ठळक बातम्या

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात

ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच ठार

पुणे – सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भीमानगर येथे घडला. सोलापूर-पुणे महामार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. मळीने भरलेला टँकर (क्रमांक एमएच-१४, सीपी-४०२०) इंदापूरकडून सोलापूरकडे निघाला होता, तर तांदुळाची वाहतूक करणारा ट्रक (एमएच-२५, यू-४०४५) सोलापूरकडून पुण्याकडे येत होता. भीमानगर परिसरातील एका धाब्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या भीमा नदीच्या पुलावर इंदापूरकडे जाणाऱ्या मार्गाचे काम चालू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. टँकर चालकाचा ताबा सुटून वाहन प्रथम दुभाजकावर आदळले व नंतर ट्रक आणि टँकरची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले, तर सहा जण जखमी झाले. जखमींना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
शिवाजी नामदेव पवार (ट्रक चालक ३०, रा. सालेगाव, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), व्यंकट रामण्णा दंडगुले (रा. सालेगाव, ता. उमरगा), किसन रामलू राठोड (४५, रा. इंदिरानगर, कात्रज, पुणे) आणि सोमनाथ लक्ष्मण माळी (रा. मोहोळ, जि. सोलापूर), टँकरचालक संजय शंकर कवाडे (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये दत्ता अशोक कुंटे (२९, रा. सालेगाव), गौरी दत्ता रजपूत (३३), मीनल दत्ता रजपूत व धीरज दत्ता रजपूत (१२) आणि व्यंकूसिंग रतनसिंग रजपूत (६६, रा. केसरजवळगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद) यांचा समावेश आहे. ते सर्व एकाच कुटुंबातील असून, पुणे येथील राहणारे आहेत. ते सर्व जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर हे करीत आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …