ओम शांती ओम, तो बात पक्कीसारख्या चित्रपटांमध्ये चमकलेली युविका चौधरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. युविकाचा शबाना हा चित्रपट ओटीटीवर दाखल होत आहे. बिग बॉस ९ ची स्पर्धक राहिलेली युविका नच बलिए ९ मध्ये आपला पती प्रिंस नरुलासोबत विजेताही ठरली होती. अलीकडेच ती वादाच्या भोवऱ्यात सापडली जेव्हा एका आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. आपला आगामी चित्रपट शबानाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना युविकाने सिनेमासोबतच एफआयआरबद्दलही आपले मत व्यक्त केले.
जेव्हा युविकाला शबाना चित्रपटात ती प्रिंस नरुलासोबत दिसून येणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा ती म्हणाली की, मी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. माझी व्यक्तिरेखा खूप दमदार आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल फार काही सांगू शकणार नाही, परंतु जसजसा चित्रपट पुढे सरकेल तसतसे प्रेक्षक माझ्या व्यक्तिीेरेखेशी जोडले जातील. यातील माझी व्यक्तिरेखा आणि लूक हे सामान्य आयुष्यापेक्षा खूप हटके आहे. ओटीटीवर याचे स्ट्रिमिंग होण्याची मी प्रतिक्षा करत आहे. प्रिंससोबत सेटवर काम करताना खूप मजा आली. आमचे ट्यूनिंग खूप चांगले होते.
दरम्यान, अलीकडेच तुला हरयाणा कोर्टातील एका कटू अनुभवाला सामोरे जावे लागले त्याबद्दल तुला काय वाटते, असे विचारले असता युविका बोलली, सत्य तर हे आहे की मी एक शब्द नकळतपणे अन्य कुणाला नाही, तर स्वत:लाच बोलले होते. नंतर मला समजले की तो शब्द एका ठराविक समाजाकरिता आक्षेपार्ह आहे. हा कायदा बनला आहे ज्यात तुम्ही फार काही बोलू शकत नाही. जेव्हा मला याबद्दल माहीत झाले तेव्हा मी माफीही मागितली, परंतु म्हणतात ना सेलीब्रेटी असल्याच्या नात्याने आम्हाला काही ना काही किंमत चुकवावी लागते. हा कायदा आहे तर आहे. आतापर्यंत असा कोणताही कायदा बनला नाही की जेव्हा सेलीब्रेटींना शिव्या घातल्या जातात तेव्हा त्यांच्यावर केव्हा केव्हा केस करू शकतो? परंतु जर तुम्ही सेलीब्रेटी आहात आणि भलेही तुम्ही जाणूनबुजून काही केलेले नाही, तरीही तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. मी त्या शब्दाबद्दल वारंवार सॉरी म्हटले. पाहा कोर्टाची पायरी चढायला कुणालाही आवडत नाही, परंतु मला जेव्हा चौकशीकरिता बोलावले तेव्हा मी त्यांना पूर्ण सहकार्य केले. मी याकडेही एक अनुभव म्हणून पाहते. यामुळे मी अधिक मजबूत होईल. सुरुवातीला मला धक्का बसला होता. सेलीब्रेटी या नात्याने लोक आम्हाला किती शिव्या देतात. आई-बाप, खानदानापर्यंत जाऊन पोहोचतात. आम्ही गप्प राहतो. परंतु नकळतपणे आमच्या तोंडातून काही वावगे गेले तर आम्हाला मात्र माफी नसते. आम्हा कलाकारांना सातत्याने जज केले जाते.