हळदीचे शास्त्रीय गुणधर्म

आयुर्वेदाच्या परंपरागत उपचार पद्धतीत हळदीचा वापर अनेक शतकांपासून होतोय. मानवी शरीरात तीन तºहेच्या प्रवृत्ती आहेत. वात, पित्त आणि कफ असं आयुर्वेद म्हणतं. हळद ही एकमेव औषधी वनस्पती आहे, जी या तिन्ही प्रकारच्या दोषांना बरं करते. असंही मानलं जातं की, हळदीत अँटिआॅक्सिडंट (वेदनाशामक) आणि अँटिसेप्टिक (जंतूनाशक) गुणधर्म असतात.
फक्त औषधी गुणधर्मच नाही, तर हळदीचं स्थान भारतीय स्वयंपाकघरात अढळ आहे. हळदीशिवाय ना कुठली भाजी पूर्ण होते ना वरण. शुभकार्याला हळद हवीच. या हळदीवर १९९५मध्ये अमेरिकेच्या एका कंपनीने दावा सांगितला होता. याचा सरळ सरळ अर्थ होता की, आता हळदीचा वापर तिच्या औषधी गुणांसाठी कोणीही करू शकणार नव्हतं. इतकंच नाही, तर हळदीच्या औषधी गुणांसाठी विक्री आणि वाटप करण्याचे संपूर्ण अधिकार त्यांना गेले. पेटंटच्या नियमानुसार निसर्गात उपलब्ध असणाºया कोणत्याही नैसर्गिक गोष्टीचं पेटंट घेता येत नाही.

त्यामुळे हळदीच्या झाडावर, पिकावर कोणाचा अधिकार नव्हता. तुम्ही फोडणीला हळद टाकू शकत होता, पण आयुर्वेदिक औषधांमध्ये हळदीचा वापर करणं यावर बंधनं आली होती. सीएसआयआर या संस्थेने अमेरिकेच्या पेटंट आॅफिसला हे पेटंट रद्द करण्याची विनंती केली, पण यासाठी हे सिद्ध करणं आवश्यक होतं की, हळदीच्या अंगी जे औषधी गुणधर्म नव्याने ‘शोधून काढण्याचा’ दावा या संशोधकांनी केला होता, ते भारतात आधीपासूनच ज्ञात होते.
अमेरिकन पेटंट संस्था फक्त लिखित स्वरूपातले पुरावे मान्य करते. म्हणजे या नव्या संशोधकांचं पेटंट रद्द करायला १९९५च्या आधी कोणत्यातरी लिखित स्वरूपात हळदीच्या औषधी गुणांचं वर्णन हवं. पण आपलं आयुर्वेदाचं ज्ञान मौखिक परंपरेतलं. पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसºयाकडे झिरपलेलं. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संस्कृत, पाली, हिंदुस्थानी अशा अनेक भाषांमधले उतारे अनुवादित करून त्यांचा अभ्यास केला. हे नियमांनी खेळण्याचं युद्ध होतं.

या देशांना त्यांचेच नियम पाळून हरवायचं होतं. १९९७ साली अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क आॅफिसने भारताने सादर केलेले पुरावे पाहून हळदीच्या औषधी गुणांसाठी दिलेलं पेटंट ‘त्यात काही नवीन नाही’, असं म्हणत रद्द केलं. हे सर्व आठवायचं कारण म्हणजे हळदीला आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करणे प्राप्त होते.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था भोपाळच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी ही कमतरता पूर्ण केली आहे. प्रथमच हळदीच्या डीएनएमधील पन्नास हजार चारशे एक जनुकांचे क्रमनिर्धारण शास्त्रज्ञांनी पूर्ण केले आहे. हळदीचे जगातील पहिले क्रमनिर्धारण असल्याचे आयसर भोपाळचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनीत शर्मा यांनी सांगितले. या संशोधनातून औषध निर्माण संशोधनास मोठी चालना मिळेल.

– बाळासाहेब हांडे/ ९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …