हर्षवर्धन पाटीलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून

  •  २८ डिसेंबरला होणार मुंबईत विवाहसोहळा
  • ‘शिवतीर्थ’वर पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई – भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक म्हणजेच अंकिता पाटील या लवकरच ठाकरे घराण्याच्या सून होणार आहेत. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळत आहे. हा विवाह सोहळा २८ डिसेंबर रोजी मुंबईत पार होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ येथे भेट दिली. त्यावेळी २८ तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला. ‘राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली’, असे कॅप्शन त्यांनी दिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचे एलएलएमपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका, तर राज ठाकरे हे चुलत काका आहेत. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा विवाह सोहळा २८ डिसेंबरला मुंबईत पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकले. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असले, तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. २०१४ च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …