यामुळे येत्या अधिवेशनात राज्य शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.