ठळक बातम्या

स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

प्रियंका गांधींकडून यूपीचा ‘अजेंडा’ जाहीर
लखनऊ – आगामी वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यातून यूपीत सत्तेवर आल्यास महिलांना नोकरीमध्ये ४० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केला. आम्ही निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. हा जाहीरनामा केवळ स्त्रियांचा जाहीरनामा ठरणार नाही, तर या घोषणापत्रामुळे सत्ता आणि प्रशासनातील महिलांच्या भागीदारीला इतर पक्षही गंभीरपणे घेतील ही अपेक्षा आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
शक्ती, संकल्प, करुणा, दया आणि साहस हे महिलांचे गुण असतात. हेच गुण राजकारणातही यावेत ही आमची इच्छा आहे. आज महिलांबाबतची चर्चा केवळ कागदावरच असते, मात्र काँग्रेसने महिलांना पंचायतीत ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांच्या सक्षमीकरणास सुरुवात केली होती. जेव्हा सत्तेत महिलांचा सहभागच नव्हता, त्या काळात काँग्रेसने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या निवडणूक अजेंड्यातून महिला सक्षमीकरणाला मदत मिळेल. देशातील ६० टक्के महिला राजकारणात आल्या, तर राजकारणाचा चेहरामोहरा बदलून जाईल, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसच्या महिलांसाठीच्या या जाहीरनाम्यात महिलांसाठी विविध आश्वासनांची खैरात केली गेली आहे. वर्षातील तीन महिने मोफत सिलिंडर, विद्यार्थिनींना स्कूटी-स्मार्टफोन, कर सूट आणि नोकऱ्यांबाबतही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पोलीस भरतीत महिलांना २५ टक्के आरक्षण देणार असल्याचे देखील काँग्रेसने म्हटले आहे. महिलांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन सदस्यीय कायदा समिती असेल, असेदेखील काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने या जाहीरनाम्याला ‘शक्ती विधान’ असे नाव दिले आहे.
प्रियंका गांधी यांनी महिलांसाठी मोठी आश्वासने देताना म्हटले आहे की, यूपीमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ८ लाख महिलांना रोजगार देणार आहोत. महिलांना मनरेगामध्ये प्राधान्य दिले जाईल. प्रियंका गांधी यांनी महिलांना मोफत बस सेवा देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व केवळ १५ टक्के आहे. काँग्रेसने हे निराशाजनक चित्र बदलण्याचा संकल्प केला असल्याचे प्रियंका गांधींनी सांगितले. या जाहीरनाम्यात स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षण, सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य या सहा गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …