लखनऊ – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७ दशके उत्तर प्रदेशला ज्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या आज मिळत आहेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते उत्तर प्रदेशमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शिलान्यास कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारने केलेल्या कामांविषयी माहिती दिली, तसेच स्वातंत्र्यानंतर इतके वर्षे उत्तर प्रदेशला टोमणे ऐकण्याची परिस्थिती तयार करण्यात आल्याचेही म्हटले.
नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतर पहिल्यांदा उत्तर प्रदेशला त्यांचा हक्क असलेल्या गोष्टी मिळत आहेत. डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नाने आज उत्तर प्रदेश देशातील सर्वात कनेक्टेड प्रदेशात रूपांतरित होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये देखील लाखो कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. रॅपिड रेल कॉरिडोअर, एक्स्प्रेस वे, मेट्रो कनेक्टिव्हीटी, उत्तर प्रदेशला पूर्व आणि पश्चिम समुद्राला जोडणारे डेडिकेटेड फेड कॉरिडोअर हे सर्व आधुनिक उत्तर प्रदेशची नवी ओळख आहे.
स्वातंत्र्यानंतर इतके वर्षे उत्तर प्रदेशला टोमणे ऐकण्याची परिस्थिती तयार करण्यात आली. कधी जवळच्या लोकांचे टोमणे, कधी जाती-पातीचे टोमणे, कधी हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे टोमणे, कधी खराब रस्त्यांचे टोमणे, कधी उद्योगांच्या कमतरतेविषयी टोमणे, कधी ठप्प झालेल्या विकासाबद्दलचे टोमणे, कधी अपराधी आणि राजकारण्यांच्या संबंधांचे टोमणे मारले जात होते. त्यामुळे यूपीच्या कोट्यावधी लोकांना उत्तर प्रदेशची सकारात्मक प्रतिमा तयार होणार की नाही, असा प्रश्न पडत होता. आधीच्या सरकारने उत्तर प्रदेशला कमतरता आणि अंधारात ठेवले. त्या सरकारांनी उत्तर प्रदेशला विकासाची खोटी स्वप्ने दाखवली. आज हाच उत्तर प्रदेश राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय संस्था निर्माण झाल्यात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हायवे, एक्स्प्रेस वे, रेल कनेक्टिव्हिटीसाठी हे राज्य ओळखले जाते. येथे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे केंद्र तयार झाले आहे.